पत्रकारितेतील चालते बोलते विद्यापीठ…
झुंजार नेताचे दिवंगत संस्थापक संपादक मोतीरामजी वरपे यांचे नाव निघाले तरी अगदी जमीनीपासून आकाशापर्यंतचा पत्रकारितेचा अभ्यास असलेले भारदार व्यक्तीमत्व डोळ्यासमोर येते. डोक्यावरील केसाचा उभा भांग, रूबाबदार मिशा, पांढरा नेहरू आणि धोतर असा त्यांचा पेहराव असे. विद्यार्थी दशेत गावाकडे याच दैनिकासाठी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम करत असतांना एके दिवशी पेपरच्या पार्सलमध्ये माझ्या नावाचे एक पॉकेट आले. त्या पाकीटावर माझ्या नावाचे एक पत्र होते. त्या पत्रात महत्वाच्या विषयावर आपणाशी चर्चा करायची असुन आपण झुंजार नेता कार्यालयात यावे असा मजकुर होता. आणि शेवटी व्यवस्थापक रत्नाकरराव वरपे अशी स्वाक्षरी होती. हे पत्र हाती मिळताच दुसऱ्या दिवशी मी बीडला येवुन किरायाच्या सायकलने शनिवार पेठेतील झुंजार नेताचे कार्यालय गाठले. व्यवस्थापक रत्नाकरराव वरपे, सहसंपादक संतोष मानूरकर यांच्याशी चर्चा झाल्यांनतर या दैनिकात उपसंपादक म्हणून मी काम सुरू केले . तेंव्हा या कार्यालयात मराठवाड्यातुन अनेक प्रकाशित होणारे वृत्तपत्र येत असत. सकाळी साडेदहा वाजता कॅबीनमध्ये आलेले मोतीरामजी वरपे दादा दुपारी तीन वाजेपर्यंत सर्वच वृत्तपत्राचे बारकाईने वाचन करत असतं हे वाचन करत असतांना आपल्याकडे कोणती बातमी आलेली आहे कोणती आली नाही याचे ते निरीक्षण करत असतं. जी बातमी आली नाही त्या बातमीवर काळ्या पेनने अधोरेखीत करून ती बातमी का आली नाही याची विचारणा होत असे दुसऱ्या दिवशी त्याच बातमीचा फॉलोअप हा वेगळ्या पध्दतीने नव्या माहितीसह तयार करायला ते सांगत असतं. यात शेती विषय बातम्या व राजकारणावरील बातम्यावर त्यांचे विशेष लक्ष असे . दुपारंनतर काही वेळ आराम व संध्याकाळी सात वाजता पुन्हा ईटीव्हीच्या मराठी बातम्या एैकण्यासाठी ते कार्यालयात येत असतं. महाराष्ट्रासह देशातील राजकारणावरील बातम्याही आपल्या दैनिकात आल्या आल्या पाहीजेत यासाठी टिव्हीवरील बातम्याचे मुद्दे नोट करून त्या पुन्हा सवीस्तर बातम्या लिहिण्यासाठी या कार्यालयात उपसंपादक म्हणून गणेश भंडारे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे या दैनिकात महाराष्ट्र व देश पातळीवरील बातम्या बरोबरच बीड जिल्ह्यातील घटना घडामोडीचे प्रतिबिंब उमटत असे. संपादकीय विभागातील सर्व उपसंपादकांनी पांढऱ्या लेटर पॅडवर लिहिलेल्या बातम्याचा एक एकत्रीत गठ्ठा रात्री दहा वाजता दादांच्या टेबलावर जाई. मग या बातम्यांचे ते सखोल वाचन करत असतं या बातम्या वाचतांना जर त्यांना हेडींग अथवा बातमीचा ऍन्ट्रो खटकला तर ते नवा ऍन्ट्रो स्वत: लिहुन बातमीत कशी दुरूस्ती करायची हे सुचवत. अगदी दोन कॉलम पासुन आठ कॉलम पर्यंतच्या बातम्यांना कोणता फॉन्ड वापरला जावा याची काळजी ते अचुक घेत. तपासल्या गेलेल्या बातमीवरच सुधारीत हेडींग बरोबरच बातमीसाठी योग्य बसणाऱ्या फॉन्ड ते नोट करत असतं संपादकीय संस्कार पूर्ण झाल्यांनतरच प्रत्येक बातमी ऑपरेटरकडे कंम्पोजसाठी जात असे. म्हणजे या ठिकाणी तोंडी बातम्यांना महत्व नव्हते. प्रत्येक उपसंपादकाला जी बातमी तयार करायची आहे त्याने ती लिहुनच दिली पाहीजे असा नियम त्यांनी घालुन दिलेला होता. झुंजार नेता मध्ये काम करत असतांना त्यांच्या सहवासात अनेक चांगल्या गोष्टी शिकत गेलो . दादा म्हणजे बीडच्या पत्रकारितेमधील एक चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांचा वारसा सध्या संपादक अजित वरपे हे पुढे नेत आहेत. बीडमध्ये पाऊल ठेवलेल्या अनेक तरूण पत्रकारांना संघर्षाच्या काळात दैनिकात काम करता आले. पत्रकारितेतील पिढी त्यांनी घडवली. हीच पिढी सध्या आता विविध दैनिकात चांगल्या पध्दतीने काम करत आहे. संस्थापक संपादक मोतीरामजी वरपे यांची आज पुण्यतिथी असुन त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन .
दिनेश लिंबेकर
पत्रकार, बीड











