विशेष लेख
दि. 13 मे रोजी सकाळ10.10 वा. आदरणीय पितृतुल्य जीवनधर सखाहरी शहरकर यांचं वृध्दापकाळाने निधन झालं. त्यांना श्रध्दांजलीचा कार्यक्रम दि. 19 मे रोजी होत आहे. त्यानिमित्त त्यांचेबद्दल काही. . . . . .
शालेय जीवनाची आठवण निघाली की श्री मारवाडी राजस्थान शाळा, लातूर व त्या शाळेतील काही शिक्षकांच्या आठवणी आल्याशिवाय रहात नाही. किंबहुना त्या शाळेसोबतच त्यांचं नांव आमच्या पिढीशी जोडलं गेलं आहे. त्यामध्ये कै. परिहार, कै. विनायकराव माचिले, कै. आर्वीकर, कै. गंडाळे, कै. म्हैसकर, कै. सराफ, कै. विजयकुमार सौताडेकर, माझे वडील कै. भास्करराव जोशी, कै. वासुदेवराव बेंबळकर, कै. माधवाचार्य आणि नरसिंहाचार्य व्यास, कै. निपाणीकर, कै. पानसे, कै. राजाभाऊ उदगीरकर, कै. बाहेती आणि त्याचबरोबर नुकतंच ज्यांचं निधन झालं ते जीवनधर सखाहरी शहरकर यांचा महत्वाचा उल्लेख करावा लागेल. राजस्थान शाळेची स्थापना तशी 1940 मध्ये झाली. पण नंतरच्या 15 वर्षांमध्ये ज्या शिक्षकांनी या शाळेला नावारुपाला आणलं त्यामध्ये उपरोक्त शिक्षकांचा फार मोठा वाटा होता. शाळेच्या उन्नतीमध्ये तर या मंडळीनी आपलं योगदान दिलंच, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये, त्यांना त्यांच्या पायावर उभे रहाण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करणे, उभं राहिल्यानंतरही समाजामध्ये राहून समाजाची सेवा करत स्वत:ला समाजासाठी जगण्यास प्रोत्साहित करत रहाणे हा या शिक्षकांचा महत्वाचा व जिव्हाळ्याचा विषय होता. या शिक्षकांमध्ये काही शिक्षकांनी शिक्षण देण्याचं पवित्र कार्य करीत असताना विद्यार्थ्यांना समाजातील काही विशेष विषयांचा अभ्यास करुन त्यामध्ये काम करण्याचं शिक्षणही विशेषत: दिलं. त्यामध्ये कै. विनायकराव माचिले, कै. वासुदेवराव बेंबळकर, कै. विजयकुमार सौताडेकर आदी शिक्षकांचं नांव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. कै. विनायकराव माचिले यांनी तर सेवानिवृत्तीनंतरचं सगळं आयुष्य पुनश्च एकदा शाळेच्या / संस्थेच्या विनामुल्य सेवेमध्येच घालवलं. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून जीवनधर शहरकर यांनीही शाळेसाठी / संस्थेसाठी सेवानिवृत्तीनंतरची काही वर्षे विनामुल्य सेवा करुन दिली. माझे वडील कै. भास्करराव जोशी व उपरोल्लेखीत मंडळींचा विशेष स्नेह! त्यामध्ये कै. विनायकराव माचिले, कै. विजयकुमार सौताडेकर, व कै. जीवनधर शहरकर यांचेशी आमच्या कुटुंबाची विशेष जवळीक! कै. विजयकुमार सौताडेकर यांचा तर आमचा सख्खा शेजार. 1981 पासून त्यांचा आमचा शेजार. कै. जीवनधर शहरकर हे आणि माझे वडील भास्करराव जोशी हे एकत्रच सेवेमध्ये रुजु झालेले आणि एकत्रच सहा महिन्याचे अंतराने सेवानिवृत्त झालेले. सन 1949 मध्ये या दोघांनीही राजस्थान शाळेतील शिक्षकांच्या रुपामध्ये सेवेस प्रारंभ केला आणि सन 1987 मध्ये माझे वडील जुन 1987 ला सेवानिवृत्त झाले आणि शहरकर गुरुजी डिसेंबर 1987 ला सेवानिवृत्त झाले. एकूण 38 वर्षांची सलग सेवा या दोघांनीही पूर्ण केली. या दोघांची मैत्री शाळेमध्ये प्रसिध्द होती. त्यांचे मुख्याध्यापकसुद्धा या मैत्रीशी परिचित होते. