भटका समाज पूर्वीपासून ज्ञानी, त्यांनी खरा धर्म जपला – डॉ. मोहन भागवत जी
डॉ. मोहन भागवत व्यक्ती नसून शक्ती आहेत – पू. भगवान महाराज
जालना। ( प्रतिनिधी) -भटके विमुक्त जे जगतात ते त्यांच्या व्यवसायसाठी नाही, तर धर्मासाठी साठी जगतात, धर्म म्हणून जगतात. जी वस्तू ते विकतात त्याची आधी पूजा करतात. भटक्या समाजाकडे जे ज्ञान होते त्यामुळे सर्व समाजाचे कल्याण होत होते, आजही होते. धातू तंत्र, औषध, उपचार, तंत्र अनेक विद्या भटक्या समाजाला अवगत होते. परंतु भटक्या समाजाची दुरवस्था परकिय शासकांनी केली, त्याकडे आपणही दुर्लक्ष केले. पण त्यांना आपल्या संतांनी मुख्य प्रवाहात आणले असे डॉ. मोहन भागवत म्हणाले.

जालना येथील विघ्ने लॉन्स येथे आज पू. डॉ भगवान महाराज आनंदगडकर यांच्या कार्याची महती वर्णन करणाऱ्या आनंद निधान या ग्रंथाचे प्रकाशन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. यावेळी व्यासपीठावर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, पू. ह भ प भगवान महाराज आनंदगडकर, हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष व पद्मश्री श्री रमेशजी पतंगे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ जयश्री कुमावत, प्रास्ताविक रघुनंदन निकरट, भजन गायन विनोद काळे, व आभार प्रदर्शन मनोज कोलते यांनी केले. त्यानंतर सरसंघचालकांनी आनंदगड येथे सर्व महापुरुष व मंदिरांना भेट देऊन दर्शन घेतले. स्वातंत्र्यवीर तंट्या मामा भिल यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन केले. तसेच गडावरील शबरीधाम, संत सेवालाल महाराज मंदिर येथे दर्शन घेतले व गोशाळेस भेट देऊन गायींना गूळ चारला. त्यांना संपूर्ण गडाची माहिती यावेळी देण्यात आली.

डॉ मोहन भागवत पुढे म्हणाले, ज्ञान, कर्म आणि भक्ती तिन्ही सोबत असेल तर उपयोग होतो. भक्ती नसेल तर ज्ञानाचा उपयोग होत नाही. विचार माणसाला देव आणि राक्षस बनवतो. हे समजण्याचा ज्ञान संतांकडे असते. आपण अनंत आकाशाला आपल्या कल्पनेत बांधतो तसे ईश्वराला पण पाहतो , पण प्रचिती देणारे संत असतात. त्यांना आपल्या कल्पनेच्या पलीकडले दिसते. त्यामुळे संतांच्या उपदेशाचा अनुसरण करणे हेच आपले कर्तव्य आहे असे ते म्हणाले. तसेच हिंदू समाजाने पुरुषार्थ केला, अनेक वर्ष रामाला हृदयात ठेवलं म्हणून अयोध्येत सुवर्ण क्षण आपण पाहिला. आज जग भारताकडून बोध घेतोय. जग सुखी करण्यासाठी आपण मोठं झालं पाहिजे असे ते म्हणाले. तर भगवान बाबांनी आपल्या अशिर्वचन मध्ये मोहन भागवत म्हणजे आमच्यासाठी साक्षात भारतमाता असून ते व्यक्ती नसून शक्ती आहे अशी भावना व्यक्त केली.

“देवाच्या पुजेप्रमाने आपलं जीवन सात्विक करून जगावं लागेल” – डॉ. मोहन भागवत
कार्यक्रमाच्या पूर्वी पू. भगवान महाराज आनंदगडकर यांच्या भक्त मंडळीसोबत सरसंघचालकांनी संवाद साधला व त्यांचे अनुभव ग्रहण केले. सर्व भक्त मंडळींनी अतिशय भावविभोर होऊन आपले अनुभव व्यक्त केले. पू. भगवान बाबांमुळे आपल्या जीवनाचा उद्धार झाला व डॉ. मोहन भागवतांच्या रुपात आज भारतमाता पाहत आहोत अशी भावना सर्वांनी व्यक्त केली. या संवाद सत्रात डॉ. मोहन भागवत म्हणाले, “जातीपाती भगवंताने नाही केल्या, त्या समाजानेच केल्या. त्यामुळे समता व ममता समजून जगले पाहिजे. आपल्याकडे राम भरताचा आदर्श आहे. अशी आपली बंधुता आहे. या आदर्शासह देवाच्या पुजेप्रमाने आपलं जीवन सात्विक करून जगावं लागेल. बाबाच्या सानिध्यात आल्यामुळे आपल्या सर्वांचे जीवन मंगलमय झाले. आपण सर्व भाग्यवान आहात असे ते म्हणाले.

============