गावचा कारभार हाकणारे ‘कारभारीही’ संभ्रमात
निकालानंतर सर्वच पक्षाकडून ग्रामपंचायतीवर सत्तेबाबत दावे-प्रतिदावे
निलंगा:-(प्रशांत साळुंके)- ग्रामपंचायतीच्या निकालानंतर सर्वच पक्षाकडून गावचा ‘कारभारी’ कोण हे मतदारांनी मतमोजणीतून स्पष्ट केले आहे. मात्र तालुक्यातील भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट या सर्वच राजकीय पक्षाकडून ग्रामपंचायतीवर आमचीच सत्ता असल्याचे दावे-प्रतिदावे करीत आहेत. शिवाय निवडून आल्यानंतर कांही नवनिर्वाचित सरपंच व सदस्य एकापेक्षा अनेक पक्षाचा सत्कार स्विकारत असल्यामुळे आता ‘अहो सांगा कारभारी’ नेमकी सत्ता कोणाची असा पेच निर्माण झाला आहे.
निलंगा तालुक्यातील एकुण ६८ ग्रामपंचायतीपैकी सहा ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या असून ६२ ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या आहेत. मंगळवारी ता. २० रोजी मतमोजणी झाल्यानंतर अनेक गावात प्रस्थापितांना धक्के देत नवख्यांना मतदारांनी संधी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत विकास साधण्याची शेवटची संस्था असल्यामुळे यास अधिक महत्त्व असते निवडणूकीत खरे चित्र पाहता अतिशय अटीतटीची रस्सीखेच कार्यकर्ते करीत असतात स्थानिक परस्थिती वेगळी असल्याने कुठे भाजप-काँग्रेस, कुठे शिवसेना भाजपा, तर कुठे महाविकास आघाडी तर कुठे भाजपा व काँग्रेसमध्ये गटबाजी असे चित्र होऊन तिरंगी, चौरंगी लढती यावेळी झाल्या आहेत. शिवाय महीलांचा व युवकांचा या निवडणूकीत मोठा सहभाग राहील्याने बहूतांश ग्रामपंचायतीत तरूण उमेदवाराना संधी प्राप्त झाली आहे.
तर तालुक्यातील मसलगा, शेंद, निटूर, मुगाव यासह आदी गावामध्ये पूर्वीच्या सरपंचानी शासनाचा निधी खेचून आणून विकास साधण्याचा प्रयत्न केला मात्र मतदारांनी येथे विकासाला थारा दिला नाही. त्यामुळे विकास करूनही मतदार सत्ता परिवर्तन करत असतील तर विकास हा फार्म्युला दुरापास्त झाला असाच म्हणावे लागेल.
सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत असलेल्या दापका ग्रामपंचायतीवर पुन्हा लाला पटेल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस विजयी झाले येथे मुस्लिम विरूद्ध हिंदू असे जातीय समीकरण निर्माण केले. मुस्लिम समाजाचे केवळ पाचशे मतदान आहे तर हिंदू समाजाचे सर्वाधिक मतदान असूनही मुस्लिम समाजाचे लाला पटेल यांचा विजय झाला येथे जातीय समीकरण चालले नाही. लाला पटेल यांनी कधीच जातीवाद केला नाही. सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन त्यांनी कार्य केले म्हणून १५ वर्षापासून निर्विवाद सत्ता ताब्यात ठेवली आहे. निकालानंतर भाजपाकडून ६८ पैकी ५५ ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आल्या असल्याचा दावा केला आहे तर काँग्रेसने ६८ पैकी ४० ग्रामपंचायती आमच्या विचाराची सत्ता असल्याचा तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट यांनीही कांही ग्रामपंचायती आमच्या पक्षाच्या ताब्यात आल्या असल्याचे पत्रकाद्वारे कळवले आहे. शिवाय गावच्या विकास साधण्यासाठी कांही नवनिर्वाचित सरपंच व सदस्य विविध पक्षाचा सत्कार घेत असल्याने ग्रामपंचायतीवर सत्ता नेमकी कोणाची असा सवाल मतदार व कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. थेट जनतेतून सरपंच पद असल्याने कांही गावामध्ये सरपंच एका पक्षाचा तर सदस्य दुसऱ्या पक्षाचे निवडून आले आहेत तर कांही ग्रामपंचायतीवर सदस्य एका पक्षाचे अन् सरपंच अन्य पक्षाचा असे चित्र निर्माण झाल्याने गावचा विकास साधण्यासाठी एकमताने काम करावे लागणार आहे तरच मतदारांनी दिलेला कौल सार्थक झाला अशी भावना मतदारांच्या मनात निर्माण होणार आहे.




