पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षलागवड एकमेव पर्याय
–पालकमंत्री अमित देशमुख
लातूर,दि.02(जिमाका):- निरोगी आयुष्य जगण्यासाठी स्वच्छ हवामान आणि अनुकुल पर्यावरण अत्यंत आवश्यक आहे.त्यामूळे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षलागवड हा एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण , सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी आज तेरणा वसाहत जुना औसा रोड येथे आयोजित ग्रीन लातूर वृक्ष टीम , जलसंपदा विभाग आणि विलासराव देशमुख फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या पुढाकाराने नॅचरल ऑक्सीजन फॅक्टरी प्रोजेक्ट अंतर्गत 4000 वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाप्रसंगी केले.

यावेळी विलासराव देशमुख फाउंडेशनच्या अदिती देशमुख, जलसंपदा विभागाचे रोहित जगताप,धवल मशरू,डॉ.कल्याण बरमदे,डॉ.रमेश भराटे,इंडियन मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ.सुरेखा काळे,औसा नगर परीषदेचे नगर सेवक समीउल्लाह पटेल,डॉ. पवन लड्डा,नगर सेवक सय्यद इमरान, डॉ. भासकर बोरगावकर आदि उपस्थित होते

पुढे पालकमंत्री म्हणाले की लातूर जिल्हा वनसंपन्न व्हावा आणि प्रत्येक घरात एक वृक्ष असणे ही काळाची गरज बनली आहे.लातूर शहराच्या चारही बाजूने 40 टक्के ग्रीन कव्हर करण्याचा शासनाचा मानस असून ग्रीन लातूर वृक्ष टीम या उपक्रमात मोलाचे योगदान देईल असा मला विश्वास आहे.लातूरचा परिसर एकेकाळी वनसंपन्न होता अशी इतिहासात नोंद आहे.तेंव्हा आपण पुन्हा या जिल्ह्याला वनसंपन्न करू आणि त्यासाठी शासन आपल्या पाठीशी आहे. नगरिकांनी आपल्या घरात, परिसरात, वृक्षलागवड करावी ,घराच्या छतांवर टेरेस गार्डन उभारावे.जर आपल्याला झाड लावणे शक्य नसेल तर ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांना आपल्या जन्मदिन,वाढदिवस,आणि इतर प्रासंगिक वेळेत वृक्ष उपहारात या कामाल चळवळीचे रूप द्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी पालकमंत्र्यांनी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे कौतुक करत म्हणाले सन 2015 पासून या स्वंयसेवी संस्थेचे काम सुरू आहे. 2019 पासून ही टीम अविरत अखंडित काम करत आहे.आजपर्यंत 66161 वृक्षांची लागवड करून त्याचे संगोपन आणि व्यवस्थित देखरेख करण्याचे अभूतपूर्व काम ग्रीन लातूर वृक्ष टीमने केले आहे.भविष्यात आपल्या कार्याची गती आणि व्याप वाढविला आणि त्याला आधुनिक्तेची जोड दिली तर या शहरात फॉरेस्ट इन द सिटी(शहरात वन) जनतेला पाहायला मिळेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक इमरान सय्यद यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. भासकर बोरगावकर यांनी व्यक्त केले.











