प्रासंगिक
भारतात अश्विन मासारंभाला उत्तर भारत, मध्य भारत आणि दक्षिण मध्ये दसरा,विजया दशमी, दशहरा, नवरात्री महोत्सव हा वेगवेगळ्या नावानी आणि पद्दतीने साजरा होतो.
उत्तरेत याला रामाच्या विजयाशी संबंध लावला जातो, मध्य भारतात असुरांच्यावर विजय मिळविल्याचा दिवस तर दक्षिणेत शैव परंपरेचे धागे पकडून हे दहा दिवस साजरे होत असतात.

शैवा मध्ये शाक्तपीठ हे देवीची आराधना करणारे अत्यंत महत्वाचे शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते. त्यात अश्विन शुद्ध 1 ला देवीची प्रतिष्ठापना होते तर अश्विन शुद्ध दशमी ला विसर्जन होते.
या मागे दुसरी एक घटना आहे, राजा बळीची.. राजा बळी कोण होता हे दंतकथेप्रमाणे लक्षात घ्यायचे झाले तर याची वंशावळ अशी असुर राजा हिरण्यकश्यपू पासून सुरु होते. ऋषी कश्यप ( सप्तऋषींपैकी एक ) आणि दितीचा मुलगा म्हणजे असुर राजा हिरण्यकश्यपू, त्याचा पुत्र प्रल्हाद ( तिच कथा हिरण्यकश्यूपच्या वधाची ).. त्याचा पुत्र विरोचन… आणि विरोचनचा पुत्र राजा बळी.. राजा बळी हा कृषकांचा अर्थात शेतकऱ्यांचा राजा म्हणून ओळखला जात असे.. बाकीची कथा सर्वांना माहिती आहे. अश्विन शुद्ध दशमीला राजा बळीला मारले गेले. त्यावेळी राजा बळीचा मुलगा बाणासुराने प्रजेला धीर देतांना सांगितले की, ‘आपला राजा मेला नाही. तो आपल्याला २१ दिवसांनी भेटायला येणार आहे.’ दसऱ्यानंतर २१ वा दिवस म्हणजे प्रतिपदा. या दिवशी बळीराजा आपल्या दु:खी व कष्टी प्रजेला भेटायला येतो अशी लोकधारणा होती. प्रजा आपले सर्व दु:ख बाजूला ठेवून आनंदाने आपल्या राजाचे स्वागत करते. नवे कपडे, मिठाई, फटाके, रोषणाई अशा जल्लोषात बळीराजाचे स्वागत त्याच मूळ धारणेतून आजही आपण करतो. घराघरात बलिपूजन केले जाते. आणि म्हटले जाते ‘ इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो ‘

आता थोड या मागचं कृषी विज्ञान… 22 सप्टेंबरला सूर्य दक्षिणेकडे सरकायला सुरुवात होते.. ऑक्टोबर मध्ये तो अधिक तापतो ( ऑक्टोबर हिट ) याच काळात अश्विन शुद्ध 1 ला.. पिकपाण्याचा अंदाज म्हणजे हे शेतीची प्रयोगशाळा म्हणून घटस्थापना होते… मातीच्या मडक्यात पाणी टाकून त्याखाली शेतातली मातीचा ढीग करून त्यात तृणधान्य, कडधान्य, भरडधान्य टाकून.. मडक्याचे तोंड ज्वारीच्या कणसाने झाकून त्या घटाची मनोभावे पूजा केली जाते.. अश्विन शुद्ध दशमी म्हणजे दसऱ्या दिवशी विधीवत पूजा करून या घाटाच्या भोवती आलेले धान्य उपडून घेतले जाते. त्यावेळी कोणते धान्य जोमाने आले आहे म्हणजे तृणधान्य की कडधान्य की भरडधान्य हे पाहिले जात ( आता फक्त परंपरा म्हणून लोकं करतात ) आणि त्या प्रयोग शाळेतले उपटलेले धान ज्येष्ठाच्या डोक्यावर असलेल्या शिरस्त्राणामध्ये ( डोक्यावर असलेले पागोटे, टोपी आजच्या अर्थाने ) धान ठेवून पूर्णपणे पायावर डोके ठेवून नमस्कार करायचा आणि ज्येष्ठानी त्यांचे तोंड गोड करायचे.. आम्ही लहान असताना गावशिव ओलांडून शेतात असलेल्या धानाचे धाटे आणि घरी वापलेले धान घेऊन अगोदर मंदिरात जाऊन देवापुढे ठेवून तिथे नतमस्तक व्हायचे आणि घरातले उपटलेले धान हाती घेऊन गावभर पायापडत फिरायचो आणि आमचं तोंडच नव्हे गोड ( कड्कणी ) खाऊन खाऊन पोटच तुडुंब व्हायचे..!!
कृषीसंस्कृती मध्ये प्रत्येक सनाचे महत्व आहेच पण दसऱ्याला मात्र ज्या शेतीवर आपलं पोट अवलंबून आहे त्याचे बीज परीक्षण करण्याचा हा सोहळा म्हणून याला अनन्य साधारण महत्व एकेकाळी तरी होते.. आता परंपरा म्हणून हा साजरा होतोय.. यामागची कथा, दंतकथा आणि थोडस शास्त्रीय अंगही कळावे म्हणून हा लेख प्रपंच…!!

@युवराज पाटील
(लेखक :लातूर जिल्हा माहिती अधिकारी आहेत )




