इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथे श्री संत गाडगे महाराज चॅरिटेबल संस्थेच्या वतीने श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार राजीव आवळे हे प्रमुख पाहुणे म्हणून तर शंकरराव अगसर ,द-याप्पा परीट ,शाहीर संजय जाधव,बंडा परीट,महिला अध्यक्षा नयना पोलादे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गजानन सांस्कृतिक हाॅलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी माजी आमदार राजीव आवळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले.यानंतर श्री संत गाडगे महाराज चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष आनंदा शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.प्रास्ताविकात त्यांनी संत गाडगे महाराज चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगांना तीन चाकी सायकल वाटप ,गरजू व गरजू महिलांना साडी वाटप ,दिव्यांगांचा वधु – वर मेळावा यासारखे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगून भविष्यात संस्थेच्या माध्यमातून वृध्दाश्रम व सांस्कृतिक हाॅल सुरु करण्याचा मानस असल्याचे सांगितले.तसेच धोबी समाजाला संघटित करतानाच त्यांच्या न्याय हक्कासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे , असे आवाहन केले.

यावेळी प्रमुख पाहुणे माजी आमदार राजीव आवळे यांनी संत गाडगे महाराज यांचे विचार मानवजातीला प्रेरणा देणारे आहेत.हेच विचार घेऊन संत गाडगे महाराज चॅरिटेबल संस्था कार्यरत आहे ,हे निश्चितच आदर्शवत व अनुकरणीय आहे.परीट समाजाने संघटीत होवून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.या समाजाचे आरक्षण व इतर प्रश्न सोडवण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या माध्यमातून निश्चित प्रयत्न करणार असल्याचे सांगून भविष्यात संत गाडगे महाराज चॅरिटेबल संस्थेच्या कार्याला आर्थिक व विविध स्वरुपात मदतीचा हात देण्यासाठी कटीबध्द राहू ,अशीही त्यांनी ग्वाही दिली.
यावेळी शंकरराव अगसर यांनी संत गाडगे महाराज यांनी अज्ञान , अंधश्रद्धा व अस्वच्छता दूर करण्यासाठी किर्तनातून समाजाचे प्रबोधन केले.त्यांचे विचारच समाजात मोठे परिवर्तन घडवू शकतात.त्यामुळे भविष्यात हे विचारच घेऊनच समाजाला संघटीत करुन न्याय हक्काची लढाई करावी लागेल.याची जाणीव ठेवून आता संघटीतरित्या प्रयत्न होण्याची गरज विषद केली.यावेळी ट्रस्टचे सल्लागार समिती सदस्य ॲड.राजीव शिंगे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी लाॅर्ड बालाजीचे दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे माजी आमदार राजीव आवळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महिलांनी संत गाडगे महाराज यांची पदे सादर करुन या संत गाडगे महाराज पुण्यतिथी सोहळ्याला रंगत आणली.
या कार्यक्रमासाठी श्री संत गाडगे महाराज चॅरिटेबल संस्थेचे राजू शिंदे , प्रकाश शिंदे , सुभाष परीट ,दिलीप शिंदे , राकेश परीट ,पूजा मडिवाळ ,यांच्यासह सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी परीट समाजातील महिला , पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार प्रदर्शन नयना पोलादे यांनी केले.




