शासनमान्य ग्रंथालयाचा वाली कोण?
कर्मचाऱ्याचे हक्काचे वेतन दिवाळीपूर्वी का मिळाले नाही !
54 वर्षांपासून कर्मचार्याची दिवाळी अंधारात.. !
लातूर,-( प्रतिनिधी )-महाराष्ट्र राज्यातील शासनमान्य ग्रंथालयात काम करणारे 21615 कर्मचारी आहेत.त्यांच्यावर अवलंबून असलेले त्यांचे कुटुंब आज वेतनाविना ग्रंथालयात उपासीपोटी काम करीत आहेत.महाराष्ट्रात अनेक विभागातील कर्मचार्यांना सातवा वेतनआयोग मिळत आहे तरीही त्यांना दिवाळीपूर्वी बोनस जाहीर झालेला आहे.तसेच विधवा,परितक्त्या,आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, अपंग, श्रावणबाळ, बेघर, अनेक कलावंत, साहित्यिक इत्यादी अनेकांना त्यांचे मानधन बँक खात्यात मिळत आहे.मात्र,सद्यस्थितीला ग्रंथालय सेवक अपवाद आहेत त्यांना हक्काचे वेतन किंवा मानधन महिन्याच्या महिना बँक खात्यात मिळत नाहीत. दिवाळी सन येऊनही त्यांचे माहे जून -2020 पासूनचे वेतन अद्यापही मिळाले नाही. त्यांना उपाशीपोटी मारण्याचे महापाप हा विभाग सांभाळणाऱ्याकडून होत आहे.तसेच,याकडे 12 कोटी सुज्ञ जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.
महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक ग्रंथालयाची निर्मिती केली. त्यामध्ये काम करणाऱ्या पदाची निर्मिती केली परंतु त्यांना महागाईनुसार वेतन किती असावे याबाबतची तरतूद 54 वर्षांपासून केली नाही. ग्रंथालयाच्या विकासासाठी कर्मचार्यांना वेतनश्रेणी मिळावी यासाठी अनेक समित्या निर्माण केल्या परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे अद्यापही लागू केले नाहीत. भारतात अनेक राज्यामध्ये सार्वजनिक ग्रंथालयात काम करणाऱ्या कर्मचार्यांना वेतनश्रेणीनुसार व महागाईनुसार आज वेतन मिळते परंतु स्वतःला पुरोगामित्वाचा ठसा मिरवणारे महाराष्ट्र शासन अद्यापही ग्रंथालय सेवकांना निर्वाहयोग्य वेतन देऊ शकत नाही.किती मोठा आर्थिक अन्याय महाराष्ट्र राज्यातील 10149 ग्रंथालयातील 21615 शासनमान्य ग्रंथालय कर्मचारी सहन करीत आहेत. आर्थिक विवंचनेला कंटाळून अनेक ग्रंथालय कर्मचार्यांनी आत्महत्या केल्या आहेत हा पुरोगामी राज्याला लागलेला कलंक आहे. एवढा मोठा वर्ग एकीकडे उपाशीपोटी जीवन जगत असताना पुरोगामी महाराष्ट्रातील लोकशाहीत चूप कशी आहेत. महाराष्ट्रातील सुज्ञ वाचकांनी शासनाला जाब विचारून ग्रंथालयाचा महाराष्ट्रातील वाली कोण हे शोधून त्यांना न्याय मिळवून द्यावी, अशी आर्त हाक 21615 ग्रंथालय कर्मचार्यांनी केली आहे असे औसा ग्रंथालय कर्मचारी संघटना तालुका अध्यक्ष विजय होगले यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे.
———————————————————————
ग्रंथालयाचे अनुदान वेळेवर अदा करणे,ग्रंथपालास ओळखपञ अदा करणे,ग्रंथपालाचे अनुदान आँनलाईन बँकींग करणे आदी मागण्या प्रलंबित असल्याने याकडे कुणाचे लक्ष नसल्याच्या भावना ग्रंथपाल व्यक्त करित आहेत..!
———————————————————————











