20.8 C
Pune
Wednesday, September 10, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न*

*आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न*

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे… मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

*विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धत राबवण्यासाठी 103 कोटीचा निधी मंजूर*

*पंढरपूर येथे एक हजार बेडचे हॉस्पिटल निर्माण करण्याची घोषणा*

*विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनासाठी 73 कोटी 80 लाखाच्या निधीतून सुरू असलेली कामे उत्कृष्ट आहेत*

पंढरपूर, दिनांक 17-( वृत्तसेवा ) आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरचे वातावरण भक्तीमय झालेले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. हे बा… विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर करण्याचे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाच्या चरणी घातले.
आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, स्वास्थ परिवार मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार समाधान आवतडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व अन्य मान्यवर उपस्थित होते.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की हे सरकार सर्वसामान्याचे आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आजच्या दिवशी पांडुरंगाला एकच प्रार्थना आहे की राज्यातील शेतकरी, कामगार व कष्टकरी सुखी झाला पाहिजे. यासाठी हे शासन सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मोफत तीन गॅस सिलेंडर योजना, बेरोजगार तरुणांसाठी अप्रेंटिस योजना आदी योजनेच्या माध्यमातून शासन सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले.
मागील आषाढी वारीच्या तुलनेत यावर्षी 25 ते 30 टक्के वारकरी संख्या वाढलेली दिसत आहे त्यामुळे सर्वत्र एक भक्तीमय वातावरण झालेले आहे. वारकरी संप्रदाय भागवत धर्माची पताका सदैव फडकवत ठेवत असून अशा वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी शासन सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे.शासनाने वारकरी महामंडळाची स्थापना केली असून वारीतील दिंड्यांना अनुदान देण्यात आलेले आहे. जिल्हा प्रशासनाला आषाढी वारीनिमित्त देण्यात येणाऱ्या निधीमध्ये तिपटीने वाढ केलेली आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सर्वांच्या संमतीनेच केला जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनासाठी 73 कोटी 80 लाखाचा निधी मंजूर केलेले आहे. या अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे उत्कृष्ट असून मंदिराला पूर्वीचे वैभव प्राप्त होत आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धत ही तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर राबवण्यासाठी जिल्हा प्रशासन व मंदिर समितीने तयार केलेल्या 103 कोटीच्या आराखड्याला मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मंदिर समितीचा एमटीडीसी सोबत असलेला करार पुढेही वाढविण्यात येईल. तसेच भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याप्रमाणे मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या सर्व अडीअडचणी सकारात्मक दृष्टीने सोडवण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.


आषाढी वारीनिमित्त आरोग्य विभागाच्या वतीने चार ठिकाणी महा आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले असून आत्तापर्यंत 8 लाख नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला असून, 15 लाख नागरिक या आरोग्य सुविधांच्या लाभ घेतील, अशी अपेक्षा आहे. तसेच पंढरपूर येथे देश विदेशातून लाखो वारकरी भाविक येतात त्यांच्यासाठी आरोग्य सुविधाबाबत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी लवकरच एक हजार बेड क्षमता असलेले नवीन रुग्णालय बांधण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
*मानाचे वारकरी यांचा सत्कार-
शेतकरी श्री. बाळू शंकर अहिरे, वय 55 वर्षे, सौ. आशाबाई बाळू अहिरे वय 50 वर्षे. मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यावेळी एसटी महामंडळाकडून मानाच्या वारकऱ्यांना एक वर्ष मोफत एसटी बस सवलत पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. हे मानाचे वारकरी मागील 16 वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत.
*श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार-
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने देण्यात येणारे श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार खालील प्रमाणे देण्यात आले.
संत तुकाराम महाराज वंशज देहूकर दिंडी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, देहू यांना एक लाखाचा प्रथम पुरस्कार मिळाला. दानेवाला निकम दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे यांना 75 हजार रुपयांचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला तर श्री गुरु बाबासाहेब आजरेकर दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, इंदापूर यांना 50 हजार रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. या सर्व पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
आरोग्यदूतचे प्रकाशन-

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने प्रतिवर्षी प्रकाशित करण्यात येणारे आरोग्यदुत या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मेगडंबरीसाठी दोन कोटी 45 लाख रुपयाचे चांदी दान करणाऱ्या उद्योजक सुनील मोरगे यांच्याही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी सौ. लता एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]