मिलिंद पोतदारांच्या अभिनयाने केले लातूरकरांना मंत्रमुग्ध
कोणत्याही गोष्टीवरची भक्ती, आसक्ती आणि विरक्ती या किंवा यांपैकी जीवनपद्धतींनी जगायचं ठरवल्यानंतर माणसाचा संघर्ष त्यावाटेवर मोक्ष, मुक्तीसाठी सुरु होतो. ही मुक्ती म्हणजे काय ? साफल्य ? की निर्माल्य ? ते कधी मिळतं ? मिळतं ? ते अंतिम, चिरकाल असतं का ? नसेल तर त्याला साफल्य कसं म्हणायचं आणि मोक्ष, मुक्ती तरी कसं म्हणायचं ? माणसाला मिळालेली ही संवेदनशीलता, चिंतनशीलता शाप की वरदान ?
भक्ती, आसक्ती आणि विरक्तीदेखील कुणाची कोणत्या गोष्टीवरची ? जीवनावर प्रेम करायचे, तर मृत्यूचे भय कसे सांभाळायचे ?
जीवनसंघर्षाच्या पार्श्वपटलावर पिशाच्चाच्या छायेसारखा मृत्यू तर कायम वावरत असतोच. शिवाय, त्याचे भय केवळ आपल्यापुरते नसते, तर जीव आणि त्यातही माणूस म्हणून जगत असताना नाती, ऋणानुबंध, लळा-जिव्हाळा, आधारभूत असलेल्या माणसांच्याही मृत्यूचे भय वेगळेच.

बाह्यव्यवहारासह शरीरव्यवहार आणि भावभावना यांच्या हतबलतेतून जन्मलेल्या ‘मृत्यू सर्वांनाच येतो, पण सगळं घर बदलत नाही… मग आमचेच कसे बदलले ?’, ‘स्त्रीही नाही मोहही नाही’, ‘सावकारी इंद्रायणीत बुडवायची, सोडून द्यायची तर जगायचे कसे?’, ‘भरल्या संसारातून आईबाबांना कोण घेवून गेले?’, ‘हा मृत्यू कोण आहे?’, ‘पांडुरंगा, तू कोण आहेस ? कुणी आहेस का ?’, ‘संसारी माणसाच्या चिंता अशा सारख्या उलट्यापालट्या होत असतात … आणि त्यातूनच तो जगत जातो, त्यातच जग जगतं..’ अशा असंख्य प्रश्नांच्या उत्तरांना, विषयांना, व्यावहारिक आणि मानसिक सत्यांना आपण शोधत राहतो. या शोधातून संत तुकारामासारख्या भाबड्या रांगड्या तत्वचिंतकाची तरी सुटका कशी होईल ? संतपरंपरेत ज्ञानेश्वर आणि तुकाराम ही मराठी मनाची सांस्कृतिक टोके आहेत. ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ ह्या उक्तीचे प्रयोजनही तेच. पण कळस हा अधिक वास्तवरूपी. तो बाह्यांगी दिसतो. अनुभवला जातो. तो असा ‘पाया’वर तसा जमिनीवरही उभा असतो. त्याचे आकाशरूपी उच्चदर्शन ‘पाया’वर अवलंबून मात्र असते. तरीही ‘पाया’च्याही ताकदीचा अंदाज कळस पाहूनच येतो. हे अगोचर-दृग्गोचराचे द्वंद्व आणि त्यातून जीवनतत्वाचा शोध म्हणजे ‘आनंद ओवरी’ ह्या कादंबरीचे चिंतनस्थळ असावे, हे नाट्यरूपातून स्पष्ट होते.

ह्या शोधातूनच तुकारामही जीवन शिकले आणि ते जगाला अंतापर्यंत शिकवण्यासाठी गाथा लिहून गेले. ‘आता गाथा बुडवल्या तर कागद बुडतील, की माझे कवित्व ?’ हाही प्रश्न विचारते झाले. प्रापंचिक जीवन जगता जगता ‘तुका असा का झाला ?’ याचे उत्तर नाट्यानुभव घेणाऱ्या रसिक प्रेक्षकाला किमान धूसर दिसू लागते.
