25.2 C
Pune
Tuesday, December 16, 2025
Homeराजकीयजिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

*नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले*

• जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

स्मशानभूमी शेड उभारणीसाठी प्रत्येकी दहा लाख देणार•
शाळांच्या दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार

लातूर, दि. १७ : जिल्ह्यात यंदा सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जस्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे गतीने सुरु आहेत. पंचनामे पूर्ण होताच याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येईल. नुकसानग्रस्त सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यसाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री श्री. भोसले यावेळी म्हणाले. लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. त्यानुसार सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांनुसार पर्यायी मार्गाच्या आवश्यक कामाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

महावितरणची जिल्ह्यात सुरु असलेली कामे अपेक्षित गतीने होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संथगतीने कामे करणाऱ्या ठेकादारांवर कार्यवाही करण्याचा प्रस्ताव महावितरणच्या मुख्य कार्यालयास सादर करावा. तसेच जिल्ह्यात रोहित्र दुरुस्ती अथवा विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. महावितरणचे अधिकारी, कर्मचारी यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेवून त्याचा तातडीने निपटारा करावा, अशा सूचना पालकमंत्री श्री. भोसले यांनी दिल्या. नव्याने मंजूर झालेल्या विद्युत उपकेंद्रांची कामे तातडीने सुरु करावीत. ज्या उपकेंद्रांना जागा उपलब्ध नाही, अशा उपकेंद्रांना जागा उपलब्ध करून देण्याबाबत महावितरणने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्ह्यात गाव तिथे स्मशानभूमी या संकल्पनेतून प्रत्येक गावात स्मशानभूमी उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध असलेल्या गावांमध्ये स्मशानभूमी शेड उभारणी, परिसरात बाकडे, पाणी आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. या सुविधा निर्मितीसाठी स्मशानभूमी उभारणीसाठी प्रत्येक गावाला सुमारे ८ ऐवजी १० लाख रुपये देण्यात येतील. तसेच ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी शासकीय जमीन उपलब्ध नाही, अशा गावांमध्ये भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपयांची तरतूद करण्याला पालकमंत्री श्री. भोसले यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंजुरी देण्यात आली.जिल्हा परिषदेच्या जुन्या शाळांच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेतून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल. यासोबतच राज्य शासनाकडूनही या कामासाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे पालकमंत्री श्री. भोसले म्हणाले. तसेच अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती, लघुपाटबंधाऱ्यांची डागडुजी, रोगराईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य संस्थांना पुरेसा औषधसाठा निर्माण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यावेळी जलजीवन मिशन योजनेंतर्गत कामांचे आराखडे प्रलंबित असल्याचे सांगून या कामांना गती देण्याची सूचना केली. तसेच जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करावे, असे सांगितले.राज्यातील सर्वात कमी वनक्षेत्र असलेल्या लातूर जिल्ह्यात वन विभागाने प्रभावी वृक्ष लागवड मोहीम राबवून वृक्ष संवर्धनासाठी विशेष खबरदारी घ्यावी. यासोबतच कृषी विभागाने जिल्ह्यात जलसंधारणाची कामे करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केल्या.

जिल्ह्यात मंजूर झालेल्या विद्युत उपकेंद्रांना जागा उपलब्ध करून दिली जावी. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जावी, असे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले.जिल्ह्यात नवीन विद्युत वाहिनीची कामे सुरु असून यासाठी विद्युत खांब उभारणीची कामे नित्कृष्ट दर्जाची होत आहेत. तसेच हे खांब रस्त्यापासून जवळच उभारण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले. तसेच अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीकडेही त्यांनी लक्ष वेधले.उदगीर, जळकोट तालुक्यात मंजूर झालेल्या विद्युत उपकेंद्रांचे काम अद्याप सुरु झालेले नाही. तसेच ज्या उपकेंद्रांची कामे सुरु झाली आहेत, ती अतिशय संथगतीने सुरु आहेत. या सर्व कामांना गती द्यावी, असे आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे नदी, नाल्याला पूर आल्यामुळे काठावरील जमिनी खरडून गेल्या आहेत. या शेतकऱ्यांच्या जमिनी पुन्हा पूर्ववत करून देणे आवश्यक असल्याचे आमदार अभिमन्यू पवार म्हणाले. तसेच जिल्ह्यातील नगरपरिषदांमधील स्वच्छता विषयक कामांना जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा, असे त्यांनी सांगितले.जिल्हा परिषदेच्या अनेक जुन्या शाळांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून भरीव निधी द्यावा. तसेच वन विभागाच्या माध्यमातून होणारी वृक्ष लागवड करताना योग्य नियोजन करावे. या माध्यमातून स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड केली जावी, असे आमदार रमेश कराड म्हणाले.जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ च्या खर्चाच्या अहवालाचे सादरीकरण केले.

******

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]