मराठवाडा मुक्ती दिन विशेष

0
211

दिगंगबरराव बिंदू: मननीय चरित्र

भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद संस्थान , जम्मू आणि काश्मीर व जुनागड संस्थान ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती.

हैदराबाद संस्थानावर तब्बल सहा पिढ्यांपासून निझाम वंशाचे राज्य होते. म्हणून निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम

लढला गेला. शेवटी भारत सरकारने पोलीस कारवाई करून १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबाद संस्थान मुक्त केले. त्यामुळे ते भारतीय संघराज्यात समाविष्ट होऊ शकले. म्हणून १७ सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

या दिनानिमित्त आज वाचू या, या लढ्यातील सेनानी दिगंबरराव बिंदू यांच्या आत्म चरित्राचे जेष्ठ पत्रकार नंदकुमार रोपळेकर यांनी केलेले परीक्षण……हैदराबाद मुक्ती संग्रामातील थोर सेनानी कै.दिगंबरराव बिंदू यांचा जन्म १२ जूलै१८९६ रोजी तर स्वर्गवास २५ नोव्हेंबर १९८१ रोजी झाला. जवळजवळ ८५ वर्षे आयुष्य लाभलेल्या दिगंबरराव बिंदू यांच्या समग्र जीवनावर टाकलेला हा प्रकाशझोत…….

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एका खेड्यात नानांचा जन्म झाला.इतर मुलांप्रमाणे ते लहानपणी उघडे नागडे फिरायचे, म्हणून सर्वजन त्यांना “दिगंबर” म्हणून हाक मारीत असत;पुढे आयुष्यभर तेच नाव रुढ झाले. त्यांचं घरगूती नाव ”नाना”, आप्तजन,समाजात त्यांच्यावर नाना या नावाची मोहोर कायमस्वरूपी राहिली.

भोकर येथे नानांचे शिक्षण झाले. वयाच्या ७/८ व्या वर्षी नानांची मौंज झाली.ते आपल्या आईला ‘माई’ तर चुलतीला आई म्हणत असत.वडिलांना दादा म्हणत असत.पुढील शिक्षणाच्या निमित्ताने नाना नांदेडला आले.तेथे त्यांना इंग्रजी पहिलीत प्रवेश मिळाला. दत्तोपंत टिळक हे त्यांचे इंग्रजीचे शिक्षक.बापट मास्तर आणि अन्य शालेय जीवनातील गत स्मृतींना उजाळा देताना शिक्षक कसे शाब्दिक कोटी करून वर्गात हास्याचे फवारे उडवित असत असं नाना मित्रांशी गप्पा गोष्टी करतांना सांगत असत. एकूण शाळेतील वातावरण उत्साही होत.त्यामुळे नानांना शाळेची गोडी लागली.कोरटकर, महाजन , नीळकंठ शास्र्त्री, केशव मुळावेकर या शिक्षकांनी नाना कडून संस्कृत, इ़ंग्रजी व अन्य विषयांची उत्तम तयारी करुन घेतली.

त्यावेळी शाळेत मौलवी साहेब त्यांना फार्सी भाषा शिकवायला होते.डॉ.मेलकोटे,हेड मास्तर बापट, महाजन, केशव मुळावेकर, मोहनलाल,श्री.व्यंकय्यांमुळे नानांच्या शिक्षणाचा पाया मुजबूत झाला.मिडलच्या परीक्षेची उत्तम तयारी श्री व्य़ंकय्या मास्तरांनीनानां कडून करुन घेतली ,त्यामुळे नाना त्या परीक्षेत उत्तमरितीने उत्तीर्ण झाले.

पुढील शिक्षणासाठी ते हैदराबादला आले. हैदराबाद येथे राहण्याची सोय राजेसाहेब यांनी केली.या कालावधीत घडलेल्या घटना, पाहिलेली नाटकं , त्यांचे पेटी वादनात मिळालेले प्राविण्य हे कौतुकास्पद होते ‌.

पुढे दासगणू़च्या कीर्तनात नाना पेटीची साथ देत असत.नानांना विविध विषयात रस होता.विशेष म्हणजे मराठी व्यतिरिक्त फार्सी, तेलगू, कन्नड, संस्कृत, उर्दू या भाषांही अवगत होत्या.नानांचे लग्न इयत्ता चवथीत असताना १९१२-१३ च्या सुमारास कु.जयंती हिस बरोबर मोठ्या थाटात नांदेड येथे झाले.लग्नानंतर तिचे नाव रेणूका ठेवले.१९१४ साली नाना मिडलच्या परिक्षेत उत्तमरितीने उत्तीर्ण झाले.त्यांचे मित्र महाजन हे ही परीक्षा नापास झाल्या कारणाने त्यांच्या मैत्रीत शैक्षणिक‌ खंड जरी पडला असला तरी त्यांची मैत्री अभेद्यच होती.

