*जीवेत शरद:शतम्*

0
753

*जीवेत शरद: शतम*

गेल्या पाऊणशे वर्षातील चढ़ उतार जर कोणी अनुभवले असतील ते शरद पवारांनी. आज ते ८१ वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांनी तयार केलेले कार्यकर्ते आठवणीच्या पडद्याआड गेले पण देशाच्या राजकारणातशरदचंद्रजी अजुनही सक्रिय आहेत. इतके दीर्घकाळ राजकारणात आपले स्थान टिकवुन ठेवणे सोपे नसते.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या तालमीत ते तयार झाले असले तरी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी त्यांना प्रथम मंत्रीमंडळात स्थान दिले. तो काळ असेल १९७२ – ७३चा. पवारांना गृह, माहिती व जनसंपर्क खात्याचे राज्यमंत्री केले गेले आणि पुर्ण निर्णय स्वातंत्र्यही दिले.

राज्यमंत्री झाल्यावर पवारसाहेब अकोला जिह्याच्या दौ-यावर आले. मुंबईहून येणारी हावडा मेल अकोल्याला सकाळी ६ वाजता आली. जिह्याचे प्रमुख अधिकारी, काँग्रेसचे कार्यकर्ते व शिवशक्तीचे वार्ताहर रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. तेथुन राज्यमंत्र्यांचा ताफा सर्किट हाऊसवर पोचला.

आमच्या पध्दतीप्रमाणे अकोल्यातील स्थानिक वृतपत्र शिवशक्ती, मातृभुमी व नागपुरचे लोकमत टाइम्स, तरुण भारत ही वृत्तपत्रे मी पवार सरांच्या समोर ठेवली. त्यांनी लगेच पाहिले व आपण माहिती अधिकारी का ? असे विचारले .मी मानेनेच हो म्हटले.

सकाळी पोलीस यंत्रणेची बैठक झाली. जिह्यातील संवेदनशील भागाबद्दल त्यांनी माहिती घेतली. प्रमुख अधिकाऱ्यांची पुन्हा बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीचे व वृतांकन करायचे नाही, असे मला खुणेनेच त्यांनी सांगितले.

दुपारी ४ वाजताचे सुमारास पवार साहेब सर्किट हाऊसच्या बाहेर आले ते पांढ-या शुभ्र साध्या पोषाखात . अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सचिव व. ल. ठाकूर यांच्या स्कुटरवर बसले. ठाकुरांनी लगेच स्कूटर दामटली ती मंगलदास मार्केटकडे. कॉटन मार्केट, माणिक टॉकीज, अकोट स्टँड ला भेट देऊन तेथील अवैध धंद्यांचे निरीक्षण करून सुमारे दिडदोन तासाने परत सर्किट हाऊसला आले . या प्रकरणाचा सुगावा पोलीस खात्यालाही नव्हता विशेष.रात्री आठ वाजताच्या मेलने पवारसाहेब मुंबईला रवाना झाले.

दुसऱ्या दिवशी मुंबईच्या नवशक्ती दैनिकात “अकोल्यात हरून अल रशीद ” मथळ्या खाली ठळक अक्षरात वृत प्रसिद्ध झाले. सर्व महाराष्ट्रात शरद पवारांचे कौतुक झाले.

विशेषतः विदर्भातील नेते मंडळींना खूपच नवल वाटले.स्वतःमधुसुदन वैराळे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी मुंबईत सर्व सहका-यांना फोन करून नवशक्ती वाचण्यास सांगितले. त्यानंतर पवार साहेब अकोला, वर्धा,अमरावती नागपूर,मुंबई अशा ज्या ज्या ठिकाणी भेटले तेथे माझ्याकडे पाहून फक्त स्मित करीत आणि मुंबईला परतताना “फोटोचे रोल” आठवणीने मागुन घेऊन विमानात बसत . त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या मुंबईच्या वृत्तपत्रात छायाचित्रासह

वृत प्रसिद्ध होत असे. त्यांच्या अनेक आठवणी स्मरणात आहेत.

त्यांना दीर्घायुरायोग्य लाभो हीच प्रार्थना

लेखन: सुधाकर धारव

निवृत्त माहिती उपसंचालक

संपादन : देवेंद्र भुजबळ.

9869484800

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here