सफरचंद – खरं म्हणजे केवळ एक फळ ! पण त्याचं रंगरूपही विशिष्ट ! लाल … रक्तिम फळ … !
पण त्याला कुणाचं रक्त लागलेलं असेल, तर … !
आपल्या काश्मीरमधील ह्या फळाला असंच काही झालं आहे का ?
ते इतकं असं काही करपलं आहे का कि, त्याला जणू आदिम स्त्री-पुरुषानं खाल्लेल्या विषफळाचं रूप आलेलं असावं ?
मात्र या फळाला अजून एक बाजू आहेच. आदिपुरुष आणि आदिस्त्रीनं खाल्लेलं ते फळ त्यांच्या निर्भेद आणि निरागस प्रेमाचं प्रतीक मानता यावं. कृत्रिम भूरेषा निर्माण करणाऱ्या वृतींनी त्या प्रेमाला आणलेल्या बाधा, ज्या निरागस प्रेरणांनी ते फळ आदिमांनी खाल्लं त्या फळालाही बाधित करून गेल्या. ह्या कृत्रिम वृत्ती बाजूला सारून पाहिल्या तर कदाचित ते निरोगी आणि स्वच्छ दिसेल आणि माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर परमकर्तव्य आणि परमवैशिष्ट्य म्हणता येईल ते निरलस प्रेम, ती निर्व्याज मानवता आणि मुख्य म्हणजे माणूसपण जपण्या-जोपासण्याचे मार्ग दिसू शकतील. अशावेळी निष्प्रभ होतील बॉम्बस्फोट आणि गोळीबार … आणि नाहीशी होईल अंदाधुंद … !
हाच संदेश देणारे नाटक म्हणजे ‘ सफरचंद ’ !

स्वच्छ, स्पष्ट आणि सकस कथानक, अंतर्मुख करणारे संवाद, तशीच साजेशी संवादफेक, तादात्म्याशीही प्रामाणिक अभिनय …. आणि या सर्व अंतरंगांना अधिक सुंदर करणारे विशेष असे नाटकाचे सर्व बहिरंग … ! चकित करणारे नेपथ्य, मनाला गूढ आनंद देणारे संगीत आणि प्रसंगांना अनुरूप असा दृश्यविलास म्हणजे ‘ सफरचंद ’ हे नाटक.
रंगमंचावर काय काय दाखवणं शक्य आहे याची प्रचीती प्रत्यक्ष देणारा नाट्यानुभव !
सुंदर, तसाच मनाला गवसणी घालणारा, अंतर्मुख करणारा हा नाट्यप्रयोग साकारला आहे – शर्मिला शिंदे (‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधली ‘जेनी’), संजय जमखंडी, प्रमोद शेलार, आमीर तडवळकर आणि शंतनू मोघे या बिनीच्या कलाकारांनी. स्नेहा देसाईंच्या लेखनाला मराठी रूप दिलं आहे मुग्धा गोडबोले यांनी आणि दिग्दर्शित केलं आहे राजेश जोशी यांनी. काश्मिरमधल्या घराचं फिरत्या रंगमंचावरचं रम्य दर्शन साकारलं आहे संदेश बेंद्रे यांच्या नेपथ्यानं.
काश्मिरातल्या अतिरेकी कारवायांच्या धांदलीत घडलेली मानवी जीवनाची संघर्षकथा, त्यात दडली-दडपलेली काश्मिरातल्या पाण्याच्या प्रवाहाची तरलता, प्रत्यक्ष गोळीबार बॉम्बस्फोट यांच्या आभासांचा थरथराट आणि दोन प्रेमिक जिवांसह गुंतलेल्या मानवतेची कथा – काश्मिरला वेगळी ओळख देणाऱ्या, काश्मीरच्या अनेक उद्योगव्यवसायांसह तिथल्या निसर्गनिर्मितीचा अविभाज्य अंश असलेल्या रक्तिम सफरचंदांची सकस कथा !
लातूरच्या दगडोजीराव देशमुख नाट्यगृहाच्या रंगमंचावर हे सगळं पहायला मिळणार आहे दि. १६ सप्टेंबर, २०२३ रोजी – इंडियन मेडिकल असोसिएशन, नाट्यस्पंदन प्रतिष्ठान, रजनीगंधा फाउंडेशन आणि सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने.
लातूरकरांना मिळणारी ही अतिशय सुंदर अशी मेजवानी आहे व ती नाट्यप्रेमी आणि सुजाण नागरिकांनी अनुभवली पाहिजे.
© प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, लातूर