साक्षात तुकारामाच्या भावाच्या तोंडून भक्तीची व्यथा आणि व्यथेची सखोलता सांसारिक प्रांजळतेसह असाच प्रश्न करते तो थेट भगवंतरुपालाच. ‘का असा आमच्या संसारात व्यत्यय आणतो आहेस?’ हा तुकाविरहाने व्याकुळ करणाऱ्या लाडिक व्यथेचा प्रश्न कुणा नास्तिकाचा नव्हे, तर त्याच्यावर तुकारामाइतकीच भक्ती असणाऱ्या, तुकारामावरही तेवढीच भक्ती असणाऱ्या कान्होबाचा.
तुकाराम तर कालातीत झाले. युगपुरुष झाले. या युगपुरुषाला अजून कोण-कोण होतं ? याची माहिती कुणाला असेल, नसेल – पण त्याची काळजी मात्र होती, ती कान्होबाला. कान्होबाला, तर घराचीही काळजी वाहणे आले. घरदार, कुटुंब इतकंच काय पण व्यवसाय, मिळकत आणि पोरासोरांच्या रुपातलं भविष्यही सांभाळायचं होतं.

भगवत्भक्तीतही प्रपंच आणि प्रपंचासह विश्ववंचनाही. हो, विश्ववंचनाही आणि काळवंचनाही. म्हणूनच भक्तीसुद्धा संसारासाठी शाप वाटावा, इतकी आत्मविस्मृती होणे आणि त्यातून संसारिक सामान्य माणसाच्या मनात तिच्याबद्दल प्रश्न उत्पन्न होणे साहजिकच आहे. पण खरा प्रश्न आहे, मग जीवनाचा उद्देश काय असावा ? केवळ प्रपंच, केवळ संसार, केवळ सुखसमृद्धी की विश्वसमृद्धी ? ह्या मंथनातूनच ज्ञानेशाने विश्वासाठी मागितलेले पसायदान उमटले. तरीही संसारिक व्यथावंचनांना कमी लेखून कसं चालेल ? ‘संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे?’ हा प्रश्न त्यासाठीच तर विचारला गेला आहे. इंद्रायणीत सावकारी – म्हणजे जगण्याचं साधन बुडवताना थरथरणारे कान्होबाचे हात स्वार्थासाठी तर नव्हते थरथरत किंवा त्याच्या बायकोचाही आत्मा त्यासाठी नव्हता तळमळत. पोटच्या पोरांचे, लहान जीवांचे काय होईल या आशंकेने माउलीचे चित्त उद्विग्न झाले, तर तिचा दोष नाही. पण हतबल जीव दोष देतो तो आपण भक्ती करतो त्यालाच. उद्वेग व्यक्त होवून शिव्याशाप देतो तो त्यालाच. ‘नष्ट्या नारायणा…. धिन्न धिन्न ..’ असेही कान्होबा म्हणतो आणि त्याची बायको भक्तीलाही ‘विठ्ठलाचा शाप’ म्हणते ते हक्काच्या उद्वेगाने. ‘तुझा माझा नाही भेद, परी तुझ्याशीच वाद’ हे तुकोबांनीच तर लिहिले आहे ना !

ह्या सर्व भावभावनांच्या आणि कर्तव्यावगुंठित व्यवहारांच्या हुंकारांचे शाप भोगत माणूस प्रपंच करत जगत राहतो.
ज्याच्या गाथांनी विश्व गाजवले आणि पिढ्या शिकवल्या, अनंत काळपर्यंत हे कार्य त्या करतच राहतील त्या अगाध गाथा ज्याने लिहिल्या… त्याच्या प्रपंचाची कथा आणि व्यथा सापडते ती ह्या हुंकारांत. कान्होबाच्या हुंकारांत … भक्तीची ही बाजू मांडली, ती दि. बा. मोकाशींनी आणि दृग्गोचर केली, ती अतुल पेठेंनी त्याच्या ‘आनंद ओवरी’ या सार्थ नावाने केलेल्या नाट्यरुपातून.
ह्यातच कुठेकुठे, कुठेतरी आपणही असतोच. आपल्या आजूबाजूच्या समाजातली अनेक माणसेही असतातच.