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये या दोघांनी सेवेला सुरुवात केली होती. माझे वडील सांगली येथून गांधी हत्येनंतर स्थलांतरित झालेले आणि शहरकर गुरुजी हैद्राबाद मुक्तीसंग्रामाचे काही काळ अगोदर ग्रामीण भागातून लातूरसारख्या तत्कालीन परिस्थितीतील शहरात स्थलांतरीत झालेले (माझ्या माहितीनुसार). त्यामुळे स्थलांतरीतांचं दु:ख या दोघांनाही चांगलंच ज्ञात होतं. प्रतिकुल परिस्थितीमध्ये कसं जगायचं याचं ज्ञान स्थलांतरीत असल्यामुळे या दोघांनाही चांगलंच मिळालेलं. त्यामुळे सगळ्यांशी मिळून मिसळून, गोड बोलून, प्रसंगी खिशाला झळ बसली तरी हरकत नाही पण समोरच्याला न दुखवता कसं जगावं याचं परिपूर्ण ज्ञान या दोघांना परिस्थितीनं दिलेलं. राजस्थान शाळेमध्ये नौकरीस सुरुवात केल्यानंतर आपला विषय शिकवताना विद्यार्थ्याला त्या विषयाचं परिपूर्ण आकलन झालं पाहिजे याकडे या दोघांचं विशेष लक्ष असायचं. अर्थात उपरोल्लेखीत सर्वच शिक्षक या पद्धतीने शिकवत असायचे. शहरकर गुरुजी हे आमच्या काळात कधी Sir झालेले नव्हते. किंबहुना उपरोल्लेखीत शिक्षक हे आमचे Sir कधीच झाले नाहीत. गुरुजी हे भारतिय भाषेतील विशेषण शहरकर गुरुजींना पूर्णपणे लागू होते. गुरु या विशेषणाला पूर्णपणे न्याय त्यांच्या वागणुकीमधून मिळत असे. त्यांचं विद्यार्थ्यांशी जे संभाषण होत असे ते पूर्णपणे मार्दवपूर्ण असे. त्यांना कोणत्याही विद्यार्थ्याशीच काय कोणत्याही प्रौढ व्यक्तीशी चढ्या आवाजात बोललेलं मी कधी ऐकलेलं नाही.

राजस्थान संस्थेनं त्यांच्या शिक्षकांवर शालेय कामाव्यतिरीक्त कामासाठी कोणतंही बंधन कधीही घातलेलं नव्हतं. त्यामुळे शहरकर गुरुजी त्यांच्या शालेय कामाला पूर्ण न्याय देवून उर्वरीत वेळेमध्ये त्यांचे इतर छंद जोपासत असायचे. त्यामध्ये प्रामुख्याने पत्रकारिता व नाटक ही दोन क्षेत्र त्यांच्या आवडीची होती. पत्रकारिता हा त्यांचा शालेय कामाव्यतिरीक्तचा आवडता विषय होता. ज्यावेळी लातूरमध्ये काही मोजकेच पत्रकार होते त्याकाळी शहरकर गुरुजी त्या क्षेत्रात मुद्दामहून कार्यरत होते. त्यांनी बराच काळ म्हणजे जवळपास वयाची 80 वर्षे पूर्ण होईतो पत्रकारिता केली. पण त्या क्षेत्रात काम करताना त्यांनी कधीही वाममार्गाचा अवलंब केला नाही. किंवा कधी कुणाची तळी उचलून धरली नाही. पत्रकाराचे जे मुळ काम म्हणजे समाजातील चांगल्या वाईट घटनांचा योग्य तो मागोवा घेत त्या समाजातील सर्व घटकांपर्यंत सहजपणे पोहचवणे हे अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी केलं. अतिशय इमानदारीनं त्यांनी त्या क्षेत्रामध्ये सहजसंचार केला. पत्रकारिता करताना त्यांना बरेवाईट अनुभवही आले. पण त्या अनुभवांचा त्यांनी कधी डांगोरा पिटला नाही. किंवा त्यामधून स्वत:प्रती सहानुभुती मिळवण्याचा किंवा शासनदरबारी विशेष काही मिळवण्याचा प्रयत्नही त्यांनी कधी केला नाही. ते तत्कालीन संचार, महाराष्ट्र टाईम्स, मराठवाडा, लोकसत्ता आदी तत्कालीन मोठ्या वर्तमानपत्रांचे पत्रकार म्हणून त्यांचे कार्यकाळामध्ये कार्यरत होते. अतिशय समृद्ध अशी पत्रकारिता त्यांनी केली. लातूरमधीलच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यातच त्यांच्यातील पत्रकाराला सर्वांनी आदरच दिला.