त्याकाळी मिडलची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वकिलीच्या परीक्षेला बसता येत असे. काकांच्या इच्छेनुसार नानांनी हैदराबाद येथे जाऊन परीक्षेला बसावे ही इच्छा होती,पण नानांचे सर्व मित्र परीक्षेसाठी पुण्याला जाणार ह़ोते म्हणून नाना सुध्दा पुण्याला गेले.काका़ची इच्छा नसूनही त्यांनी तेथे पुढील शिक्षणाची सोय केली.

त्याच सुमारास लोकमान्य टिळक या़ंची सुटका झाली होती व पुण्यात ‘लोकमान्य टिळकांची सुटका’ असे मोठे फलक जागोजागी लावले होते.नाना़ची ही पहिलीच पुणे भेट लक्षणीय अशी कायम लक्षात राहील अशी ठरली.पुण्यात त्या़ंचे अवांतर वाचन खूप झाले.मासिक ‘मनोरंजन’ सारखी अन्य नियतकालिक सुध्दा वाचावयास मिळाली.तेथे त्यांचे चौफेर वाचन झाले .त्याचा फायदा नानांना त्यांच्या भावी आयुष्यात खूप झाला.प्रोफेसर गोविंद चिमणाजी भाटे हे सुधारणावादी गृहस्थ तत्वज्ञानाचे प्रोफेसर होते.त्या़ंच्या वैचारिक बैठकीचा त्यांना लाभ मिळाला.१९१८ साली नाना मॅट्रिक पास झाले. नानांना हैद्राबादच्या निजाम कॉलेजमध्ये प्रवेश मिळायला हवा होता पण मिळाला नाही; ते नाराज झाले.त्याच वेळी नांदेड तसेच हैदराबाद येथे प्लेगच्या साथीने थैमान घातले होते;नंतर एन्फ्लूएंझाची साथ सर्वत्र पसरली. त्यावेळी स्वयंसेवक म्हणून नानांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात झाली.

त्या दरम्यानच्या काळात नानांची आई व काका यांचे निधन झाले.या सुतकात त्यांनी स्वा.वीर सावरकर यांचे मॅझिनीचे चरित्र वाचले,त्याचा त्यांच्यावर खूप मोठा परिणाम झाला.परिणामी नानांच्या मनात देशभक्तीचे बी पेरले गेले.नानांच्या ज्ञानदान कार्याचा श्रीगणेशा विवेकवर्धिनी शाळेतून झाला .ते शिक्षक म्हणून नौकरीला लागले.पगार ४२ रुपये होता.शिवाय त्यांना शिकवणीतून थोडे बहुत पैसे मिळत असत. त्यामुळे त्यांच्या वाढत्या संसाराला हातभार भार लागत असे.सार्वजनिक जीवनातील त्यांचे स्नेही श्री शर्मा हे धडपड्यावृत्तीचे उत्साही कार्यकर्ते होते.ते केशवराव कोरटकर वकिलांचे सहाय्यक होते.राघवेंद्रराव हे सुधारक विचारांचे होते. त्यावेळी केशवराव हे आर्य समाजाचे प्रमुख होते.

वकिलीची सनद म्हणजे अशिलांच्यावतीने सरकारशी भांडण्याचा परवाना म्हणाना.नानांनी नांदेड येथे वकिलीस सुरुवात केली खरी.पण त्यात मन लागेना.निजाम विजय ‘चा पहिला अंक १२/१२/१९२० रोजी प्रसिद्ध झाला.संपादक मंडळांत राघवेंद्र शर्मा, लक्ष्मणराव फाटक आणि त्यांच्या बरोबर नानांचाही सहभाग होता.’निजाम विजय’ मासिकाला अनंत अडचणीना सामोरे जावे लागले.त्यात आर्थिक प्रश्नाबरोबर निजामाने घातलेली बंदी. हैदराबादचे कोतवाल व्यंकटराम रेड्डी हे निजामाच्या खास विश्वासू निष्ठावंतापैकी एक होते, तरीही नानांना अटक केली होती.रेड्डीनी नानांना तंबी देऊन सुटका केली.

