महिला दिन विशेष
मानवी आयुष्यात संकटं ,अडथळे हे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच.पण ,ती पेलण्याची ताकद ही केवळ काही लोकांमध्येच असते.म्हणूनच त्यांची जिद्द ,धडपड ही एका योध्दाप्रमाणे रणांगण गाजवणारी ठरते.खरंतर संकटच माणसाला आतून मजबूत करतात.त्यामुळे वास्तव स्वीकारुन चांगले भविष्य घडविण्यासाठी रडतकुडत न बसता ,दु:खाचे भांडवल न करता अगदी जिद्दीने कंबर कसून अडथळ्यांवर मात करत यशाची, सुखाची वाट शोधत धडपडत राहणं म्हणजेच खरीखुरी जगण्याची मजा लुटणं आणि स्वतःला सक्षम म्हणून सिध्द करणं असतं.काही कारणांमुळे आपल्या पोटच्या दोन्ही मुलांना घेऊन पतीपासून वेगळं राहण्याची वेळ आली पण म्हणून भविष्याची चिंता न करता उलट कधी बाजारात पालेभाजी विक्री करायची ,तर कधी पडेल ती कामे करायची, विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे पुरवायचे ,घरगुती खानावळ चालवायची अशी सारी कामे करत आपल्या दोन्ही मुलांना चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करायचं , त्यांना चांगला माणूस म्हणून घडवायचं याच जाणिवेतून सौ.नंदा संभाजी नार्वेकर यांचा आजतागायत सुरु असलेला संघर्षमय प्रवास आता कुठे यशाच्या मुक्कामाकडे वाटचाल करत आहे.

येऊ देत कितीही संकटे
आहे मी अजूनही खंबीर ,
मोठ्या जिद्दीने करुनी सा-यावर मात
दाखवून देईन किती मी वीर !
हीच खूणगाठ कायम मनात ठेवत जगण्याच्या या सा-या प्रवासात अनेक चांगले – वाईट अनुभव ,माणसं ओळखण्याची पारख आणि संघर्षाशिवाय जगणं नाहीच हीच शिदोरी त्यांच्यातील जिद्दी , लढवय्या रणरागिणीची प्रचिती आणून देणारी ठरली आहे.आज सौ.नंदा नार्वेकर या कष्टक-यांची नगरी असलेल्या वस्ञनगरीतील लिंबू चौक परिसरात हाॅटेल नार्वेकर या नावाने हाॅटेल व्यवसायातून आर्थिक स्वावलंबनाचा धडा गिरवत उद्योग – व्यवसायात यशस्वी होत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात कमालीच्या यशस्वी ठरल्या आहेत.यामध्ये कामगार, कष्टकरी ,गरीब , गरजूंना अत्यंत माफक दरात घरच्या चवीचे चांगले शाकाहारी जेवण मिळावे , यासाठी त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या हाॅटेल व्यवसायाच्या माध्यमातून आणखी काही महिलांच्या रिकाम्या हातांना रोजगार मिळवून देत महिला सक्षमीकरण व सबलीकरणाच्या कार्याला मोठा हातभार लावला आहे.

या सा-या अथक परिश्रमाचा परिपाक म्हणजेच त्यांचा मोठा मुलगा दिगंबर हाॅटेल मॅनेजमेंटची पदवी घेऊन परदेशात मालदीव येथे नोकरीस आहे तर लहान मुलगी मयुरी ही पुण्यात आयटी क्षेत्रात कार्यरत राहून आपल्या मायमाऊलीच्या कष्टाचं चीज करण्यासाठी प्रयत्नशील आहे.विविध कारणांमुळे आपले पोलीस होण्याचे अपुरे राहिलेले स्वप्न निदान मुलांचे चांगले करिअर घडून ते पूर्ण व्हावे , यासाठी त्यांनी केलेला मोठा त्याग ,मोजलेली मोठी किंमत ही खूप उपयोगाची ठरली आहे. या जगात एकटी बाईमाणूस मनानं ठरवली तर सारी संकटं व अडथळ्यांवर मोठ्या जिद्दीने मात करत यशाला गवसणी घालून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करुन समाज विकासात योगदान देऊ शकते ,हेच त्यांनी आपल्या धाडसाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वप्नांचा, यशाचा एक एक टप्पा पार करण्याच्या प्रवासातून दाखवून दिले आहे.त्यांच्या या कष्टाच्या लढाईतून आयुष्याच्या लढाईत
जिंकण्याची मनाला मिळणारी प्रेरणा ही लाखमोलाची आहे.नारीशक्तीचे हे ज्वलंत व आदर्श उदाहरण समाज परिवर्तनात निश्चितच मोठी भर घालणारी आहे.म्हणूनच त्यांच्या या उत्तुंग कामगिरीला आमचा मनापासून सलाम!
— सागर बाणदार




