रहस्यकथांची मोहिनी *
रंजक साहित्यात रहस्यकथांची जागा बरीच वरची आहे. कथेच्या सुरुवातीलाच अशी एखादी घटना समोर येते की, तिच्यामागील रहस्याचा उलगडा कसा होणार याचं कुतुहल वाचकांच्या ठायी निर्माण होतं. आंतरराष्ट्रीय कट म्हणा, एखाद्या धनाढ्याचा खून म्हणा किंवा बँकेवर पडलेला दरोडा म्हणा… एक परफेक्ट प्लॉट आपल्या पुढ्यात येतो. पण त्यामागे कर्ताकरविता कोण, खून असल्यास मोटिव्ह काय, खुनी कोण असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत जातात. हे प्रश्न रहस्याच्या आवरणात असल्यानं त्यांची योग्य उकल होईतो उत्कंठा वाचकांना स्वस्थता लाभू देत नाही. रहस्य जितकं गहिरं तितकी उत्कंठेची पातळी खोल. थांग लागू न देणारी. मग, वाचक एकेक पान वाचत गुरफटत जातो नि पुरती उकल झाल्यावरच पुस्तक खाली ठेवतो. हा रहस्यभेद जितका तर्कसंगत नि पटणारा, तितकं त्या कथेचं यश मोठं. साधारण अशा चौकटीतल्या, सुगम अन् प्रवाही शैलीतील अनेक यशस्वी रहस्यकथा लिहिणारे लेखक म्हणून बाबूराव अर्नाळकर यांचं नाव आपोआप उच्चारलं जातं. त्यांच्याही खूप आधीपासून रहस्यकथा प्रसिद्ध झाल्याचे दाखले आहेत पण बाबूरावांचा वेगळेपणा हा की, परमकर्तव्य असावं इतक्या नियमितपणे लिहून त्यांनी सर्व थरात मोठा आणि निष्ठावान वाचकवर्ग स्थापित केला. जगात सर्वाधिक रहस्यकथांची निर्मिती करणारे लेखक म्हणून गिनीज बुकाने अर्नाळकर यांचं नाव 1984 साली घोषित केलं. नोंदवलेली पुस्तकांची संख्या त्यावेळी 1092 होती. इतक्या रहस्यकथा कालबद्ध वेळापत्रकानुसार लिहिणं नि त्या प्रकाशित होऊन विकल्याही जाणं हा एका परिनं चमत्कार होता. परवा कालवश झालेले पत्रकार गुरुनाथ नाईक हेसुद्धा अतिशय वाचकप्रिय रहस्यकथाकार होते. त्यांनी बाराशेच्या आतबाहेर कथा लिहिल्या. ठरवलं असतं तर आणखी पुस्तकांची भर घालून तेसुद्धा गिनीज बुकात दाखल होऊ शकले असते, पण जीवनसंग्रामात त्यांची लेखणी थबकली. शिवाय गिनीज विक्रमासाठी त्यांना आणखी तीनशेतरी कथा लिहिणं अनिवार्य होतं. कारण अर्नाळकरांनी आपलाच विक्रम मोडून पुढंही लेखन सुरूच ठेवलं होतं. पुस्तकंही दरमहा प्रसिध्द होत होती. त्यांच्या लेखनाचा वेग विलक्षण होता. मोठ्या आत्मीयतेनं एका ठराविक शिस्तीत ते लेखन करीत. 1400 च्या घरात त्यांच्या पुस्तकांचा आकडा आहे. पूर्णवेळ व्यवसाय म्हणून ते चष्म्याचं दुकान चालवत. ग्राहकांच्या नित्य धबडग्यातही ते लेखनिक मुलीला डिक्टेशन देत. तीही इतकी उत्साही की, उजवा हात दुखू लागला की डाव्या हातानं झरझर लिहीत राही. अर्नाळकरांनी, तब्येत क्षीण झाली, दृष्टी मंदावली तेव्हाच कुठं लेखनाला पूर्णविराम दिला. त्यांचे काळापहाड, झुंजार, आणि धनंजय हे वाचकांचे सर्वाधिक लाडके नायक. बाबूरावांचे भाऊ मधुकरराव हेसुद्धा रहस्यकथा लिहीत. त्यांच्या नावावरही सुमारे दोनशे पुस्तकं आहेत. ते लिहीत तेही थेट बाबूरावांच्याच धाटणीत. हिंदी सिनेसृष्टीत नायकाला एक डबल (डमी) असतो, तसा हा प्रकार.
