*शरद पवारांची ईच्छा अन् गणपतरावआबांचा पिंड!*
-राजा माने
नमस्कार,
महाराष्ट्राच्या नैतिक, सामाजिक आणि राजकीय वैभवातील एक अनमोल दागिना म्हणून स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांचा उल्लेख आवर्जून होतो.. स्वातंत्र्यानंतरच्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या वाटचालीतील प्रत्येक टप्प्यावरचा सक्रिय साक्षीदार ठरलेले गणपतरावआबा म्हणजे एक तत्त्वनिष्ठ, खंबीर आणि जनमाणसात घट्ट पाय रोवलेला लोकनेता! देशप्रेमाने भारावलेला कालखंड, प्रगतीची ओढ लागलेला कालखंड आणि प्रगतीच्या रस्त्यावर घोडदौड सुरू झाली असताना सामाजिक आणि राजकीय नीतिमूल्यांना घसरण लागलेला कालखंड या सर्व कालखंडात आबा सक्रिय राहिले. पण कालचक्राच्या महिम्याची हवा मात्र आपल्या जवळही फिरकू दिली नाही. शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेनंतर त्यांनी आपले राजकीय गुरु ठाकूर देशभक्त स्वर्गीय तुळशीदासदादा जाधव यांचे बोट धरुन चळवळीत उडी घेतली. पुण्यासारख्या विद्यानगरीत विद्यार्थी चळवळ उभी करणारा हा तरुण पुढे आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत शेतकरी कामगार पक्षाचा लढवय्या शिलेदार म्हणूनच गणला गेला. महाराष्ट्राच्या विधिमंडळात तब्बल दहा वेळा निवडून जाऊन जागतिक विक्रमाचा धनी बनलेले आबा आयुष्यभर स्वच्छ चारित्र्य, साधेपणा आणि तळागाळातील माणसाविषयी असलेली कणव जतन करतच जगले. एसटीने प्रवास करणारा हा आमदार ऐश्वर्य आणि पारंपारिक वैभवाच्या प्रेमात कधीच पडला नाही. तथाकथित कोडकौतुक, देखावा आणि गौरवाचा त्यांना तिटकाराच होता. *चार-पाच वर्षापूर्वींची एक घटना मला आवर्जून सांगावीशी वाटते. शरद पवार साहेबांच्या पंचाहत्तरी निमित्त सोलापुरातील त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते महेश गादेकर यांनी मोठा कार्यक्रम ठेवला होता त्या निमित्ताने पवार साहेब सोलापूर दौऱ्यावर होते. त्याच दिवशी दुपारी पवार साहेबांनी मला संध्याकाळी भेटण्या विषयीचा निरोप पाठविला.संध्याकाळी पंच्याहत्तरीचा ऐतिहासिक कार्यक्रम झाला.त्यानंतर मला ज्या ठिकाणी पवार साहेबांच्या भोजनाची व्यवस्था केली होती तिथे भेटायला बोलावण्यात आले. कार्यक्रम संपला सुशीलकुमाजी आणि पवारसाहेब भोजन व्यवस्थेच्या ठिकाणाकडे रवाना झाले. गर्दीमुळे मला मात्र तिथे पोचायला उशीर झाला. मी तिथे पोहोचण्या पूर्वीच पवार साहेब सिद्धेश्वर एक्सप्रेस गाठण्यासाठी रेल्वे स्टेशनकडे रवाना झाले. शिंदे साहेब भेटले आणि त्यांनीही पवार साहेबांनी तुम्हाला भेटायला सांगितले आहे, असा पुन्हा निरोप दिला. मी तिथून तातडीने रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. महेश गादेकर, दीपकआबा साळुंखे फोनवर माझ्याशी संपर्कात होतेच. मी तिथे पोहोचताच ज्या रेल्वे बोगीत पवार साहेब होते त्या बोगीत गादेकर आणि दीपकआबा मला घेऊन गेले. तिथे पोहोचताच पवार साहेबांनी मला बसायला सांगितले. (एव्हाना पवार साहेबांनी आपल्याला कशासाठी बोलावले असेल या प्रश्नाने माझ्या मेंदूला अक्षरशः मुंग्या यायची वेळ आली होती)मी बसताच पवार साहेब म्हणाले, “गणपतरावांवर तुम्ही पुस्तक लिहावे असे मला वाटते. त्यांच्या कार्याचा गौरव मोठा कार्यक्रम घेऊन आपण करू. पुस्तकाची जबाबदारी तुम्ही घ्या. त्यांच्या चरित्रा बरोबरच विधिमंडळातील त्यांच्या कामांबद्दल सविस्तर नोंदी घ्या!”, साहेबांचे बोलणे संपताच मी त्यांना होकार दिला आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पुस्तकाचे काम होईल असे सांगितले. त्यांनी यासंदर्भात लागणारी संपूर्ण मदत करण्याच्या सूचना दीपकआबा साळुंखे, महेश गादेकर यांना दिल्या आणि मी तिथून आनंदाने परतलो. दुसर्या दिवसापासूनच पुस्तकाच्या कामाला लागलो.या उपक्रमाची कल्पना गणपतरावआबा यांना देऊन त्यांच्या परवानगीने पुढे जाणे आवश्यक होते.त्यामुळे सांगोला येथील आबांच्या घरी पोहोचलो. पवार साहेबांच्या तीव्र इच्छेबद्दल त्यांना सांगितले.त्यांनी सर्व ऐकून घेतले पण पुस्तक आणि गौरव समारंभाला स्पष्ट नकार दिला. मी तब्बल तीन तास त्यांच्या घरी होतो. त्यांनी होकार मात्र दिलाच नाही. त्यानंतर चार पाच वेळा सांगोल्याला जाऊन पुन्हा पुन्हा आबांना विनंती केली. आबांनी शेवटपर्यंत नकारच दिला. अखेर मी महेश गादेकर यांच्या मार्फत पवार साहेबांना गणपतरावआबांच्या नकाराबद्दल निरोप दिला. अशाप्रकारे आबांवरील माझ्या पुस्तकाचा उपक्रम बारगळला. शेवटी मी “लोकमत” च्या साप्ताहिक पुरवणीतील “अधिक- उणे” या सदरासाठी आबांची प्रदीर्घ मुलाखत घेऊन दुधाची तहान ताकावर भागविली. शरद पवार साहेबां सारख्या दिग्गज व्यक्तिमत्वाच्या तीव्र इच्छेसाठी देखिल आपला पिंड न सोडणारा हा नेता, आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.माझ्या येऊ घातलेल्या “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..” या पुस्तकात देखील त्यांच्या वरील लेख आहे.स्वर्गीय आबांना श्रद्धापूर्वक आदरांजली!*
*राजा माने*
संस्थापक अध्यक्ष,डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र.
-संस्थापक संचालक, मातृभूमी प्रतिष्ठान बार्शी
-संचालक बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशन
-उपाध्यक्ष अभा नाट्य परिषद बार्शी शाखा.











