*ना शेत, ना दुकान, ना खावयास अन्न, ना कपडे, ना घर राहिले. त्या काळरात्रीत कित्येक परिवार पराधीन झाले.*
महाराष्ट्र करोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरतच होता त्यात आधी आलेले तौतके चक्रीवादळ आणि आता महाराष्ट्राचे पश्चिम किनारपट्टी, कोल्हापूर, सांगली आणि सातारा महापुराच्या विळख्यात आले होते. अश्या एका मागोमाग एक आलेल्या नैसर्गिक आपत्तीनीं सामान्य जनांचे अतोनात नुकसान केले, अगदी होत्याचे नव्हते झाले !
दिनांक 21-22-23 जुलैला आलेल्या महापुरात चिपळूण महाड आणि पाटण तालुक्यात अपरिमित नुकसान झाले. जमिनीपासून 10 ते 14 फुट वर जे जे काही होते ते ते सारं पुराचा ग्रास झाले.
ज्ञान प्रबोधिनीने मात्र लगेचच 24 जुलैला मदतीचा हात देत चिपळूणला पोहचून मदत कार्य सुरूही केले. अजूनही पुराचे चटके फार तीव्र होते, सगळीकडे 3-4 फूट गाळ चिखल-घाणीचे साम्राज्य होते. असे असूनही अन्न धान्य गरजेच्या वस्तू कपडे यांची मदत सुमारे 1500+ घरात पर्यंत आणि 18 गावात वैयक्तिक जाऊन केली.
प्रसाद दादाने आवाहन केले की चिपळूण ला जाऊन तिथली परिस्थती पाहून काही वेगळी आणि लॉंग टर्म मदत होईल का हे पाहता येईल. कारण, इतर सेवाभावी संस्थांकडून बरीच मदत आता पोहचत होती. त्याप्रमाणे सौरभ शेंडे आणि मी 31 जुलैला सकाळी चिपळूणला पोहचलो. श्री गोखले यांच घर तिथे येणाऱ्या सगळ्यांसाठी बेस कॅम्प म्हणून झालं होतं.
अगदी विशीतले प्रबोधिनीचे स्थानिक कार्यकर्ते (सोहम, हर्षद, स्वानंद, स्वराज,…) पुर-परिस्थितीत मदत कार्याचे हे शिवधनुष्य लीलया पेलत होते. संघटन कौशल्य आणि अतिशय विचारपूर्वक सखोल नियोजन, निकषांवर आधारित परिणामकारक मदत या तत्वांवर प्रबोधिनीचे काम अतिशय शिस्तबद्ध चालते याचा परिचय नेहमीच आपल्याला आला आहे. त्यामुळे आपण तिथे जाऊन काय आणि कसे करणार? आपण कोणास काय विचारणार? काय व्यवस्था असणार? याचा मनात विचारच आला नाही. फक्त जाऊन तिथल्या यंत्रणेचा भाग व्हायचे आणि आपला हातभार द्यायचा एवढेच मनात होते.
आम्ही पोहचताच श्रीराम इनामदार टीमसोबत जिल्हान्यायालय समोरच भेटला. तळावर (बेस कॅम्प) गेल्यावर त्याने आम्हाला थोडक्यात झालेल्या कामाचा आढावा देऊन आम्हास शहरातल्या छोटे दुकानदार- व्यावसायिक यांची भेट घेऊन त्यांच्या गरजा जाणून घेण्यास सांगितल्या. 24 जुलै पासून (८ दिवस) तिथे राहून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी अतिशय दुर्धर असे मदतकार्य केलं होत. अन्नधान्य-कपडे इतर गरजेच्या वस्तू असलेलं किट्स वाटप तसच कित्येक घरांची-दुकानांची साफसफाई त्यांनी केली होती. रस्त्यांवरील-घरातील बराच गाळ- कचरा आतापर्यंत काढण्यात आला होता. आमचा निरोप घेऊन श्रीराम दादा आणि टीम पुण्याला रवाना झाले. त्याच दिवशी संध्याकाळी आदित्य दादा येणार होता असे समजले. त्यानंतरचे दोन्ही दिवस आदित्य दादा आमच्या सोबतच जेवायला तळावर यायचा. त्यात तो आम्हाला काय हवं नको ते विचारात होता आणि महत्वाचे मार्गदर्शनही करत होता. रविवारी प्रबोधिनीच्या महिला गटाचा 10 जणींचा मुलींचा ग्रुप तिथे मदत कार्यासाठी आला होता.
