22.3 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeसाहित्य*'गझल श्लोकाच्या जवळ जाणारी असते'*

*’गझल श्लोकाच्या जवळ जाणारी असते’*


सुप्रसिद्ध गझलकार चंद्रशेखर सानेकर यांचे मत

कोल्हापुर ता.११ गझलेचे तत्व हे प्रत्येक मातीमध्ये असते, भाषेमध्ये असते. अर्थातच ते मराठीतही आहे. प्राचीन काव्य प्रकाराशी शेरांचे नाते जुळलेले आपल्याला दिसते. गझल ही अरबी, उर्दू असा प्रवास करत मराठीत आली. गझलेला कालवश सुरेश भट यांनी अस्सल मराठीत मोठ्या ताकतीने मांडले. बारकाईने विचार केला तर गझल ही श्लोकाच्या जवळ जाणारी आहे.कारण खयाल, दृष्टांत,प्रत्यय या साऱ्याची अनुभूती शेरामधून येत असते ,असे मत सुप्रसिद्ध कवी आणि ज्येष्ठ गझलकार चंद्रशेखर सानेकर (मुंबई) यांनी व्यक्त केले.ते गझलसादच्या वतीने ‘गझलच्या उजेडात गझल’ या दिलखुलास गप्पा आणि गझलांच्या कार्यक्रमात बोलत होते.

प्रारंभी गझलसादचे निमंत्रक प्रा.नरहर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.सुभाष नागेशकर यांनी पाहुण्यांचे ‘आमची गझलसाद’ हा संग्रह देऊन स्वागत केले.सारिका पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वाची कामगिरी केल्याबद्दल विहार सरदार यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
या गप्पांचे सुसंवादक म्हणून गणेश मनोहर कुलकर्णी (मुंबई) यांनी सानेकर यांना बोलते केले. सानेकरांचे लेखन, त्यांची गझलेकडे व कवितेकडे बघण्याची दृष्टी ,चाळीस वर्षाच्या लेखन वाटचालीतील अनुभव , जागतिकीकरणानंतर बदलत्या सामाजिक जाणीवा,आजचे वर्तमान आदी अनेक विषयांवर गणेश कुलकर्णी यांनी सानेकरांना प्रश्न विचारले आणि हा संवाद रंगतदार केला.

चंद्रशेखर सानेकर म्हणाले,संगीता प्रमाणे गझल शिक्षण गरजेचे असते. पण अल्पाक्षरांमध्ये उत्तुंगता गाठण्यासाठी कवीची वैचारिक सक्षमता ,प्रतिभा महत्त्वाची असते. जीवन गतिमान झाल्याने आता तपशीलात्मक आणि वर्णनात्मकतेला मर्यादा आलेल्या आहेत. कलावंताला काळाची आव्हाने पेलण्यासाठी सूक्ष्मातून प्रवास करावा लागतो. साध्या माणसांची संवादी भाषा कवितेसाठी, गझले साठी आवश्यक असते. संत साहित्याप्रमाणेच गझलेने व्यक्तिगत, वैश्विक दुःखे आणि विषय हाताळलेले आहेत.एक प्रकारची वेगळी संवेदनशीलता गझलेतून स्पष्ट होत असते.

आपली भूमिका मांडत असतानाच चंद्रशेखर सानेकर यांनी अनेक गझला व सुटे शेर यावेळी पेश केले.या सृष्टीचे हरेक कंपन मला वाटते मोलाचे,कुणास ठावूक शेर गझलचा येईल कुठल्या वाटेने… ,ती मोत्यांची रास समजुनी दुनिया खूप हरखली,माझ्या हाती वाळू होती ,इतकी कशी चमकली ?,मी पत्यांचा एक छान बंगला बांधला आहे,अन् एका झुळकीला माझा नाद लागला आहे…,तुझ्या नदीच्या लाटा भिडल्या तिच्या नदीवर असताना,तुझ्या बरोबर वहात जातो तिच्या बरोबर असताना.. अशा अनेक आशय संपन्न शेरांना, गझलांना रसिकांनी भरभरून दाद दिली.

घर सुभाष नागेशकरांचे,जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या महालक्ष्मी हॉल समोर, साईक्स एक्स्टेंशन ,कोल्हापूर येथे झालेल्या या कार्यक्रमास प्रसाद कुलकर्णी, डॉ. दिलीप कुलकर्णी ,अशोक वाडकर ,हेमंत डांगे ,सुभाष भुरके ,अभय वडकड , आय.जी.शेख, विजय पत्रावळे,खलील मोमिन, अविनाश शिरगावकर ,सुरेश श्रीखंडे, किशोर महाजन ,अजित कुलकर्णी ,शिरीष वणकुद्रे ,डॉ. रसिका देशपांडे, डॉ.अनमोल कोठाडीया, निनाद खाडिलकर,अमृता खानोलकर ,पुंडलिक कांबळे , ए. आय. बागवान ,अर्चना वाडकर, अस्मिता वाडकर, मनीषा पत्रावळे, आप्पासाहेब मेथे- पाटील ,संतोष अकोलकर, अरविंद कुलकर्णी, सुरेश पाटील ,राजन बागणे, डी.आर. डोईफोडे, प्रमोद गिरी यांच्यासह मोठ्या संख्येने गझल काव्य रसिक उपस्थित होते.डॉ.दयानंद काळे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]