परप्रांतात मराठी साहित्य चळवळ
…अन् बरंच काही, पुस्तक प्रकाशन समारंभ
हैदराबाद येथे मराठी समाज पिढ्यानपिढ्या रुजलेला आहे. येथील मराठी साहित्य आणि सांस्कृतिक वातावरण सृजनशीलतेसाठी अत्यंत पोषक असं आहे.
मराठी ग्रंथ संग्रहालय शताब्दी महोत्सवाचं औचित्य साधून गझलकार, कवी, व्यंकटेश कुलकर्णी लिखित ‘… अन् बरंच काही’ या गझल काव्यसंग्रहाचा दिमाखदार प्रकाशन समारंभ दत्तजयंतीच्या मुहूर्तावर पार पडला.

हैदराबाद येथील साहित्य क्षेत्रातील सक्रिय समूह ‘साहित्य कट्टा’ हैदराबाद’ ने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हा प्रकाशन समारंभ आयोजित करून हैदराबाद येथील तमाम मराठी रसिकांना सुखद धक्का दिला. विविध काव्य गीतांचं उत्तम सादरीकरण आणि ध्वनिमुद्रित गझला हे या प्रकाशन समारंभाचं मुख्य वैशिष्ट्य होतं.
या प्रकाशन समारंभासाठी साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा आशीर्वाद मिळाला. ज्येष्ठ लेखिका डॉ छाया महाजन, मराठी साहित्य परिषद तेलंगणच्या अध्यक्षा डॉ विद्या देवधर, सुप्रसिद्ध चित्रकार श्री श्रीधर अंभोरे, महाराष्ट्र मंडळ , हैदराबादचे अध्यक्ष श्री विवेक देशपांडे, मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष श्री दि पं खळदकर, रंगधारा नाट्य संस्थेचे संस्थापक सदस्य श्री भास्कर शेवाळकर, लेखक आणि व्याख्याते, डॉ जयंत कुलकर्णी, साहित्य कट्टा हैदराबाद चे श्री प्रकाश फडणीस, श्री प्रकाश धर्म आणि श्री अरुण डवळेकर, पुणे येथील कवी आणि चित्रकार श्री भालचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते अन् बरंच काही या गझल-काव्य संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं.

या प्रकाशन समारंभात सुप्रिया आगाशे, मुग्धा दिवाण, प्रकाश फडणीस आणि प्रकाश धर्म यांनी आपल्या सुंदर सादरीकरणाने काव्य मैफिल छान रंगवली. उज्वला धर्म आणि डॉ पुष्कर कुलकर्णी यांचं उत्तम निवेदन कार्यक्रमाची रंगत वाढवत होतं.
या सुंदर अशा कार्यक्रमाचं संगीत संयोजन आणि प्रकाशयोजना श्री नितीन बसरूर यांनी केली होती. ‘…अन् बरंच काही’ संग्रहामधल्या मधल्या एकूण १३ रचना कार्यक्रमात ऐकायला मिळाल्या. ही काव्यमैफिल संपूच नये असं प्रेक्षकांना वाटत होतं पण वेळेची बंधनं साभाळत कार्यक्रम आटोपशीर ठेवला होता. आणखी बरंच काही ऐकायचं राहिलंय आहे असं प्रत्येकाला वाटलं.

या समारंभात बोलतांना डॉ छाया महाजन म्हणाल्या, “व्यंकटेशला मी खूप वर्षांपासून ओळखते, गझल- काव्यविधेचा सखोल अभ्यास, चिंतन, मनन करून तो दिवसेंदिवस उत्तम कविता, गझल लिहू लागला आहे. त्याला सरस्वती प्रसन्न आहे. त्याच्या गझल- काव्यात, गेयता, शब्दलालित्य, आशयघनता ओतप्रोत भरलेली आहे.”
जागतिक किर्तीचे चित्रकार, श्रीधर अंभोरे आपल्या भाषणात म्हणाले, “मुखपृष्ठ तयार करण्या आगोदर
मी व्यंकटेश यांच्या रचना वाचल्या व मला पटले की व्यंकटेश हे नुसतेच र ला ट जोडणारे कवी नाहीत तर ते कवी हृदयाचे असुन ते निसर्गाच्या सानिध्यात राहिलेले आहेत. त्यांच्या गझल-काव्यात, समाजाचं, मानवी मनाचं, निसर्गाचं प्रतिबिंब दिसून येतं. त्यांच्या रचना आवडल्या म्हणूनच त्या अनुरूप मी मुखपृष्ठ तयार केलं.

मसाप अध्यक्षा डॉ विद्या देवधर म्हणाल्या, “व्यंकटेश यांचं शब्दसामर्थ्य आज आज आपण सादर झालेल्या काव्यमैफिलीत पाहिलंच आहे. इतकं सकस लिखाण करणारे कवी, लेखक आमच्या हैदराबादेत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. आता लिहिणारेही इथलेच, सादर करणारेही इथलेच आणि आयोजित करणारेही इथलेच हे पाहून समाधान वाटतं.
व्यंकटेश हे नुसतेच पद्यलेखनच करत नाहीत तर ते गद्दही तितकंच चांगलं लिहीतात व त्याचं उदाहरण म्हणजे पंचराधेच्या गझल विशेषांकातील त्यांचा गझलविषयक अभ्यासपूर्ण लेख.
विविध गायक संगीतकारांनाही व्यंकटेशच्या शब्दांचं गारुड आहे आणि त्यामुळेच त्यांच्या रचना विविध संगीतकार व गायकांनी गायल्या आहेत हे त्यांच्या लिखाणाचं खरं यश आहे.”
या कार्यक्रमात रुद्र कुमार, संकेत नागपूरकर यांनी ध्वनिमुद्रित केलेल्या व्यंकटेश यांच्या गझला पडद्यावर दाखवल्या गेल्या. औरंगाबाद येथील गायक संगीतकार सौ. वैशाली राजेश यांनी या गझल काव्यसंग्रहाचं औचित्य साधून ‘नयनात दाटला भाव तुझा सारंगा’ हे ध्वनिमुद्रित गीत लाँच केलं. अशा विविधतेमुळे कार्यक्रम अधिकाधिक रंगतदार झाला.

कार्यक्रमाच्या शेवटी व्यंकटेश , सगळ्यांचे त्यांच्यावरील प्रेम पाहून ते बोलताना भावविवश झाले व त्यांनी सर्वांच्या ऋणात रहाणे पसंत केले. ते म्हणाले ग्रंथालयातील चाळीस हजार पुस्तकांचा आशीर्वाद माझ्या पुस्तकाला लाभणं हे माझे अहोभाग्य.
कार्यक्रमाची सांगता त्यांच्याच एका रचनेने झाली.
कार्यक्रम बघणाऱ्या सर्वांनाच, ‘…अन् बरंच काही’ या पुस्तक प्रकाशन समारंभाव्यतिरिक्त बरंच काही जास्तीच पहायला, ऐकायला मिळालं हे मात्र खरं.