§ नाईक हे लिहू लागले तो काळ अर्नाळकरांच्या चौफेर लोकप्रियतेचा होता. प्रकाशकांच्या मागणीनुसार नाईक यांनीही विशिष्ट देहबोली आणि लकबी असणारे गुप्तहेर नायक अन् बेरकी खलनायक जन्माला घातले. कालौघात आधीच ठरून गेलेला मराठीतल्या रहस्यकथांचा हा बाज
वाचकांना रुचत होता अन् खपाचं प्रमाण सहसा ढळत नसायचं. त्याच कालखंडातील आणखी एक लेखक
एस. एम. काशीकर हे देखील एककाळ चांगल्या मागणीत राहिले. वाचकांना बांधून ठेवील असं रहस्य उभं करून कथाभाग वेगानं अंताकडे नेणं यात अर्नाळकर, नाईक आणि काशीकर यांचा सारखाच हातखंडा होता. तरी अर्नाळकर यांची भाषा सोपी अन् ओघवती. रहस्य कायम ठेवून कथा झपाट्यानं पुढं जायची. स्वतंत्र वैशिष्ट्यं असल्यानं या तिन्ही लेखकांची एकमेकांशी कधी स्पर्धा झाली नाही. नाईक आणि काशीकर यांच्या रहस्यकथांना नवा वाचकवर्ग लाभला होता. आणि अर्नाळकर यांचे निष्ठावान वाचकही टिकून होते. काळ नव्यांनाही संधी देतोच. तिघांनाही नव्याजुन्या वाचकवर्गाने आवडीनं सामावून घेतलं. उत्तम शिकलेल्या वाचकांची पिढी आल्यावर मात्र मराठी रहस्यकथांचा बाजार बदलला. कंपन्यांमधून काम करणारे वा अध्यापनाच्या क्षेत्रातील वाचक इंग्रजी रहस्यकथांकडे वळले. याचं मुख्य कारण विविधता. इंग्रजी रहस्यकथेत अनेक प्रवाह हाताळले गेले. आर्थर कॉनन डॉयल, अगाथा ख्रिस्ती, आल्फ्रेड हिचकॉक, एडगर वॉलेस, अर्ल स्टॅनले गार्डनर, जेम्स हॅडले चेस, जेफ्री आर्चर, आयर्व्हिंग वॉलेस वगैरे नामवंतांची पुस्तकं आजही विकली जात असली तरी नव्या दमाचे, प्रतिभावान लेखकही मोठ्या संख्येने पुढं आले आहेत. त्यांच्या पुस्तकांचा खप अफाट आहे. ही पुस्तके जगभर विकली जातात नि बेस्टसेलरवर लागलीच सिनेमेही निघतात. हा प्रकार आपल्याकडे वळणी पडलेला नाही. नाही म्हणावयास एकमेव अपवाद हिंदीतील गुलशन नंदा यांचा. ते चित्रदर्शी लिहीत. आणि कथा ही रोमॅन्टिक असो वा सामाजिक, तिच्यात रहस्याचा एक जाडसर धागा असायचाच. मराठीत सी. रामचंद्र (चितळकर अण्णा) यांनी धनंजय पडद्यावर आणला, पण त्याचे चाहते वगळता इतरांना तो थिएटरकडे खेचू शकला नाही. दुसरे, सांगण्याजोगे उदाहरण म्हणजे हिंदीतला मेरा साया. हा जयंत देवकुळे यांच्या कथेवरून बेतला होता. ती कथा एका दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली होती.

§ गुरुनाथ नाईक आणि काशीकर ही नावं अर्नाळकरांच्या जोडीने घेतली जाऊ लागली त्याकाळी इंग्रजीतली गुप्तहेरकथा गुप्तहेरपटांकडे वळली होती. यॉन फ्लेमिंगच्या जेम्स बॉंडने तर इतकी लोकप्रियता मिळवली होती की बुक स्टॉलवर वाचक फ्लेमिंग यांचे नाव न उच्चारता जेम्स बाँड किंवा 007 मागत. अर्नाळकर मात्र सदैव त्यांच्या नावानं मागणीत राहिले. त्या सुमारास मी पुस्तकांच्या दुकानात उमेदवारी करत होतो. इंग्रजीत चेस ख्रिस्ती आणि फ्लेमिंगची पुस्तकं कशी हातोहात विकली जात ते मी स्वतः अनुभवलं. आज अनेक वर्षानंतरही ही पुस्तकं स्टॉलवर अग्रभागी दिसतात. फ्लेमिंग यांनी तर मोजकीच पुस्तके लिहिली पण त्यांच्या जेम्स बाँडची किंमत आजही चलनी नाण्याहून कमी नाही. तो एक ब्रँड झाला आहे. प्रदीर्घ शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीचा आधार घेत फ्लेमिंग यांनी फ्रॉम रशिया वुईथ लव्ह ही हेरकथा लिहिली तेव्हा तिच्यावर त्याच नावाचा जोरदार सिनेमाही आला. त्याकाळी रशियाशी आपली खास दोस्ती होती. खफा मर्जी नको म्हणून आपल्या सेन्सॉर बोर्डाने आधी सरळ बंदीच घातली नि ओरड झाली तेव्हा रशिया हे नाव वगळायला लावून मगच त्या सिनेमाला प्रमाणपत्र दिले.
