लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्व विरोधी उमेदवाराचे बेकायदा अर्ज बाद ; संतप्त भाजपाचा मुख्यालयात ठिय्या
लातूर दि.२५– लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कर्जबाकीचे कारण दाखवून बेकायदेशीररित्या विरोधी उमेदवारांचे अर्ज अवैध केले याबाबत बँकेचे कार्यकारी संचालक एच. जे. जाधव यांना जाब विचारून रेकॉर्ड दाखविण्याची मागणी बँकेचे संचालक आ. रमेशअप्पा कराड, भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी सोमवारी केली. तब्बल चार ते पाच तास बँकेच्या मुख्यालयात ठाण मांडूनही संबंधीत अधिकारी गायब झाल्याने कार्यकारी संचालक माहिती देण्यास हतबल झाले. अनेकांनी बँकेच्या या काळया कारभारावर असंख्य आरोप केले. दरम्यान बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ पंचवार्षीक निवडणुकीतील दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर छाननीच्या वेळी कर्जबाकीचे कारण पुढे करून अत्यंत बेकायदेशीरपणे विरोधी सर्वच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. शंभर टक्के वसुली देणारी संस्था म्हणून जिल्हा बँकेनेच गौरव केलेली संस्था थकबाकीत दाखवली. अनेक ईच्छुक उमेदवारांना बेबाकी, नाहरकत व इतर कागदपत्रासाठी संस्थेचे गटसचिव, इन्स्पेक्टर सापडले नाहीत. एकाच व्यक्तीने सहया करून एकाच तारखेत अनेकांना प्रमाणपत्र कसे काय वितरीत केले. या सर्व प्रकाराची माहिती दाखवण्यात यावी. रेकॉर्ड तात्काळ उपलब्ध करून दाखवावे अशी मागणी बॅकेचे कार्यकारी संचालक जाधव यांच्याकडे बँकेच्या मुख्यालयात जावून बॅकेचे संचालक आ. रमेशअप्पा कराड, धर्मपाल देवशेट्टे, भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्यासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सोमवारी बँकेच्या लातूर येथील मुख्यालयात जावून केली. जोपर्यंत माहिती मिळणार नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही अशी भुमिका घेतल्याने बँकेच्या मुख्यालयात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले.

बँकेच्या कर्जबाकी बेकायदा प्रमाणपत्रामुळे विरोधी उमदवाराचे अर्ज बाद झाल्याने हे प्रमाणपत्र कुठल्या आधारे देण्यात आले. प्रमाणपत्र देणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्याला समक्ष बोलवा ही मागणी लावून धरली आणि त्यांच्याच कक्षाकडे सर्वजण गेले असता कर्ज वसुली विभागातील संबंधीत अधिकारी हरीदास हे फोन बंद करून कार्यालयातून पळून गेले. हतबल झालेल्या कार्यकारी संचालक जाधव यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक झालेल्या या शिष्टमंडळाने हरीदास यांच्या कक्षातच कार्यकारी संचालक जाधव यांना बाहेर न जावू देता घेराव घालून जो पर्यंत माहिती मिळणार नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका घेवून ठाण मांडून बसले.

पोलीसाकडे फसवणूकीची तक्रार
लातूर जिल्हा सहकारी बोर्डाचे जिल्हा सहकार विकास अधिकारी एस.एस. देशमुख यांनी जिल्हा बँकेच्या निवडणूकीत कांही लोकांना बिनविरोध निवडूण येण्यासाठी कट रचून वेगवेगळया संस्थेच्या थकबाकीचे पमाणपत्र एकाच जावक क्रंमाकानुसार दिली असून यावरून स्पष्ट होते की, हे खोटे व बनावट प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहेत. या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे फसवणूक केली असून ही बाब गंभीर असून लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. तेव्हा याबाबत या कटात सामील झालेल्या एस.एस. देशमुख, विजयकुमार ढगे, जिल्हा बॅकेचे कार्यकारी संचालक एच.ए.जाधव यांच्या विरूध्द कठोर कार्यवाही करावी अशी तक्रार भगवान रामचंद्र पाटील तळेगावकर यांनी शिवाजी नगर पोलीस ठाणे लातूर यांच्याकडे दिली आहे. यावेळी शिष्ठमंडळाशी बोलताना पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक पुजारी यांनी निश्चितच तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
बँकेचे कार्यकारी संचालक यांना जाब विचारण्यास आ. रमेशअप्पा कराड, भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर गेले असता त्यांच्या समवेत भगवान पाटील तळेगावकर, धर्मपाल देवशेट्टे, भारत चामले, बाबु खंदाडे, प्रदिप पाटील खंडापूरकर, सतिष आंबेकर, संजय दोरवे, कृष्णा कदम, अरविंद पाटील, गोपाळ शेंडगे, आप्पासाहेब पाटील, भागवत सोट, साहेबराव मुळे, गोविंद नरहरे, अनिल भिसे, बन्सी भिसे, हणमंतबापू नागटिळक, डॉ. बाबासाहेब घुले, दशरथ सरवदे, वसंत करमुडे, अनंत कणसे, सुरेखा पुरी, लता भोसले, रमाकांत मुरूडकर, भैरवनाथ पिसाळ, धनराज शिंदे, काशिनाथ ढगे यांच्यासह बॅकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केलेले उमेदवार, सुचक, अनुमोदक, भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठया संखेने होते.