त्यातच दिसतो का आपण, आपले आयुष्य आणि आपण आपल्यापुरते योजित केलेले मोक्षमुक्तीचे साफल्य ? ही मोक्षमुक्ती नेहमी अध्यात्मिकच असावी का ? हा प्रश्नही पडतोच. संसारिक माणसाला त्याच्या हक्कानुसार त्याचे फलित गावते का ? ह्या सगळ्या चर्चेची मांडणी केली आहे, ती तुकारामांचे धाकटे भाऊ कान्होबा यांनी तुका हरवल्यानंतर केलेल्या आर्त शोधाच्या रूपक, प्रतीकांच्या योजनांतून. जो शोध घेत, जे प्रश्न विचारत कान्होबा आर्त आवाजात आपल्या भावाला शोधत हाक घालतात, त्या ह्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी. तुकाराम आणि कान्होबा ह्या मुख्य पात्रांच्या सोबत डोळ्यांसमोर येते ती हीच चर्चा आणि त्यात सामील होतात त्यांचे कुटुंबीयही. ऐहिक जगणे हेच फक्त जीवन मानण्याचे अज्ञ प्रांजळत्व आणि पापभीरू भाबडेपण ज्यांना वरदान मिळालेले आहे, त्यांच्या तुलनेत जीवनसत्याचा गर्भ शोधण्याचा आर्त शोध घेवू पाहणाऱ्या तुकाराम यांच्या आर्तव्याकूळ घुसमटीहून त्यांचे जीवन सरळच म्हणायचे. पण ह्या दोन्हींच्या मधोमध जीवन जगणाऱ्या कान्होबाची अवस्था प्रापंचिक सुखदु:खांच्या धुळवाटेवरून चालणाऱ्या सभ्य, संवेदनशील, सुसंस्कृत सामान्य माणसाच्या अवस्थेशी साधर्म्य सांगते.
हा अंगावर रोमांच उभे करणारा नाट्यप्रयोग लातुरात दि. १५ आॕक्टोबर, २०२२ रोजी संध्याकाळी ८ वाजता दगडोजीराव देशमुख सभागृहात साकार झाला. तत्पूर्वी हाच प्रयोग ख्यातनाम आणि समर्थ अभिनेते व कवी किशोर कदम (सौमित्र) यांनी सादर केलेला आहेच. लातुरात तो ‘नाट्यस्पंदन प्रतिष्ठान’ या वैद्यक क्षेत्रातील कलावंतांणी उभारलेल्या नाट्यसंस्थेने केला. हा एकपात्री प्रयोग सादर केला डॉ. मिलिंद पोतदार यांनी. ह्या प्रयोगाबद्दल प्रचंड औत्सुक्य होते. एक आव्हान म्हणूनही आणि आध्यात्मिक पातळीवरचा एक अभिनव प्रयोग म्हणूनही. सुखद आणि साभिमान समाधान देणारी बाब ही, की हे आव्हान डॉ. मिलिंद पोतदार या वास्तविक्त: एक प्रख्यात आणि यशस्वी उपक्रमशील मानसोपचारतज्ज्ञ असलेल्या कुशल व्यावसायिक सेवेधारी रंगकर्मीने. मान्यवर व्यावसायिक रंगभूमीवरील कुठल्याही नामवंतापेक्षा कुठेही कमी तर नव्हेच, पण काही अंगुळे सरसच प्रयोग डॉ. मिलिंद पोतदार यांनी केला आहे. त्यांच्या अभिनयाचे सामर्थ्य त्यांनी दाखवून दिले आहे. रंगभूमीवरची श्रद्धा आणि निष्ठा असल्याशिवाय हे शक्य होत नाही हे मात्र खरे. त्याबद्दल त्यांना द्यावे तेवढे गुण कमीच आहेत. तथापि, अजूनही काही ठिकाणी त्यांचे अभिनयकौशल्य सफाईदार ओवू शकते. महत्वाचे म्हणजे त्यांचे उच्चार अजून सफाईदारपणे होणे आवश्यक आहे. काही ठिकाणी त्यांच्या भावमुद्रा अधिक ठळक व सुसंगत होणे आवश्यक आहे. मात्र, कमालीचे आहे ते त्यांचे स्वरवैविध्य (व्हॉइस मोड्यूलेशन). त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छाही देताना रसिकाच्या भूमिकेतून धन्यवादही !
