*,लोकशाहीचा खून*

0
242

अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्‍ताधाऱ्यांकडून लोकशाहीचा खून

बँक निवडणूक प्रकरणी राज्‍यापालाकडे तक्रार करणार-आ. कराड

लातूर दि. २२–  लातूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या निवडणुकीत अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्‍ताधाऱ्यांनी व स्‍वतःला सहकार महर्षी म्‍हणवून घेणाऱ्या पुढाऱ्यांनी भाजपासह सर्व विरोधी उमेदवाराचे अर्ज बाद करण्‍याचे षडयंत्र रचून लोकशाहीचा खून केला आहे असा आरोप करून हुकूमशाही पध्‍दतीने वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्‍हे दाखल करण्‍याची परवानगी मिळावी यासाठी राज्‍याचे महामहीम राज्‍यपाल आणि केंद्रीय सहकारमंत्री मा. अमित शहा यांची भेट घेणार आहोत अशी माहिती भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा  कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लातूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या संचालक मंडळ पंचवार्षीक निवडणूकीसाठी गेल्‍या ११ ते १८ ऑक्‍टोबर दरम्‍यान उमेदवारी अर्ज दाखल करण्‍यात आले. या अर्जाची २० ऑक्‍टोबर रोजी छाननी होवून भाजपासह सर्व विरोधी उमेदवारांचे सहकार बोर्डाच्‍या बेबाकीसह इतर किरकोळ कारणावरून अर्ज बाद करण्‍याचे कटकारस्‍थान अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्‍ताधाऱ्यांनी केले असे सांगून आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, बँकेत तुमचे चांगले काम होते तर लोकशाही पध्‍दतीने निवडणूकीला सामोरे जायला हवे होते मात्र तसे घडले नाही.

बँकेच्‍या संचालक मंडळ निवडणुकीच्‍या सर्व जागा लढण्‍याची पुर्णपणे तयारी आम्‍ही  केली होती. बँक आमच्‍या ताब्‍यात येणार होती याची कुणकूण लागल्‍याने सर्व विरोधकाचे अर्ज बाद करण्‍यात आले. हिम्‍मत असेल तर निवडणुक होवू द्या. मतदाराने दिलेला कौल आम्‍हाला मान्‍य असेल पण निवडणुक टाळून मतदारांच्‍या  अधिकारावर का गधा आणता असा सवाल आ. रमेशअप्‍पा कराड यांनी उपस्थित केला.

बँकेची निवडणूक होवू द्यायची नाही. यासाठी विरोधी उमेदवारांना सोसायटी व इतर सर्व कागदपत्रे उपलब्‍ध होण्‍यास अडचणी निर्माण केल्‍या गेल्‍या असे सांगून आ. रमेशअप्‍पा  कराड म्‍हणाले की, २० ऑक्‍टोबर रोजी छाननीच्‍या वेळी अनेक अडचणीवर मात करून मिळविलेले बेबाकी प्रमाणपत्र दाखल करून घेण्‍यास नकार दिला. त्‍यामुळे विरोधकांचे अर्ज बाद ठरविण्‍याची बेकायदेशिर प्रक्रिया सत्‍ताधाऱ्यांच्‍या दबावाखाली अधिकाऱ्यांनी पार पाडली आहे.

सत्‍ताधारी पॅनचे उमेदवार धिरज देशमुख, बाबासाहेब पाटील, गोविंद बोपनीकर यांच्‍यावर विरोधकाकडून गंभीर स्‍वरूपाचे आक्षेप छाननीच्‍या वेळी घेतले. त्‍यावर कुठलीही चर्चा न होता विरोधकांचे आक्षेप फेटाळून लावण्‍यात आले. २२ ऑक्‍टोबर दुपारी ५ पर्यंत अर्ज बाद केल्‍याची कारणे लेखी स्‍वरूपात उमेदवारांना प्रशासनाने दिली नाहीत. जर ही माहिती उद्या मिळाली तर शनिवार रविवारच्‍या सुट्या असल्‍याने उपविभागीय सहनिबंधकाकडे ३ दिवसाच्‍या आत अपिल करावे लागते. ते अपिल करता येवू नये अशी व्‍युहरचना सत्‍ताधाऱ्यांनी केली असल्‍याचा आरोपही आ. रमेशअप्‍पा कराड यांनी केला आहे.

आठ दिवस दिवाळीमुळे न्‍यायालय बंद राहणार असल्‍याने नेमकी दाद मागता येणार नाही त्‍यामुळे या निवडणूक प्रक्रियेची सविस्‍तर माहिती राज्‍याचे महामहीम राज्‍यपाल मा. भगतसिंहजी कोशारी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना देवून सत्‍ताधाऱ्यांच्‍या हातचे भाऊले बनून लोकशाहीचा खुन करणाऱ्या अधिकाऱ्यां विरूध्‍द फौजदारी गुन्‍हे दाखल करण्‍याची मागणी करणार आहोत अशी माहितीही भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी यावेळी बोलताना दिली.

या पत्रकार परिषदेस भाजपा प्रदेश किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, भाजपाचे जिल्‍हा सरचिटणीस संजय दोरवे, भगवानराव पाटील तळेगावकर, किसान मोर्चाचे जिल्‍हाध्‍यक्ष साहेबराव मुळे, गंगापूरचे सरपंच बाबु खंदाडे यांच्‍यासह अनेकजण होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here