त्यांचा दुसरा छंद म्हणजे नाट्यक्षेत्र. लातूरला त्यांचेच एक सहकारी कै. राजाभाऊ म्हैसकर व कै. सौ. मालती म्हैसकर हे दाम्पत्य पुण्याहून श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेमध्ये नौकरीनिमित्ताने दाखल झाले. राजाभाऊ मुळात नाट्यप्रेमी. त्यांच्या पुढाकाराने लातूरमध्ये तत्कालीन नाट्यप्रेमी मंडळीनी कलोपासक ही नाट्यसंस्था स्थापन केली. या संस्थेच्या स्थापनेमध्ये राजस्थान शिक्षण संस्थेतील बहुतांश शिक्षक मंडळीनी सहभाग घेतलेला होता. त्याचबरोबर दयानंद शिक्षण संस्थेतील कै. कन्हैयालाल पुरोहित, कै. जी. एम. देशमुख, प्रा. विभाकर मिरजकर आदी काही प्राध्यापकही सहभागी होते. या सर्व मंडळींनी लातूरमध्ये नाट्य क्षेत्र जोपासण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. तत्कालीन प्रतिकुल परिस्थितीतही या सर्व मंडळीनी नाट्य क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग केले आणि राज्य स्तरावर लातूरचा ठसा उमटवला. कै. राजाभाऊ म्हैसकरांच्या पुणे येथील संबंधांतून अनेक चांगले नाट्यनिर्माते आपली नाटकं त्याकाळी लातूरमध्ये आणत असत आणि येथील नाट्यरसिकांची भूक भागवत असत. शहरकर गुरुजींचा या सर्व खटाटोपामध्ये सिंहाचा वाटा असे. कलोपासकच्या माध्यमातून शहरकर गुरुजींनी नाट्यक्षेत्राची उल्लेखनीय अशी सेवा केली आहे. साधारणत: 1981 -82 मध्ये कै. राजाभाऊ म्हैसकर गुरुजींनी दिग्दर्शित केलेल्या “तुज आहे तुजपाशी” या पुल देशपांडे लिखीत गाजलेल्या नाटकामध्ये शहरकर गुरुजींनी मध्यवर्ती असलेली “शाम” व माचिले गुरुजींनी “सतीश” या तरुण पात्रांची भूमिका तर “काकाजीं” ची भूमिका म्हैसकर गुरुजींनी अत्यंत सहजपणे अभिनित केली होती. त्या नाटकामध्ये कै. बेंबळकर व श्री सूर्यकांतराव जोशी यांनीही आपले नाट्यगुण दाखवले होते. विशेषत: ही सर्व मंडळी त्यावेळी वय वर्षे 50 च्या जवळपास होती. पण तरुणाईच्या सर्व कळा त्यांनी आपल्या अभिनयामधून सहजपणे साकारल्या होत्या. शहरकर गुरुजींच्या प्रत्यक्ष जीवनातील सहचारिणी कै.सौ. हेमा शहरकर यांनी या नाटकामध्ये “शाम”च्या प्रेमामध्ये अडकलेल्या “गीता” ची भूमिका आपल्या सहजसुंदर अभिनयाने साकारली होती. पुण्यामुंबईच्या व्यावसायिक संस्थेनं केलं नसतं एवढं सुंदर नाटक आम्हा लातूरकरांना त्यावेळी पहायला मिळालं होतं. एक वेगळा गुण यानिमित्ताने या सर्व शिक्षक मंडळीचा आम्हाला अनुभवायला मिळाला होता.
