- धर्माप्रमाणे आचरण ठेवल्यास जीवन यशस्वी
निलंगा-(प्रशांत साळुंके)-
श्री ष.ब्र.१०८ तपोनिधी सांब शिवयोगीश्वर महाराजांमुळे निलंगा तालुक्यातील निटूर गावची महती जगभरात आहे. तपोनिधी ही उपाधी केवळ श्री सांबा स्वामी महाराजांना प्राप्त झालेली आहे. प्रत्येक व्यक्तीने धर्माप्रमाणे आचरण ठेवल्यास जीवनात निश्चितपणे यश मिळते. असे प्रतिपादन उपाचार्यरत्न बालतपस्वी द्वितीय सांब स्वामी महाराज यांनी कथेच्या दुस-या दिवशी दि.१७ रोजी केले. ते निटूर, तालुका निलंगा येथे दिनांक १७ फेब्रुवारी रोजी ष.ब्र.१०८ तपोनिधी सांब शिवयोगीश्वर महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित श्री सांब कथेत बोलत होते. प्रति वर्षाप्रमाणे निटूर येथे श्री तपोनिधी सांबस्वामी महाराज यांचा जन्मोत्सव भव्य स्वरूपात आयोजित केला जातो. दिनांक १६ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत यावर्षीचा १३३ वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा होत आहे.
उपाचार्यरत्न बालतपस्वी द्वितीय सांब स्वामी महाराज आपल्या अमृतवाणीत पुढे बोलतांना म्हणाले,
श्री तपोनिधी सांबस्वामी महाराज यांची आई नीलम्मा यांनी श्री सांब महाराजांना गर्भात असतानाच संस्काराचे धडे दिले.ते तपस्वी होते.मानव धर्म हाच खरा धर्म आहे.आई वडीलांचा व जेष्ठांचा आदर करा.श्री सांब महाराजांना रिद्धी सिद्धी प्राप्त होती.आयुर्वेदाच्या अभ्यासातून त्यांनी हजारो रूग्णांना आजारातून मुक्त केले.प्लेग सारख्या महाभयंकर आजारातून अनेकांना जीवन दिले.
आयोजित श्री सांब कथेस महीला पुरूषांची मोठी उपस्थिती होती.संगीत व तबल्याची साथ इराम्मा स्वामी यांनी दिली.कांताप्पा बुडगे, प्रभुअप्पा बोळेगावे, अजित मठपती, रवी मठपती, विठ्ठल बुडगे,बालाजी अंबेगावे, विठ्ठल डांगे,त्र्यंबक तत्तापुरे,कुमार डांगे, केदार मठपती,भागवत सुतार यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.