*कष्टाने पै पै जमा करून उभं केलेला डोलारा एक रात्रीत कोसळला. मागे राहिला फक्त गुढगाभार गाळ!*
या दोन दिवसात प्रभात गल्ली बाजार पेठ, गुहागर रोड बाजारपेठ, चिंचनाका, मेन बस स्टँड बाजार पेठ या ठिकाणी असलेल्या साधारण 23 अतिलघु, लघु-मध्यम उद्योजकांशी संवाद साधून त्यांच्या वर ओढवलेल्या संकटाची जाणीव करून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. प्रत्येकजण आपला अनुभव सांगत होता; आसवांना त्यांनी कसे बसे आवर घातले होता पण पुढे काय होईल याची कुणालाही शाश्वती नव्हती. एकच गोष्ट निश्चित होती की काहीही झाले असले तरी पुन्हा नव्याने सुरुवात ही करायचीच आहे आणि त्यावाचून आता गत्यंतर नाही.
कुणाचे अगदी दोनच खुर्च्यांचे घराला लागून असलेले सलून त्यातील आरसे-खुर्च्या-फर्निचर-अगदी दरवाज्यांसकट सगळं वाहून गेले होते, कित्येकांच्या रिक्षा गाळाने भरून निकामी झाल्या होत्या, तर कुणाचे मोबाइल/घड्याळ/इलेक्ट्रिक मोटर दुरुस्थीच्या दुकानातल सामान हत्यारां सकट वाहून गेल होत, कुणाच्या कपड्यांच्या दुकानातला माल गेला होता तर शिलाई मशीनस निकामी झाल्या होत्या, फूल आणि पूजा साहित्य विक्रेते- किरकोळ समान विक्रेते याचेही प्रचंड नुकसान झाले होते. कित्येकांनी कर्ज काढून नुकताच व्यापार सुरू केला होता. घरी खाणारी दहा तोंडे पण कमावणारी व्यक्ती एक अशी अवस्था असणारे चना भंडार दुकानदार दुकानाची भिंत कोसळून मुद्देमाल वाहून गेल्याने आज त्यांना 200 रुपये रोजंदारीवर काम करण्याची वेळ आली होती. कोणाचे वडील पायाला झालेल्या दुर्धर आजाराने ग्रस्त तर घरी आई शिवण काम करून मुलांना शिकवत संसाराचा गाडा पुढे नेत होती मात्र आता घरात काही काही उरले नव्हते. घरातले सगळे सामान, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे लत्ते, भांडी, कागदपत्रे सगळं सगळं वाहून गेले.
मध्यमश्रेणीतल्या लघुउद्योगांची समस्या आणि गरज वेगळीच होती. त्यांची उलाढाल पाहता low interest loan किंवा insurance claim settlement साठी मदत ही प्रमुख गरज भासली. कारण पूरपरिस्थिती यानंतर त्यांना येणारे ह्या यंत्रणांचे अनुभव फारसे चांगले नव्हते.
*मन पिळवटून टाकणार संकट कोसळले – आंबेघर, पाटण*
आंबेजोगाईतल्या सहकाऱ्यांचा पाटण परिसरातील प्रत्यक्ष घेतलेला अनुभव खुपचं विदारक आहे. पाटण तालुक्यातील (कराड चिपळूण रस्त्यावर घाट ओलांडण्यापूर्वी) आंबेघर, मिरगाव, ढोकवले येथे दरड कोसळून साधारण 32 जणांना आपले प्राण गमवावे लागले. रस्ते-पायवाटा वाहून गेल्याने गावचा जगाशी संपर्क अजूनही तुटलेला आहे. तिथे कोणतीही शासकीय मदत अजून पर्यंत पोहचू शकली नाही. आंबेजोगाईतल्या आपल्या मित्रांनी चिखलात पायी 7-8 km चालत जावे लागले. आंबेघर मधली 15 घरे रात्रीतच दरड कोसळून गाडली गेली होती अंदाजे सरकारी आकड्यानुसार 15-16 जणांनां आपले प्राण गमवावे लागले. त्या माती दगडांच्या प्रचंड ढिगाऱ्यात एक नवजात बालक आजूनही बेपत्ता होते. कित्येक गुर ढोर दावणीला बांधलेली असल्याने जागच्या जागीच मृत झाली होती. डोंगर खचल्याने डोंगरालगतची शेती नाहीसी झाली होती, नदीकाठची शेती वाहून गेली. तिथल्या कच्च्या घरांना भेगा पडल्या होत्या, डोंगर खचल्याने काही घरांच्या पाठभिंतीला अगदी डोंगर येऊन टेकला होता, भिंतींना ओलावा आणि जमिनीतून सतत निघणारे पाणी यामुळे घरात रहाणे वावरणे म्हणजे संकटाला आणि आजाराला आमंत्रण देण्यासारखे आहे. काहींना घरातल्या जमिनीवर साड्या अंथरून त्या ओलाव्यावर कसाबसा वावर करत होते.
*रुपेश उबाळे (ठाणे) / सौरभ शेंडे (मुलुंड)*
प्रबोधक परिवार, ज्ञान प्रबोधिनी