श्रुतिकांत ठाकूर यांच्या दिग्दर्शनाचा स्पर्श नाटकभर जाणवतो. नाटकाच्या क्षेत्रात नाटक वठले, तर ते अभिनेत्याचे आणि उठले, तर दिग्दर्शकाचे, अशी शापितावस्था असते. मात्र, श्रुतिकांत ठाकूर यांच्या अनुभवसिद्ध कुशल दिग्दर्शनाने हे नाटक एक मांदियाळी किंवा गुणांची प्रभावळ वाटले. अशी एकसंघता जुळून येणारे नाटक रसिकाला भुरळ घालते आणि यशस्वी प्रयोगाच्याही दिग्दर्शकाची वाखाणणी होते. दिग्दर्शकाचा हात कुठेकुठे फिरला आहे, याची जाणीव सतत होते, हे त्यांचे एरवी इतर नाटकांच्या बाबतीत अभावानेच दिसणारे यशच आहे.

अर्थात दिग्दर्शनातही काही बाबींत अजून काही बदल (सुधारणा नव्हे) करता आल्यास व्यावसायिक रंगभूमीला साजेसे स्वरूप आकारता येईल, हे निश्चित. काही प्रसंगांच्या प्रभावासाठी काही बदल आवश्यक वाटले. हे संपूर्णत: वैयक्तिक मत व ह्या अपेक्षा. एरवी एक सकस, सरस आणि सज्जड नाट्यानुभव देण्याचे श्रेय त्यांनाच जाते.
संजय अयाचित यांची प्रकाशयोजना व दयानंद सरपळे यांची संगीतयोजना हे या एकपात्री प्रयोगातील दोन दुसरे पात्रकलावंतच म्हणावेत, इतकी त्यांची एकात्म जुळण, मिसळण आणि पखरण झाली आहे. काही प्रसंग तर त्यांच्या या रंग-सूर-जुगलबंदीने इतके जिवंत केले आहेत, की प्रेक्षकांना त्यात रंगता, दंगता आले. अक्षरश: सामील होता आले. त्यांच्या चापल्याने त्यांनी प्रेक्षकांना नाट्यानुभवाशी एकरूप केले. हा प्रयोग सर्वांगसुंदर करण्यात आणि विशेष म्हणजे कथावस्तू आणि तिचा उद्देश रसिकांच्या चित्तचक्षूपर्यंत पोचवण्याचे अवघड काम त्यांनी जाणवण्याइतपत सहजतेने केले. त्यांच्याशिवाय प्रभावी नाट्यप्रयोगाचे साफल्य नोंदवता येणार नाही.
या प्रयोगाची रंगमंच व्यवस्था सांभाळणारे पार्श्वकलाकार नंदकिशोर वाकडे, गणेश पवार, नूर महंमद यांच्यासह नाट्यस्पंदनचे डॉ. रविभूषण कासले, डॉ. गणेश पोतदार, डॉ. अमित उटीकर यांच्या परिश्रमाला पारावार नाही. ही मंडळी असल्याशिवाय प्रयोगच शक्य नाही. त्यातचप्रमाणे ज्येष्ठ रंगभूषाकार भारत थोरात यांच्यावर तर कुठल्याही नाटकाच्या रंगभूषेची भिस्त कायम असतेच. ‘आनंद ओवरी’च्या एकमेव कलाकाराच्या वेशभूषेची जबाबदारी डॉ. सौ. मुग्धा मिलिंद पोतदार यांनी चोख सांभाळली आहे. याशिवाय तालमीदरम्यान त्यांनी घेतलेले कष्ट सदैव साह्यभूत राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि निवेदन व स्वरमंजुळ उद्घोषणा डॉ. वैशाली टेकाळे (चपळगावकर) यांनी प्रायोजक डॉ. बरुरे, अमरजीत प्रिंटर्स आणि सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केल्याशिवाय हा अनुभव पूर्ण होणार नाही.
