प्रासंगिक
कानडा राजा पंढरीचा म्हणजे वारकऱ्यांचे आराध्य दैवत. महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्रप्रदेश इत्यादी राज्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान म्हणजे श्रीक्षेत्र पंढरपूरचा पांडुरंग. पवित्र भीमा नदीच्या काठावर वसलेले पंढरपूर म्हणजे वारकरी संप्रदायाचा जणू स्वर्गच. नदीपात्रातले भक्त पुंडलिकाचे मंदिर आणि समोर श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर म्हणजे भागवत धर्माच्या समस्त वारकऱ्यांचे जणू माहेरच. आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण आलेला दिवस. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला तर जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी त्यावर कळस चढविला आहे. म्हणून आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र आळंदी येथून ज्ञानेश्वर माऊली यांची तर श्रीक्षेत्र देहुगाव येथून जगदगुरु तुकाराम महाराज यांची पायी वारी पालखी घेऊन पंढरीला दर्शनासाठी निघते.
देहू आणि आळंदी येथून पालखी सोबत लाखो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पायी चालू लागतात. खांद्यावर भगव्या पताका, गळ्यात टाळ आणि मृदंगाच्या निनादात ज्ञानोबा तुकारामाचा गजर करीत लाखो महिला पुरुष अबाल वृद्ध या पालखीसोबत पायी दिंडीमध्ये भक्तीभावाने सहभागी होतात. पुणे शहरातून हडपसर मार्गे कात्रज घाटातून सासवडच्या दिशेने नागमोडी वळणे घेत ही पालखी पंढरीच्या दिशेने जाताना वारकऱ्याच्या आनंदाला पारावार ऊरत नाही. वर्षभर आपल्या शेतात काबाडकष्ट करणारा शेतकरी, शेतमजूर यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, उद्योग, व्यवसाय या क्षेत्रासह शासकीय, निमशासकीय सेवेमध्ये असणारे विठ्ठल भक्तही या पालखी दिंडी सोबत अत्यंत भक्तिभावाने सहभागी होतात.

भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी…. धनी मला बी दाखवा ना विठुरायाची पंढरी..!
म्हणून शेतावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कारभारणी सुद्धा आपल्या व ओतप्रोर्थ असलेल्या विठ्ठल भक्तीचे दर्शन या वारीमध्ये येऊन घडवितात. कात्रज घाटातून सासवड मार्गे तसेच श्रीक्षेत्र जेजुरी मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या या पालखीसोबत नागमोडी वळणे घेत वारकरी आनंदाने अभंग भारुड यांच्या मध्ये तल्लीन होऊन नाचू गाऊ लागतात. मजल दरमजल करत रस्त्यावर अनेक ठिकाणी मुक्काम करीत या पालख्या पंढरीच्या दिशेने चालू लागतात. श्री संत एकनाथ महाराज पैठण, श्री संत गजानन महाराज शेगाव, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत सोपान काका, संत निवृत्तीनाथ यांच्या कार्यक्षेत्रातील हजारो भाविक दिंड्या घेऊन पंढरीमध्ये आषाढी एकादशीला दाखल होतात.
आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठल दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, विविध प्रतिष्ठान, उद्योगपती, व्यापारी यांच्याकडून चहा, नाश्ता, भोजन, निवास तसेच पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून साहित्य इत्यादी मदत सढळ हाताने करून मानवतेचे दर्शन घडवितात. फुलांनी सजविलेल्या पालखीसोबत पायी चालत असताना रस्त्याच्या दुतर्फा निसर्ग रम्य वनराई, नदी, नाले पार करीत चालत असताना वारकऱ्याच्या आनंदाला उधाण आलेले असते. पवित्र इंद्रायणी काठी वसलेल्या श्रीक्षेत्र देहू आणि आळंदी येथून श्री क्षेत्र पंढरपूर पर्यंतचा पालखी मार्ग विकसित करण्याचे कार्य केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारत असल्यामुळे वारकऱ्यांना या वारीतून चालताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. पालखीच्या विश्रांतीच्या काही ठिकाणी दैदिप्यमान गोल रिंगण तर काही ठिकाणी डोळे दिपवून टाकणारे उभे रिंगण पाहण्यासाठी व पालखी दर्शनासाठी महाराष्ट्राच्या व कर्नाटक राज्यातील कानाकोपऱ्यातून विठ्ठल भक्त भक्ती भावाने हजेरी लावतात. यावर्षी तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री टी. चंद्रशेखर राव यांनी आपल्या हजारो चहात्यांना सोबत घेऊन पांडुरंगाचे दर्शन घेतले. संत दामाजीपंत, संतश्रेष्ठ नरहरी महाराज, संत कान्होपात्रा, संत चोखामेळा, संत गोरोबाकाका यांच्यासह ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्यासारख्या अनेक संताचा वारसा लाभलेली महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे म्हणून जात, धर्म, पंथ, लिंगभेद विसरून सर्व घटकातील वारकरी पालखी दिंडीमध्ये भक्तीने एकरूप होऊन फुगड्यासह इतर संताचे खेळ खेळतात. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला वाखरी येथे शेवटचे दैदीप्यमान रिंगण व त्या रिंगणामध्ये वायुगतीने फिरणारा घोडा पाहून वारकऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटते व देहू आळंदी येथून पंढरपूर पर्यंत चालत आल्याचा थकवाही कधी निघून गेला हे कळत नाही. यावर्षी अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे मान्सून समुद्रातच भरकटल्यामुळे पावसाचे आगमन लांबणीवर पडले.

8 जून रोजी मृग नक्षत्राचे आगमन झाले असले तरी जून महिना संपत आला असताना पाऊस नसल्याने शेतकरी वर्गात मात्र मोठ्या प्रमाणात चिंता पसरली आहे. खरीप पेरण्या लांबणीवर पडल्यामुळे यावर्षी पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून 10 लाखापेक्षा जास्त भाविक पंढरीत दाखल होतील असा अंदाज आहे. वारकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता दर्शनाची व्यवस्था करण्यासाठी मंदिर समिती तसेच पंढरपूर नगरपरिषद व पोलीस यंत्रणा यांच्या व्यवस्थेवर ही ताण पडणार आहे. परंतु वारकऱ्यांची अढळ श्रद्धा, पांडुरंगाची कृपा यामुळे हे सर्व आव्हान पेलण्याची क्षमता ईश्वर भक्तीने सर्व व्यवस्थापकांच्या मध्ये निर्माण होईल यात शंका नाही. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर व त्यांचे सर्व सन्माननीय सदस्य हे विठ्ठल भक्ताच्या सर्वतोपरी व्यवस्थेसाठी प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पहाटे 3 वाजता सपत्नीक मानाच्या वारकरी जोडप्यासोबत श्री विठ्ठलाची महापूजा करतील आणि भरपूर पाऊस पाणी पडू दे… लिंबू राळा पिकू दे..! म्हणून विठ्ठलाला साकडे घालतील आणि सुजलाम-सुफलाम व महाराष्ट्राच्या शांततामय समाज निर्मितीसाठी प्रार्थना करतील.
” विठ्ठल नामाची शाळा बघा भरली शाळा शिकताना तहान भूक हरली.”………
मणी पांडुरंग….ध्यानी पांडुरंग…

राम कांबळे ,औसा
9021366755
( लेखक हे औसा येथील जेष्ठ व अभ्यासू पत्रकार आहेत )




