कोरोना जागर उपक्रम

0
316

सावध राहिलो तरच कोरोनाच्या

 तिसऱ्या लाटेचा संभव टळू शकतो

– डॉ. प्रिया देशपांडे 

सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान

व मराठी विज्ञान परिषदेतर्फे कोरोना जागर उपक्रम 

लातूर –कोरोनाची तिसरी लाट अदृश्य असून तिचा तीव्र प्रसार होण्याचा संभव टाळण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने निर्बंध आणि नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जनआरोग्य वैद्यकशास्त्राच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) यांनी व्यक्त केले. सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व त्याअंतर्गत असलेल्या मराठी विज्ञान परिषदेच्या पानगाव विभागातर्फे आयोजित ‘कोरोना जागर’ उपक्रमांतर्गत दूरसंपर्क परिसंवादाच्या दहाव्या सत्रात त्या बोलत होत्या.

कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी केवळ शासन, प्रशासन यांवर अवलंबून न राहता, वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक आरोग्य नियमावलीचे पालन करणे अत्यावश्यक आहे व जागतिक पार्श्वभूमीवर अभ्यास केला असता, भारतात लसीकरण आणि आरोग्य चिकित्सा मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे, असे मत डॉ. प्रिया देशपांडे यांनी व्यक्त केले. कमकुवत, रोगप्रवण अवस्था असलेल्यांनी लक्षणांची शंका जरी आली तरी ताबडतोब चाचणी करून घेणे आणि त्यानुसार आपले आणि कुटुंबियांच्या दैनंदिन वर्तनप्रणालीत तातडीने बदल करणे हा सुरक्षित उपाय ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले. जागतिक व राष्ट्रीय पातळीवरील संशोधन व सर्वेक्षणातून निर्माण करण्यात आलेल्या एसआयआर मॉडेल, एमआयएससी या संकल्पनांची सचित्र माहिती देवून लसीकरणाच्या प्रमाणाचाही आलेख त्यांनी सादर केला. कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक सूत्रीचे पालन आवश्यक असून नियम पाळणाऱ्यांची संख्या वाढली, तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचाही प्रतिबंध शक्य आहे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. व्याख्यानानंतर श्रोत्यांच्या शंकांचेही समाधान करण्यात आले. सूत्रसंचालन उपक्रमाचे समन्वयक डॉ. मुकुंद भिसे यांनी केले.

कार्यक्रमास मराठी विज्ञान परिषदेच्या मध्यवर्ती विभागाचे माजी कार्यवाह दिलीप हेर्लेकर, शिक्षणतज्ज्ञ भाऊ गावंडे, किशोर कुलकर्णी (मुंबई), अॅड. रजनी गिरवलकर, माजी अधिष्ठाता डॉ. जे.जे. देशपांडे, डॉ. बसवराज नागोबा, डॉ. एम. आय. बेग, डॉ. सदानंद कुलकर्णी, डॉ. संपदा गिरगावकर, मिलिंद बाभुळगावकर, सौ. अरुणा काळे-ताथोडे, दत्ता कुलकर्णी, मुरलीधर डोणे, वैजनाथ चामले या मान्यवरांसह मोठ्या प्रमाणावर श्रोत्यांची हजेरी होती.

निरंतर चालणाऱ्या या उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वात लवकरच कोविडमुक्त रुग्ण, प्रशासकीय अधिकारी, संशोधक, डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचारी अशा अनेकांचे अनुभवकथन आणि मार्गदर्शनासह खुले सत्र आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे सचिव डॉ. संतोष कुलकर्णी यांनी दिली. त्याचप्रमाणे कोरोनाविषयक संकलित माहितीच्या संग्राह्य अशा डिजिटल अंकाचे प्रकाशन व आधारे विद्यार्थ्यांसह जनसामान्यांसाठी कोरोना ज्ञानचाचणीचे आयोजन करण्यात यणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here