लातूर( वृत्तसेवा )- : लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी माजी पालकमंत्री मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यात जलसाक्षरता अभियान राबविले जात आहे. या अभियानादरम्यान अहमदपूर येथे त्यांच्या या अभियान रॅलीस काळे झेंडे दाखविण्याची दुर्दैवी घडली. त्याचा आपण तीव्र शब्दांत निषेध करतो, असे सांगून अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी पाणी प्रश्नाची सोडवणूक होईपर्यंत आपली संघटना आ. निलंगेकरांसोबत काम करणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.

आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जलसाक्षरता अभियानास लातूर जिल्ह्यात सर्वत्र अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. असे असतानाच अहमदपूरमध्ये शुक्रवारी काही स्वार्थी प्रवृत्तीच्या राजकीय मंडळींनी आपल्या समर्थकांकरवी या अभियानादरम्यान काळे झेंडे दाखविण्याचा निंदनीय प्रकार केला. पाण्याच्या प्रश्नावरून आजपर्यंत एकही मराठा नेत्याने रस्त्यावर उतरण्याचे धारिष्ट्य दाखविले नव्हते. पाणी प्रश्न हा मुळात मराठा वा अन्य कोणत्याही एका समाजाशी संबंधित नसून तो शेतकऱ्यांशी संबंधित आहे. शेतकऱ्यांशी निगडित असणाऱ्या या प्रश्नाबद्दल रस्त्यावर उतरणाऱ्या आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचे आपण सर्वप्रथम अभिनंदन करतो , असे सांगून नानासाहेब जावळे पाटील पुढे म्हणाले की, या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सगळ्याच राजकीय नेत्यांनी एकत्रित येणे काळाची गरज आहे. आ. निलंगेकरांच्या बरोबरीने पुढे येणे आवश्यक आहे. मात्र असे न होता त्यांच्या अभियानात अडथळा आणण्यासाठी असे भ्याड कृत्य करवून घेतले जात आहे. असा प्रकार आम्हीच काय , कोणीही सहन करणार नाही.

आजपर्यंत विविध राजकीय नेत्यांनी पद , सत्तेचा स्वार्थासाठी वापर करून घेण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कोणीही पोटतिडकीने पुढे येताना दिसत नाही. आ. निलंगेकरांनी हाती घेतलेले हे अभियान खरोखरच अभिनंदनीय आहे. त्यामुळे या प्रश्नाची सोडवणूक होईपर्यंत छावा संघटना निलंगेकरांसोबत कार्यरत राहणार आहे. यापुढे असा भ्याड प्रकार घडल्यास तसे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्याच झेंड्याने बदडून काढण्याचे काम छावा संघटना केल्याशिवाय राहणार नाही,असा सज्जड इशाराही जावळे पाटील यांनी यावेळी दिला . या भ्याड प्रकाराच्या माध्यमातून कोणीही आपली राजकीय पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करू नये असेही त्यांनी ठणकावून सांगितले.





