प.पू. विद्यानंदजी सागर बाबा यांनी भागवत कथेत केले स्पष्ट
पंचमुखी हनुमान परिसरात श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्यात गोकुळ अवतरले !
लातूर; दि. १७( वृत्तसेवा ) लव्ह जिहाद या सारखी प्रकरणे वाढत आहेत हे पाहून मन उद्विग्न होते .आम्ही याचे समर्थन करणार नाही किंवा विशिष्ट समाजाला दोषही देणार नाही. दोष आहे तो पालकांचा…! पालकांनी आपल्या लेकरांवर बालपणापासूनच संस्कार केले तर उपवर मुली घरातून पळून जाणार नाहीत .संस्काराचा अभाव असल्याने असे प्रकार पुढे येत आहेत.इतरांना दोष देण्यापेक्षा पालकांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे , लव जिहाद ला हिंदू कदापि समर्थन करू शकत नाही,परंतु पालक म्हणून आम्हाला आमच्या लेकरांच्या संस्कारा कडे ही लक्ष देणे कर्तव्य आहे, असे परमपूजनीय विद्यानंदजी सागर बाबा यांनी स्पष्ट केले.

श्री श्री राधाकृष्ण सत्संग समितीच्या वतीने लातूर नगरीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे .कथेच्या चौथ्या दिवशी बाबांनी ‘लव्ह जिहाद’ वर भाष्य करताना काही राष्ट्रप्रेमी नागरिकांनी आपल्याला लव्ह जिहाद वर आपल्या कथेत हितोपदेश करावा अशी प्रत्यक्ष भेटून विनंती केली होती .याचा उल्लेख बाबांनी आपल्या प्रवचनात करून या प्रकाराबद्दल परखड मांडणी केली. बाबा म्हणाले की ,”आपली लेकरे कुठे जातात ?कुणाबरोबर जातात ? त्यांचे मित्र -मैत्रिणी कोण आहेत ? याबाबत गांभीर्याने कधी विचार केला आहे का? वयात आलेल्या मुलींवर सुसंस्कार केले आहेत का? याचा पालकांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. असे प्रकार समर्थनीय तर नाहीतच पण त्याचबरोबर याला जबाबदार कोण ? याचाही विचार सर्वांनी गांभीर्याने करायला हवा. अशा प्रकाराला मुलीही बळी पडत आहेत त्यामुळे त्याही तितक्याच जबाबदार आहेत. हल्लीच्या पिढीला प्रेमाची परिभाषाच समजली नाही. केवळ शारीरिक सुख म्हणजे प्रेम नव्हे .नि:स्वार्थ , नि:र्व्याज प्रेम करणे याला खरे प्रेम म्हणतात संत मीराबाईने भगवान श्रीकृष्णावर जसे प्रेम केले श्रीकृष्णाला पती -परमेश्वर मानून भजनात ,पारमार्थात स्वतःला लीन करून घेतले; तसे प्रेम हल्लीची पिढी करायला कधी शिकणार आहेत ..? त्यामुळे अशा प्रकाराला घरातील आई-वडील आणि मुलीही तेवढ्याच जबाबदार आहेत.”
वसुदेव कुटुंबकम् 
भारतीय संस्कृती खूप पुरातन आहे .भारतीय संस्कृतीने इतर कुठल्याही जाती -धर्माचा द्वेष करायला शिकवलेले नाही; परंतु काही जण स्वतःच्या स्वार्थासाठी जाती धर्माचा द्वेष करून जातीपातीत भांडणे लावण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे सांगत पूजनीय बाबांनी आजच्या कथेत पुढे बोलताना परखड भाष्य केले. ते म्हणाले की, “वसुदेव कुटुंबकम् असे सांगणारी आपले संस्कृती आहे .मस्तकावर टिळा लावायला काही जणांना संकोच वाटतो .आपल्या धर्माचे पालन करायला काही जणांना लाज वाटते .आपल्या धर्माबद्दल निष्ठा ठेवणे नितांत ,आदर बाळगणे ,धर्माप्रमाणे आचरण करणे आपण सोडून दिल्यामुळे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. इतर धर्मात धर्माचे आचरण केले जाते. धर्मासाठी त्यांनी स्वतःवर बंधने घालून घेतली आहेत अशांचा आपण कट्टर धर्मीय म्हणून उल्लेख करतो. आपणच आपल्या धर्माचे रक्षण केले नाही, रूढी -परंपरा जतन केल्या नाहीत तर मग आपला धर्म कसा वाचेल..? सर्वांनी धर्माचे आचरण केले, स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला तरच ‘अच्छे दिन ‘यायला अवधी लागणार नाही .

धर्माचा बाजार मांडू नका 
धर्माचा बाजार मांडू नका असे कळकळीचे आवाहनही पूजनीय बाबांनी आपल्या कथेतून प्रवचनात केले. धन कमावण्याच्या नादात आपण धर्माला विसरत चाललो आहोत. धन कमावण्याच्या पाठीमागे लागलेली आजची मुले भौतिक सुखाच्या मागे लागून आपल्या आई-वडिलांना विसरत चाललेली आहेत. उतार वयातील आई-वडिलांना ते वृद्धाश्रमात ठेवत आहेत. मी व माझी पत्नी मुले एवढा स्वार्थी विचार करून ते आपल्या घराला ,धर्माला आणि देशाला विसरत चाललेले आहेत ,हे पाहून मन उद्विग्न होते .या देशाला स्वार्थी पिढी नकोय ; तर राष्ट्रनिष्ठा, देशाभिमान ,धर्माचरण करणारी पिढी हवी आहे .त्याचीच या देशाला खरी गरज आहे.