शहरकर गुरुजींनी आम्हाला नागरिकशास्त्र हा विषय शिकवला होता. खरेतर परिक्षेमध्ये इतिहास या विषयाचा उपविषय असलेला हा विषय त्यांनी ज्या तन्मयतेने आम्हाला शिकवला होता ती तन्मयता या विषयाप्रती आजच्या शिक्षकांमध्ये क्वचितच अनुभवायला मिळते. या विषयातील संसदीय लोकशाही ते परिवहनाचे नियम हा व्यापक परिघ अत्यंत सहजपणे त्यांनी आम्हाला शिकवला. त्यांनी ज्या सखोलतेने हा विषय शिकवला त्यामुळे आजमितीस संसदीय लोकशाहीतील अनेक आयाम आम्हा तत्कालिन विद्यार्थ्यांना सहजपणे लक्षात येतात. वाहतुकीचे व परिवहनाचे नियम तर इतक्या सहजतेने व आत्मियतेने शिकवल्यामुळे आजही आम्ही तत्कालीन विद्यार्थी गाडी चालवताना अथवा रस्त्याने पायी चालताना चुकूनही डाव्याचे उजवे होवू देत नाहीत.
गुरुजींचा आमचा कौटुंबिक स्नेह. त्यामुळे आमचे त्यांचे एकमेकांच्या घरी जाणेयेणे सहजपणे व्हावयाचे. एकमेकांच्या घरातील सर्व मंडळींचा कौटुंबिक स्नेह सहजपणे जमलेला. इतके की त्यांचे व आमचे घरातील सर्व मुलांची जी टोपणनावे आहेत तीच तेवढी सर्वांना माहिती. खरी कागदोपत्री असलेली नांवे बरीच वर्षे एकमेकांच्या घरामध्ये माहिती नव्हती. त्यांचा धाकट्या मुलाचे नांव उपेंद्र आहे हे मला उपेंद्रच्या मुलाच्या विवाहाचे वेळी कळाले. माझे कागदोपत्री नांव “महेंद्र” हे आहे हे राजीव शहरकर ला माझ्या वयाच्या 21 व्या वर्षी माझा विमा उतरवताना कळाले. इतका आमचा सहजसंबंध. मी निवृत्त झाल्यानंतर अंबाजोगाई रस्त्याला गेल्यावर मी शहरकर गुरुजींना भेटण्यासाठी सहजपणे त्यांचे घरी डोकावत असे आणि गुरुजींची ख्यालीखुशाली विचारत असे. आजकालची मित्रांकडे जाताना दूरध्वनी करुन त्यांची वेळ घेवून जाण्याची पद्धत आमच्याकडे नव्हती आणि आजही नाही. सहजपणे आम्ही एकमेकांकडे जात असतो. हा जोपासलेला घरोबा मनाला एक प्रकारचा आनंद देवून जातो. माझ्या वडीलांचे व आईच्या परलोकगमनानंतर फार कमी घरे अशी उरली होती की ज्यांचेकडे जावून काही अडचणींच्या प्रसंगी मार्गदर्शन घ्यावे. शहरकर गुरुजींचे घर हे अशा घरांपैकी एक होते. गुरुजी गत दोन वर्षांपासून वयोमानानुसार कारणपरत्वेच घराबाहेर पडत असायचे. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन सहज उपलब्ध होत असे. मार्गदर्शनाबरोबर त्यांनी अनुभवलेला शालेय सेवेतील कार्यकाळ ते आम्हाला सांगायचे. माझे वडील व त्यांच्या मैत्रीमधील सुखदु:खांच्या क्षणांचा अनुभव ते सांगायचे. एकंदर 38 वर्षांचा सेवेचा कार्यकाळ त्यांनी एकत्र घालवलेला होता. माझ्या वडीलांनी नौकरीस लागल्यानंतर पदवी व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले होते. त्यामध्ये शहरकर गुरुजींचे मोठे सहकार्य लाभलेले होते. त्यांचा नौकरीस लागण्याअगोदर काही काळ हैदराबाद येथे गेलेला असल्याने त्या शहराची त्यांना माहिती होती. व त्या माहितीचा उपयोग त्यांनी माझ्या वडिलांच्या पदवी शिक्षणासाठीच्या उस्मानिया विद्यापीठामध्ये घेतल्या जाणा-या परिक्षेसाठी करुन दिला होता. गुरुजींचे हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्येही मोठे योगदान होते. सन 1945 ते 1948 या कालावधीमध्ये त्यांनी तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये स्थापित असलेल्या मुक्तीसंग्राम छावण्यांमध्ये शस्त्रपुरवठा तसेच पत्रकपुरवठा करुन संग्रामामध्ये मोठे योगदान दिलेले होते. वय लहान असल्यामुळे त्यांचेवर रझाकार मंडळी फारसा संशय घेत नसत. त्यामुळे गुरुजी सहजपणे पत्रकांची ने आण करत असत. गोवा मुक्ती संग्रामामध्येही त्यांनी पुण्यातील स्वातंत्र्यसैनीक मंडळींबरोबर सहभाग नोंदवला होता. सन 1995 ते 1999 या कालावधीमध्ये कै. बाळासाहेब बेळंबे यांचे अध्यक्षतेखाली लातूर जिल्ह्याच्या स्वातंत्र्यसैनिक समितीचे सदस्य म्हणून कामकाज करताना गुरुजींनी अनेक स्वातंत्र्यसैनीकांना निवृत्तीवेतन मिळवून देण्यासाठी मोलाची कामगिरी केली.