डॉ.वामनराव गाडगीळ हे ‘फिरस्ता’ या ट़ोपण नावाने विनोदी लेख लिहित असत.(विशेष म्हणजे ते सरकारी नौकरी करीत होते.)हैदराबाद येथे कर्जबाजारी झाल्याने नानांनी नांदेड येथे वकिलीस सुरुवात केली. जवळजवळ वर्षभर नांदेड येथे वकिली करुन १९२५ साली पुन्हा वकिली करण्यासाठी हैदराबादला आले.हिंदु धर्म परिषदेचे अधिवेशन प्रेम थिएटर(आताचे दिलशाद थिएटर) येथे डॉ.कुर्तकोटी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले .गायक कवी दत्तोपंत पद्माकर या टोपणनावाने (खरं नाव प्रफुल्ल पद्माकर) कविता लिहित असत. हैदराबादचे गायक लक्ष्मण सिंग,अब्दूल करीम खान ही मंडळी घरीच गाण्यांचा रियाज करीत असत.त्याचं घर कब्रस्तानाजवळ होतं. साहजिकच त्यांची गाणी ऐकण्यासाठी कब्रस्तानात जाऊन ऐकत असत.

हैदराबाद येथे वकिली करीत असतांनाचे नानांना आलेले अनुभव, त्यांचा प्रामाणिकपणा यामुळे नाना लोकप्रिय झाले.त्यांनी या व्यवसायात चांगले नाव कमावले;हे जरी खरं असलं तरी सुध्दा त्यांच मन व्यवसायात लागत नव्हते,ते या व्यवसायाशी समरस होऊ शकले नाहीत..नाईलाजास्तव आर्थिक कारणांसाठी त्यांनी हा व्यवसाय स्वीकारला होता.

या व्यवसायामुळे तसेच प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करताना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नानांनी सामाजिक कार्य करण्याचा निर्णय घेतला. निजामशाहीत केले जात असलेले जुलूम, अत्याचार, दडपशाही, आम जनतेवर होणारे अन्याय,आपण आपल्या देशात राहून गुलामगिरींचे जीवन जगत आहोत याची जाणीव,नागरिकांचे हक्क याची सर्रासपणे गळचेपी होत होती. वर्तमानपत्रांवर बंदी होती,सभा, संमेलनादीवर निजामाची वक्रदृष्टी होती.

सन १९१९ ते १९३१ या कालावधीत ब्रिटिशांचे सुध्दा निजामावर कडक निर्बंध, दडपण होते. सातवा निजाम मीर उस्मान अली हा स्वतःच कारभार पाहू लागला. ‌लोका़ंचा छळ, दडपशाही, द़़ंडेली, अन्याय अत्याचार, लोकांना लुबाडून सक्तीने पैसे लुबाडून घेण्याचा त्याला छंद लागला.अशा नानाविध अनुभवातून नानांमधील समाज सेवक जागा झाला. त्यांना दृढ जाणीव झाली की वकिली करण्यासाठी आपला जन्म झाला नसून जनसेवेसाठी झालाय.

हैदराबाद राज्याचे विसर्जन, हैदराबाद मुक्तीसंग्राम अशा एक ना अनेक रोम हर्षक कथा आपल्याला ‘कै.दिगंबरराव बिंदू’ यांच्या आत्मकथनात वाचायला मिळतील.

या चरित्राचे शब्दा़ंकन

कै.दिगंबरराव उपाख्य नाना बिंदू यांच्या थोरल्या सूनबाई सौ.प्रम़ोदिनी यांनी केले असून नानांच्या आत्मकथनात त्यांच्या समग्र व्यक्तिमत्वावर यथार्थ प्रकाशझोत टाकला आहे.तर संपादन मराठी साहित्यात ज्यांनी आपल्या नावाची मोहोर उमटवली, अशा दिग्गज साहित्यिकात ज्यांचे नाव आवर्जून घेतले जाते ते हैदराबादचे सुप्रसिद्ध भाष्यकार डॉ श्रीधर रंगनाथ कुलकर्णी यांनी केले आहे.

या चरित्रात संपादकाचे मनोगत,’आठवणीची’ आठवणीसह स़ंपादकीय,आदि पर्व, युद्धपर्व, अनुशासन पर्व आणि परिशिष्टासह सविस्तर अशा दिगंबरराव बिंदू उपाख्य नानांच्या समग्र जीवनाचा घेतलेला यथार्थ मागोवा समस्त सारस्वतांनी अवश्य वाचावा.नानांचे निधन २५ नोव्हेंबर,१९८१ रोजी झाले.येत्या २५ नोव्हेंबर,२०२१ रोजी येणाऱ्या नानांच्या ४० व्या स्मृती दिनानिमित्त हार्दिक अभिवादन.

नानांचा आदर्श आजच्या तरुणांनी अवश्य घेण्यासाठी हे आत्मकथन अवश्य वाचावे असे आहे.

लेखन:नंदकुमार रोपळेकर

-संपादन:देवेंद्र भुजबळ

9869484800

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here