सर्वात विशेष म्हणजे, या प्रयोगाला संत गहिनीनाथ महाराज आणि त्यांचा संत-भक्त-परिवार विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहिला होता. त्यांनी या प्रयोगाचे अतिशय सार्थ शब्दांत प्रेमळ व ‘मयाळ’ कौतुक केले, त्यामुळे प्रयोगानंतर भारावलेपण आणि भक्तिभावाची अनुभूती सुखवून जाणारी ठरली. सोबतच ज्येष्ठ रंगकर्मी शैलेश गोजमगुंडे, समीक्षक व अभ्यासक अतुल देऊळगावकर आणि ज्येष्ठ कलाभ्यासक जयप्रकाश दगडे यांनी उत्स्फूर्त प्रशंसा प्रेरणा देणारी ठरली.
बाकी, चोख आणि कल्पक नियोजनव्यवस्था हा तर नाट्यस्पंदनचा विशेष आहेच. त्याचे श्रेय नवनवीन कलावंत, नवनवीन संहिता, नवनवीन कल्पना साकारताना सदैव पाठीमागे उभे राहून सर्व काही घडवून आणणाऱ्या अध्यक्ष डॉ. अशोक आरदवाड आणि डॉ. मुकुंद भिसे यांना. ह्या मंडळीच्या नीटस मांडणी आणि आखणीचे आता लातूर आणि परिसरात अप्रूप निर्माण झाले आहे. लातुरातील दरम्यानच्या काळात शिथिल झालेली नाट्यपरंपरा समर्थपणे जिवंत आणि पुनरुज्जीवित करण्याचे श्रेय नाट्यस्पंदनला जाते, ते त्यांच्या अथक रंगनिष्ठेमुळेच. प्रयोगाआधी सर्व प्रेक्षकांच्या कपाळावर नाम ‘ओढणे’ ही कल्पना ह्या दुकलीचीच. जणू प्रेक्षागृहात जाताना भक्तीरंगात रंगून जायचे होते. अर्थात आतला रंग केवळ भक्तीचा नव्हता, तर नाट्याचा होता. ‘आनंद ओवरी’वरील जीवनचिंतनाचा होता.
एक महत्वाचे म्हणजे, दगडोजीराव देशमुख सभागृह हे नाट्यरसिक व कलावंतांची गरज निश्चितपणे भागवत आलेले असले आणि आत्तापर्यंत तेच नाट्यचळवळीचा आधार ठरले असले, तरी त्याच्या मर्यादा आता कालानुरूप अधिकाधिक जाणवू लागल्या आहेत. जुनी, अपुरी आणि अवघडवणारी आसनव्यवस्था, अनिश्चित (कधी नसतेच ती) खानपानव्यवस्था, वीजपुरवठा व पर्यायी तोकडी वीजव्यवस्था आणि मुख्य म्हणजे आकारले जाणारे सशर्त शुल्क यांत खूप सुधारणा होणे गरजेचे आहे. आजवरच्या नाट्यसेवेचा कृतज्ञ उल्लेख करून हे सुचवावेसे वाटते. लातूरकर नव्या प्रस्तावित सुसज्ज नाट्यगृहाच्या प्रतीक्षेत गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. ते लवकरच – म्हणजे कधी ना कधी – (म्हणजे अजून किती वर्षांनी हे अज्ञात असले तरी) पूर्ण होईलच. तथापि, ह्या सभागृहाचीही गरज असणारच आहे, त्यामुळे संबंधितांनी त्याकडे लक्ष पुरवल्यास रसिक आणि कलावंतांच्या सदिच्छा नक्कीच मिळतील.
सरतेशेवटी, हा प्रयोग ज्या रसिकसंख्येने अनुभवायला पाहिजे, ती संख्या मात्र वाढली पाहिजे. कलावंत, नाट्यसंस्था, नाट्यगृहे, माध्यमे, प्रायोजक सर्व जण आपले काम करीत आहेत. रसिक केवळ प्रतिसाद व प्रत्यक्ष उपस्थिती देवून आपले कौतुकार्थ कर्तव्य परत पूर्वीसारखे कधी करतील, याची आस आहे.

-प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, लातूर
8329032164




