माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त पोद्दार हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम.
मोफत अस्थिरोग शिबिरात ७८ रुग्णांची तपासणी व उपचार
लातूर;(माध्यम वृत्तसेवा):-प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त येथील ख्यातनाम अस्थिशल्य चिकित्सक डॉक्टर अशोक पोद्दार यांच्या पोद्दार हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोफत अस्थिरोग शिबिरात ७८ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले.

पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे १६९ वे मोफत आरोग्य शिबीर होते. या शिबिराच्या उदघाटनप्रसंगी लातूर शहर मनपाचे विद्यमान उपमहापौर अँड स्नेहल उटगे, माजी उपमहापौर कैलास कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लातूर आयएमएचे अध्यक्ष डॉक्टर अभय कदम, डॉक्टर संजय शिवपूजे , डॉक्टर शशी पाटील, डॉक्टर मंगेश कुलकर्णी, डॉक्टर अभय कुलकर्णी, डॉक्टर पल्लवी जाधव, प्रसाद उदगीरकर, जयेश बजाज, श्याम धूत, रामेश्वर सोमाणी, विजय पस्तापुरे , बालाप्रसाद सारडा, विजय रांदड आदी मान्यवर उपस्थित होते.

दीपप्रज्वलन व धन्वंतरी पूजनाने शिबिराचे उदघाटन करण्यात आले. पोद्दार हॉस्पिटलच्या प्रमुख पाहुण्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना स्नेहल उटगे यांनी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त प्रतिवर्षी अशा प्रकारच्या मोफत शिबिराचे आयोजन केले जाते, ही बाब अतिशय महत्वाची आहे. समाजातील सर्वच स्तरातील रुग्णांना या शिबिराचा चांगलाच फायदा होतो. आमदार अमित देशमुख यांचे नेतृत्व सर्वव्यापी असल्याने त्यांच्याप्रती अशा पद्धतीने स्नेह व्यक्त करणारी मंडळीही मोठ्या संख्येने लातुरात आहे, ही बाब खरोखर गौरवास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी उपमहापौर कैलास कांबळे यांनी आपल्या मनोगतात डॉक्टर अशोक पोद्दार प्रतिवर्षी अमित देशमुख यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मोफत शिबिराचे आयोजन करतात, ही बाब आता लातूरच्या सामान्य रुग्णांनाही माहिती झाली आहे. त्यामुळे अनेक रुग्ण या शिबिराची आतुरतेने प्रतीक्षा करताना दिसतात. लातुरात वैद्यकीय क्षेत्रात मोफत आरोग्य शिबिराचा पॅटर्न आणण्याचे काम डॉक्टर अशोक पोद्दार यांनी केले असून वैद्यकीय क्षेत्रातील कार्याबरोबरच ते सामाजिक कार्यातही अग्रेसर असल्याची भावना कांबळे यांनी व्यक्त केली.

सामाजिक कार्यकर्ते प्रसाद उदगीरकर यांनी आपल्या मनोगतात डॉक्टर पोद्दार यांच्या आरोग्यविषयक कार्याचा गौरव करून समाजसेवेच्या ध्यासाने झपाटलेले वैद्यकीय क्षेत्रातील अग्रगण्य चेहरा म्हणजे अशोक पोद्दार असल्याचे सांगितले. जयेश बजाज यांनी यावेळी बोलताना डॉक्टर अशोक पोद्दार यांना अशा प्रकारच्या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करून रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा जणू छंदच जडला असल्याचे बोलून दाखवले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अशोक पोद्दार यांनी केले. प्रास्ताविकापूर्वी त्यांनी आमदार अमित देशमुख यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगाने आपल्या हॉस्पिटलच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. ज्या समाजाने आपल्याला एवढे काही भरभरून दिले आहे, त्या समाजाचे आपणही काही देणे लागतो या भावनेने आपण मोफत आरोग्य शिबीराच्या आयोजनास प्राधान्य देत असल्याचे सांगितले. अमित देशमुख यांच्या जन्मदिवसानिमित्त २००९ पासून सातत्याने असे मोफत शिबीर आयोजित केले जाते. आज वैद्यकीय सेवा सुविधा खूप महागल्या आहेत. सामान्य रुग्णांना चांगल्यात चांगल्या सेवा सुविधा मोफत तसेच माफक शुल्कात उपलब्ध करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. समाजाच्या सर्वच स्तरातील रुग्ण त्याचा पुरेपूर लाभ घेतात, हेच या शिबिराचे सर्वात मोठे यश असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

१९९९ पासून हॉस्पिटलच्या वतीने उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या थंड पाण्याची सोय करण्यासाठी पाणपोई चालवली जाते. या पाणपोईत थंड पाण्याचे जार उपलब्ध करून दिले जातात. दिवसभरात हजारो नागरिक या पाणपोईचा लाभ घेतात असेही त्यांनी सांगितले. अशोक पोद्दार महाराष्ट्र अस्थिरोग तज्ज्ञ संघटनेचे पदाधिकारी असून लातूर जिल्हा अस्थिरोग तज्ज्ञ संघटना, आयएमएम महाराष्ट्र, आयएमए लातूर, आशादीप , दिशा फाउंडेशन , रोटरी परिवार अशा विविध संघटनांच्या माध्यमातून कायम रुग्णसेवा आणि समाज कार्यात अग्रेसर असतात. आजच्या शिबिरात एकूण ७८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २७ रुग्णांचे एक्सरे ५० टक्के सवलतीच्या दरात काढण्यात आले. रक्त व लघवी तपासणीही ५० टक्के सवलतीच्या दरात करण्यात आली. सर्वच्या सर्व ७८ रुग्णांची हाडांच्या ठिसूळतेची मोफत तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना मोफत फिजिओथेरपीची सुविधा ही देण्यात आली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी हॉस्पिटलचे व्यवस्थापक वसीम शेख यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शिबिरातील रुग्णांना मोफत औषधीही उपलब्ध करून देण्यात आली.
———————-