समाजवादी विचारांच्या गुरुजीनी साधना साप्ताहिकाचे वितरण बराच काळ केले. त्यामध्ये प्रसंगानुरुप लेखनही केले. साधारणत: 1948 ते 1977 या जवळपास 30 वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी समाजवादी विचारांची पाठराखण केली. पण त्या विचारांमधील फोलपणा त्यांना आणिबाणीमध्ये तुरुंगामध्ये आलेल्या अनुभवांती लक्षात आल्यानंतर त्यांनी या विचारांपासून थोडीशी फारकत घेतली व जानेवारी 1983 मध्ये झालेल्या तळजाई शिबिरामध्ये पूर्ण गणवेष परिधान करुन संघविचारांची कास धरली. तद्नंतर संघविचार समाजात कसा प्रसारित करता येईल याचा विचार त्यांनी आयुष्याच्या अंतापर्यंत केला. संघविचार समाजात पसरवताना त्यांनी पूर्वाश्रमींच्या सहका-यांना मात्र दूर लोटले नाही किंवा त्यांचेशी मैत्री तोडली नाही. उलट त्यांचेपर्यंत संघ विचार कसा पोहचवता येईल यासाठी त्यांनी ब-याच जणांना सा. विवेकचे वर्गणीदार करुन घेतले. आमच्याशी गप्पा मारताना त्यांनी कुटुंबव्यवस्थेचे महत्व संघाने कसे ओळखले आहे, किंबहुना त्यासाठी आपल्या स्वयंसेवकांना कसे मार्गदर्शन केले आहे याचे विवेचन ते करायचे. गुरुजी स्वत: एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेले. त्यामुळे त्यांना त्याचे फायदेतोटे माहिती होते. त्यामध्ये असलेले फायदे ते आम्हाला उलगडून सांगत असत. समाजामध्ये कसं वागावं याचं शिक्षण त्यांनी व त्यांचे समकालीन शिक्षकांनी आम्हा विद्यार्थ्यांना त्यांचे आचरणातून सहजपणे दिलं. कोट्यावधीच्या रकमा खर्च करुन मिळणार नाही असं समाजव्यवस्थेचं ज्ञान त्यांनी व त्यांचे समकालीन शिक्षकांनी सहजपणे आपल्या विद्यार्थ्यांना शालाबाह्य शिक्षणामधून दिलं.
