हरित लातूरसाठी किर्ती ग्रुप कडून साडेपाच हजार झाडे
सामाजिक संस्थांच्या मदतीने मनपा करणार लागवड
वृक्ष लागवडीसाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा – महापौर विक्रांत गोजमगुंडे
लातूर/प्रतिनिधी: हरित लातूरचे स्वप्न साकार करण्यासाठी महानगरपालिका काम करत आहे. याच उपक्रमाला बळ देत शहरातील नावाजलेल्या कीर्ती ग्रुपने साडेपाच हजार झाडे लागवडीसाठी महानगरपालिकेला दिली आहेत. विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने मनपा या झाडांची लागवड व संवर्धन करणार असून शहरातील प्रत्येक नागरिकाने वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे. यावेळी कीर्ती ग्रुप चे अर्जुन भुतडा, लक्ष्मीकांत तोष्णीवाल, जेष्ठ पत्रकार अरुण समुद्रे, मनपा सहायक आयुक्त मंजुषा गुरमे उपस्थित होत्या.

लातूर शहराला हरित करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत.विविध सामाजिक संस्थाही याच उद्देशाने कार्यरत आहेत.गेल्या काही महिन्यात लातुरात वृक्षलागवडीची चळवळ रुजली असून ती अधिक गतिमान करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे.
पालिकेच्या या उपक्रमाला कीर्ती ग्रुपने बळ दिले. जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या निमित्ताने कीर्ती ग्रुपच्या वतीने विविध प्रकारची साडेपाच हजार झाडे लागवडीसाठी महानगरपालिकेला देण्यात आली आहेत. केवळ झाडे देऊनच किर्ती ग्रुप थांबला नाही तर संवर्धनासाठीही किर्ती ग्रुप पुढे आला आहे. याशिवाय जेथे आवश्यक असेल तेथे मदतीसाठी किर्ती ग्रुप तत्पर असणार आहे.

महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या उपस्थितीत ही झाडे महानगरपालिकेला सुपूर्द करण्यात आली. शहरात वृक्षलागवडीच्या कार्यात सहभागी असणाऱ्या विविध संस्थांच्या मदतीने शहर व परिसरात या झाडांची लागवड केली जाणार आहे. त्याचे संवर्धनही केले जाणार आहे. शहरातील नागरिकांनी त्यांच्या परीने वृक्ष लागवडीमध्ये सहभाग नोंदवावा, प्रत्येकाने स्वतःच्या दारात किमान दोन वृक्ष लावावेत. हरित लातूरचे स्वप्न साकार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. केवळ झाडे लावण्याचे काम न करता त्यांचे संवर्धनही करावे, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी याप्रसंगी बोलताना केले. कीर्ती ग्रुपच्या पुढाकाराने वृक्ष लागवड व संवर्धनाच्या चळवळीला आणखी गती मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद करत या कार्यात पुढाकार घेतल्याबद्दल कीर्ती ग्रूपचे त्यांनी आभारही मानले.











