रेणा साखर कारखान्याचा १७ वा बॉयलर अग्नी प्रदीपन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न
लातूर( प्रतिनिधी) :— येथील रेणा सहकारी साखर कारखान्याचा १७ वा बॉयलर अग्नी प्रदीपण कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, माजी चेअरमन यशवंतराव पाटील, मांजरा कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, संत शिरोमणीचे चेअरमन गणपतराव बाजुळगे, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, विलास कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, लालासाहेब चव्हाण, बाळासाहेब कदम, कार्यकारी संचालक बी व्ही मोरे, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक एच जे जाधव, मांजराचे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, गोविंद पाटील, बंकटराव कदम, तात्यासाहेब देशमुख रेणाचे संचालक संजय हरिदास, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रवीण पाटील, शहाजीराव हाके, तानाजी कांबळे, अमृताताई स्नेहलराव देशमुख, वैशालीताई पंडितराव माने, माजी संचालक स्नेहलराव देशमुख, पंडितराव माने आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी सर्व गळीत हंगाम प्रयत्नांची पराकाष्टा करत यशस्वी केले आहेत. रेणाने शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल नेहमीच जपले म्हणूनच पश्चिम महाराष्ट्राला देखील आपल्या साखर कारखानदारीचा हेवा वाटत आहे.येणाऱ्या काळात गाळपाचे दिवस कमी करून गाळप क्षमतेचा वापर पूर्ण क्षमतेने करून उस वेळेत व तत्परतेने गाळप करण्यासाठी रेणा कारखाना प्रयत्नशील असल्याचे सांगून, मांजरा परिवारातील कारखान्यात सकारात्मक स्पर्धा असून शेतकऱ्यांसाठी काम करत असताना सेवाभाव मनात ठेवून कार्य केले जाते. व्यवसाय म्हणून साखर कारखानदारी करत नाही तर या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवण्याची काम केले जाते. रेणा कारखान्याने हंगाम २२- २३ साठी सात लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी माजी आमदार त्रिंबक भिसे यांनी रेणा कारखान्याच्या वाटचालीचा गौरव करून येणाऱ्या गळीत हंगामासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या प्रास्ताविकात चेअरमन सर्जेराव मोरे यांनी गाळपासाठी कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात उसाची उपलब्धता असून शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप करण्यासाठी सर्व तयारी केली असल्याचे सांगितले.
यावेळी कारखान्याचे संचालक धनराज देशमुख ,संग्राम माटेकर व प्रत्येक विभागातील तृतीय क्रमांकाचे ऊस पुरवठादार यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजन करण्यात आले. बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, खाते प्रमुख, अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—




