पालकमंत्र्यांनी कोरोना व्यवस्थापन खर्चाची श्वेतपत्रिका काढावी –आ. संभाजी पाटील निलंगेकरांची मागणी
लातूर /प्रतिनिधी ः- गत दीड वर्षापासून कोरोना संसर्गाची अनेकांना बाधा झालेली असून यामध्ये अनेकांचा मृत्यूही झालेला आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी झालेले व्यवस्थापन व करण्यात आलेल्या उपाययोजना याकरीता केंद्र, राज्य व विविध सामाजिक संघटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करून देण्यात आली होती. सदर निधी किती आला होता आणि तो किती खर्च झाला यासह जिल्हाभरात कोरोनाची लागण किती जणांना झाली व यामुळे किती मृत्यू झाले यासह कोरोना बाबतच्या विविध माहितींची श्वेतपत्रिका जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी काढून त्याचा लेखाजोखा जनतेसमोर सादर करावा त्याचबरोबर यासंबंधी गत दीड वर्षात आलेल्या विविध तक्रारींची जिल्हाधिकार्यांकडून खुली चौकशी व्हावी अशी मागणी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्रासह देशात गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. हा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या त्याचबरोबर कोरोना बाधीत रुग्णांवर उपचारही करण्यात आले. या उपायोजनांसह कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जे व्यवस्थापन राबविण्यात आले त्याकरीता केंद्र, राज्य सरकारसह विविध सामाजिक संस्थानच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता झालेली होती. सदर निधी खर्च करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याच्या तक्रारी सर्वसामान्यांकडून सातत्याने होत आहे. त्यामुळेच याबाबतची श्वेतपत्रिका जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी काढून त्याचा लेखाजोखा सर्वसामान्य जनतेसमोर सादर करावा अशी मागणी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलेली आहे. या श्वेतपत्रिकेमध्ये आजतागायत जिल्ह्यातील किती जणांना कोरोनाची बाधा झाली याची आकडेवारी देऊन त्यापैकी किती रुग्णांवर शासकीय रुग्णालयात तर किती रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले त्याचीही माहिती देण्यात यावी. त्याचबरोबर कोरोना व्यवस्थापनाबाबत जिल्ह्यातील किती आमदारांनी आपला किती रुपयाचा स्थानिक निधी उपलब्ध करून दिला याच्याही आकडेवारीचा समावेश असावा असे नमूद करुन जिल्ह्यातील किती कोरोनाबाधीत रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ प्राप्त झाला याची माहितीही देण्यात यावी. विशेषतः कोरोनासह इतर आजारामुळेही कितीजणांचा मृत्यू झाला याची माहिती नमूद करणे आवश्यक असावे अशी मागणी करून कोरोनासाठी कोणकोणत्या औषधाचा किती साठा उपलब्ध झाला याबाबत विस्तृत माहिती देऊन रेमडिसेवर या इंजेक्शनची किती मागणी होती आणि किती पुरवठा करण्यात आला याच्याही आकडेवारीचा समावेश करण्यात यावा. कोरोना बाधीत रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांच्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी जे नोडल अधिकारी नेमण्यात आले होते त्यांच्याकडे कितीजणांच्या तक्रारी आल्या आणि त्यापैकी किती तक्रारींची सोडवणूक झाली याचीही माहिती आवश्यक असल्याची मागणी करत नोडल अधिकार्यांने दररोज अहवाल सादर करावा असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे नोडल अधिकार्यांने आपले अहवाल सादर केलेले आहेत का? आणि ज्यांनी अहवाल सादर केला नाही त्यांच्यावर काय कार्यवाही करण्यात आली याचीही माहिती या श्वेतपत्रिकेत समाविष्ट असावी अशी मागणी आ. निलंगेकर यांनी केली आहे.
कोरोना उपाययोजनासह व्यवस्थापनासाठी विविध माध्यमातून आलेल्या निधी खर्च करण्यात भ्रष्टाचारासह यासंदर्भात आलेल्या विविध तक्रारींची जिल्हाधिकार्यांकडून खुली चौकशी करण्यात यावी जेणेकरून याबाबतचा सर्वसामान्यांच्या मनात असलेला संभ्रम दूर होईल असे या पत्रात नमूद केले आहे. पालकमंत्र्यांनी याबाबतची विस्तृत श्वेतपत्रिका जनतेसमोर सादर करावी वजिल्हाधिकार्यांकडून संबंधीत तक्रारींची खुली चौकशी व्हावी अशा मागणीचे पत्र आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले आहे. या पत्राची प्रत आरोग्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांनाही देण्यात आली आहे.











