25.6 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeराष्ट्रीय*लोकसभा मतदारसंघात मतदान:जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी संवाद साधत दिल्या शुभेच्छा*

*लोकसभा मतदारसंघात मतदान:जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी संवाद साधत दिल्या शुभेच्छा*

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

लातूर लोकसभा मतदारसंघात 2 हजार 125 केंद्रांवर पथके रवाना; सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

  • जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी संवाद साधत दिल्या शुभेच्छा

लातूर, दि. 6 : भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार लातूर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी, (दि. 7) सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. 2 हजार 125 केंद्रांवर होणाऱ्या या मतदान प्रक्रियेसाठी मतदान पथके रवाना झाली. मतदान केंद्रावर नियुक्त मतदान पथकांशी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच मनावर कोणतेही दडपण न घेता आपल्यावर सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, अशा सूचना केल्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः संवाद साधल्याने आपल्या मनावरील दडपण कमी झाले असून आता अधिक उत्साहाने मतदान कर्तव्य पार पाडणार असल्याचे यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी सांगितले.

पुरणमल लाहोटी शासकीय तंत्र निकेतन येथे लातूर ग्रामीण मतदारसंघ क्षेत्रातील मतदान पथकांना मतदान साहित्य वाटपाच्या कामकाजाची जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पाहणी केली. तसेच यासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून त्यांच्या कामाची माहिती जाणून घेतली. याठिकाणी उपस्थित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्याशीही त्यांनी संवाद साधला. सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रियांका आयरे, तहसीलदार मंजुषा भगत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

लातूर शहर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील मतदान साहित्य वाटप शासकीय महिला निवासी तंत्र निकेतन येथे करण्यात आले. याठिकाणी सुरु असलेल्या कामकाजाची पाहणी करून जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी मतदान पथकातील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. निवडणूक सामन्य निरीक्षक निरंजन कुमार यांनीही याठिकाणी भेट देवून कामकाजाची माहिती घेतली. सर्व मतदान पथके मतदान केंद्रांवर रवाना झाली.

लातूर लोकसभा मतदारसंघात २८ उमेदवार निवडणूक लढवीत असून एकूण १९ लाख ७७ हजार ४२ इतके मतदार आहेत. 2 हजार 125 केंद्रांवर नियुक्त मतदान पथकांमध्‍ये 8 हजार 500 अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 7 मे रोजी होणाऱ्या मतदानादिवशी पहाटे साडेपाच वाजता सर्व उमेदवारांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉक पोलची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी 7 वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल.

उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी विशेष खबरदारी

उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेवून मतदान केंद्रांवर विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्यासाठी पाणी, मतदारांच्या रांगेच्या ठिकाणी मंडप, मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या खोलीमध्ये मतदारांना बसण्यासाठी खुर्च्या, पंख्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. आरोग्य विभागामार्फत सर्व मतदान केंद्रांवर विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. मतदारांच्या आरोग्‍याची काळजी घेण्‍यासाठी प्रथमोपचार कीटसह आरोग्‍य कर्मचारी प्रत्‍येक मतदान केंद्रावर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात ओआरएस पावडर आणि औषधी उपलब्ध राहतील. जिल्‍ह्यातील प्राथमिक आरोग्‍य केंद्र आणि ग्रामीण रुग्‍णालये यांच्‍या कार्यक्षेतत्रात रुग्‍णवाहीकेद्वारे आरोग्‍य सेवा उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहेत.

मतदानासाठी ओळखीचा पुरावा म्हणून 12 कागदपत्रे ग्राह्य धरणार

मतदाराच्या ओळखीचा पुरावा म्हणून मतदान ओळखपत्राशिवाय आणखी 12 कागदपत्रे ग्राह्य धरण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. यामध्ये आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक अथवा पोस्ट ऑफीसने जारी केलेले छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र अथवा राज्य सरकार किंवा सार्वजनिक उपक्रम अथवा पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदारांना अथवा आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र आदी कागदपत्रांचा समावेश आहे. यापैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत घेवून आल्यास मतदान करता येणार आहे. मात्र, यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]