चाकूरकरांची वैचारिक उंची आभाळाएवढी
व्यापारी महासंघाच्या शोकसभेत आदिनाथराव सांगवे
लातूर – सुसंस्कृत व शालीन व्यक्तित्व जपलेले माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची वैचारिक उंची आभाळाएवढी असून, त्यांच्या काळाच्या पडद्याआड जाण्याने लातूरचे देशपातळीवरील वैभव लोप पावले आहे, अशा शब्दांत येथील महात्मा बसवेश्वर शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष आदिनाथराव सांगवे यांनी चाकूरकरांप्रति आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.येथील व्यापारी महासंघाच्या वतीने आयोजित शोकसभेच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
विचारपीठावर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रामदास भोसले, सचिव विशाल अग्रवाल, होलसेल किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज वळसंगे, लातूर तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष ईश्वरभाऊ बाहेती व ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांची उपस्थिती होती.

शोकसभेचे संचलन नागेश स्वामी यांनी केले. आपल्या भावपूर्ण मनोगतात अध्यक्ष सांगवे पुढे म्हणाले, विलक्षण नि:स्पृहता, सूक्ष्म चिकित्सकदृष्टी, आपुलकीयुक्त संवेदनशीलता आणि व्यासंगाची किनार असलेली अभ्यासूवृत्ती यांचा सुंदर समन्वय म्हणजे चिंतनशील नेते शिवराज पाटील होत. त्यांचा भगवद्गीतेचा दांडगा अभ्यास होता. निष्काम कर्मयोग्याची सर्व लक्षणे असलेल्या चाकूरकरांच्या निधनामुळे देश एका समंजस, सर्जनशील व सुसंस्कृत नेत्याला मुकला आहे.चिंतनगर्भ लेखनाबरोबरच संवेदनशील काव्यप्रांतातही रमलेल्या चाकूरकरांच्या इंग्रजी कवितांना तत्वज्ञानाचा आधार होता, असे सांगून पत्रकार जयप्रकाश दगडे यांनी पाटीलसाहेबांच्या राजकीय, साहित्यिक, सामाजिक वाटचालीचा वेध घेतला.
लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही देशाचे गृहमंत्रीपद त्यांना सन्मानपूर्वक देण्यात आले. निवडून आले असते, तर कदाचित् देशाला पहिला मराठी पंतप्रधान देण्याचा मान लातूरकरांना मिळाला असता. चाकूरकरांच्या नावाचा आदरयुक्त दराराही त्याच उंचीचा होता, असे ते म्हणाले. प्रारंभी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रामदास भोसले यांनी श्रद्धांजली वाहून प्रास्ताविकात शिवराज पाटील यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. तर, सराफ असोसिएशनचे प्रयाग, कवी डाॅ. संजय जमदाडे यांनीही यथोचित संवेदना व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली. कवी जमदाडे यांनी शिवराजस्तुतीपर काव्य यावेळी सादर केले .