गुरुजींची अनेक वैशिष्ट्ये होती. 96 वर्षांचे समृध्द आयुष्य जगलेल्या गुरुजींनी काटकसरीने पण सुयोग्य पद्धतीने संसार केला. त्यांना तेवढीच सक्षम साथ त्यांच्या सहचारिणी तथा अर्धांगिनी कै. हेमाताई शहरकर यांनी दिली. आम्ही त्यांना बाई म्हणायचो. त्यांचे घरी गेलो की हातावर काही ना काही तरी गोड पदार्थ मिळायचाच. त्याही उच्च पदवीधर. विवाहानंतर पदवी व पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेवून त्यांनी गोदावरी कन्या शाळेमध्ये अनेक विद्यार्थिनींना घडवण्याचं कार्य असोशीनं केलं. दोन वर्षांपूर्वी दुर्धर आजारानं त्यांना गुरुजींच्या अगोदरच या जगामधून जावं लागलं. पण जोपर्यंत त्या होत्या तोपावेतो गुरुजींची सावली म्हणूनच त्या राहिल्या. गुरुजींना गत तीन वर्षांपासून स्मृतीभ्रंशाचा त्रास सुरु झाला होता. त्यामुळे बाईच त्यांचेकडे आल्यागेल्या मंडळींसमवेत गप्पा मारताना गुरुजींना सांभाळून घ्यावयाच्या. आणि हे सर्व करताना स्वत: आजारी असूनही गुरुजींची सेवा त्यांनी अत्यंत मनोभावे केली आणि सहचारिणी म्हणण्यापेक्षा ख-या अर्थाने अर्धांगिनीचं कर्तव्य निभावलं होतं.
शहरकर गुरुजी किंवा राजस्थान शाळेमधील तत्कालीन सर्वच गुरुजींबद्दल भरभरुन बोलता येवू शकतं. काही दिवसांपूर्वी आम्हा 1975 साली दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं अनौपचारीक एकत्रीकरण लातूरमध्ये एका शेतावर झालं होतं. त्यावेळी आमच्या सर्व गुरुजींच्या आठवणी निघाल्या होत्या. त्यावेळी शहरकर गुरुजींची आठवणही निघाली होती. सर्वांचं म्हणणं एकच होतं की या सर्व गुरुजींनी जे काही शिकवलं त्यामुळेच आज आम्ही सहजपणे वयाची 62-63 वर्षे पार करु शकलो आहोत.
भरपूर लिहीता येणं शक्य आहे. अनेकांच्या अनेक आठवणी आहेत आणि असतील. सध्याची शिक्षकांची स्थिती, स्वभाव, काम करण्याची पद्धत विचारात घेता आम्ही अनुभवलेले राजस्थान शाळेतील तत्कालीन गुरुजींसारखे शिक्षक आजच्या पिढीला का मिळत नाहीत याची खंत वाटते. गुरुजींच्या अंत्यदर्शनाचे वेळी श्री निशीकांत कुलकर्णी नावाचे एक विद्यार्थी भेटले. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की त्यांचे वडिलांची बदली धाराशिव झाल्यामुळे त्यांना लातूर सोडून जावं लागणार होतं. पण शहरकर गुरुजींनी त्यांच्या वडीलांना विनंती करुन निशीकांत कुलकर्णींच्या रहाण्याची व्यवस्था मी करतो, पण त्याला येथून हलवू नका असे सांगून निशीकांतना येथेच ठेवून घेतले व त्यांचे दहावीचे शिक्षण पूर्ण करुन घेतले. त्यामुळे निशीकांत कुलकर्णी पुढे शासकीय तंत्रनिकेतनात प्रवेश घेवू शकले व तद्नंतर अभियंता होवू शकले. विद्यार्थ्यांप्रती एवढी आस्था बाळगणारे शिक्षक आज विरळाच सापडतील.
कै. पुल देशपांडेंनी त्यांच्या प्रसिद्ध “व्यक्ती आणि वल्ली” या पुस्तकामध्ये “चितळेमास्तर” नावाचं एक व्यक्तीचित्रण केलेलं आहे. त्यामध्ये वर्णन केलेलं शिक्षकाचं व्यक्तिमत्व आणि आमचे काळातील उपरोल्लेखीत शिक्षक यांचेमध्ये फारसा फरक नाही. पुलं ना भेटलेले चितळे मास्तर हे शहरकर गुरुजींसारख्या आमच्या गुरुजनांच्या रुपाने आमच्या आयुष्यात येवून गेलेले असल्यामुळेच आमचं जीवन सर्वार्थानं समृद्ध झालेलं आहे असं म्हणावयास काहीच हरकत नाही.
अशा या समाजप्रिय व विद्यार्थीप्रिय शिक्षकास मानाचा प्रणाम!

महेंद्र भास्करराव जोशी,
अभियंता, लातूर.
93731 91225.