§ मराठीत ज्येष्ठ अर्नाळकर आणि सत्तर ते ऐंशीच्या दशकात नव्यानं आलेले गुरुनाथ नाईक यांची पुस्तकंही नेहमीच मागणीत असत. अर्नाळकर यांचा झुंजार तसा नाईकांचा गोलंदाज. या दोन्ही लेखकांच्या बाबतीतला मोठा फरक म्हणजे अर्नाळकर हे इंग्रजी हेरकथांच्या प्रभावातून अलिप्त होते मात्र नाईकांच्या बाबतीत सरसकट तसं नव्हतं. त्यांना, पहिली रहस्यकथाच मुळी इंग्रजी चित्रपट (किस द गर्ल अँड मेक देम डाय) बघताना स्फुरली होती. पण त्यांच्या कथांचा चेहरा तसा स्वदेशीच राहिला. अर्नाळकरांच्या रहस्यकथांमधून एक झुंजारचा सौम्य अपवाद वगळता रोमॅन्टिक वर्णनं सापडत नसत. काशीकर आणि गुरुनाथ नाईक यांचं लेखन मात्र तितकं सोवळं नव्हतं. त्याकाळी चंद्रकात काकोडकर यांची पुस्तकंही स्टॉलवर तळपत होती. त्या प्रणयरम्य कथांची छाप या दोघांच्या वर्णनशैलीवर उमटे. टंच, घट्ट मिठी असे शब्दप्रयोग हटकून होत. अर्थात तो साठोत्तरी, बदलत्या काळाचा दौर होता. अर्नाळकरांच्या पुस्तकांनी दोनतीन पिढ्या पाहिल्या होत्या, त्यामानाने नाईक आणि काशीकर यांचा कालखंड बेताचा राहिला. नाईक यांच्या बाबतीत जीवनातील अस्थिरता हे एक कारण होते. बाबूराव अर्नाळकर यांचे वय झाले होते तरी लेखनसातत्य राखून ते चष्म्याच्या दुकानाशी निगडीत व्यावहारिक बाबीही नीट सांभाळत. स्वतः ते तांत्रिक कामातही निष्णात होते. फिरोझ गांधी यांचा चष्मा त्यांनी स्वहस्ते बनवून दिला होता, असा उल्लेख एका आठवणीत आढळतो.
§ मराठीत आता जुन्या धाटणीच्या नव्या रहस्यकथांची आवक नियमित दिसत नाही. मल्टी मीडियाला मराठी रहस्यकथांची पुस्तकं टक्कर देऊ शकत नाहीत. अर्नाळकर यांची पुस्तकं दीड रुपयात मिळत. हल्ली वर्तमानपत्रेच चारपाच रुपये देऊन खरीदावी लागतात. तर एकदोन बैठकीत वाचून होणारी पुस्तकं अडीचशे अन् तीनशे रुपयात. गेले ते दिवस आता परतणार नाहीत, हे खरं. तरी दुसर्या बाजूला मराठी रहस्यकथेतही आकर्षक नवे प्रवाह रुजत असल्याचे आशादायी चित्र आहे. इंग्रजीतल्या डॅन ब्राऊन, जॉन ग्रिशम यांच्या तोडीच्या नव्या रहस्यकथा मराठीत येऊ लागल्या आहेत. शोध (मुरलीधर खैरनार) आणि विश्वस्त (वसंत वसंत लिमये) यांच्या प्रदीर्घ रहस्यकादंबर्यांनी चोखंदळ वाचकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. समीक्षकांनी उपेक्षित ठेवला तरी रहस्य हा लेखनप्रकार टिकून राहील यात शंका नाही. ##

लेखन : संतोष महाजन
जेष्ठ पत्रकार, औरंगाबाद











