सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानतर्फे ‘कोरोना जागर’ डिजिटल ग्रंथाचे प्रकाशन व लोकार्पण
नॅशनल टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांच्या व्याख्यानाचेही आयोजन
लातूर –
कोरोनासंदर्भात जनजागृतीस्तव सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व त्याअंतर्गत मराठी विज्ञान परिषदेच्या पानगाव विभागातर्फे दि. १३ जून ते दि. १५ आॕगस्ट, २०२१ दरम्यान ‘कोरोना जागर’ या साप्ताहिक ऑनलाईन व्याख्यानमालेअंतर्गत वैद्यकक्षेत्रातील अनेक अनुभवी मान्यवर तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व तज्ज्ञांच्या व्याख्यानसाहित्याचे संकलन डिजिटल स्वरुपात सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानतर्फे डिजिटल स्वरुपात प्रसिध्द करण्यात येत असून या डिजिटल अंकाचे दूरसंपर्क (आॕनलाईन) पद्धतीने झूमप्रणालीद्वारे प्रकाशन व लोकार्पण – राज्य व केंद्र पातळीवरील कोरोना नियंत्रण कृती दलाचे सदस्य मा. डॉ. श्री. राहुल पंडित (मुंबई) – यांचे हस्ते दि. २ जानेवारी, २०२२ (रविवार) रोजी आयोजित करण्यात आले आहे. त्याचप्रसंगी डॉ. राहुल पंडित यांचे ‘कोरोना संपला, की लपला.. ?’ या विषयावर व्याख्यान / परिसंवाद होणार आहे.
शास्त्रीय व अधिकृत माहितीचे हे संकलन आकर्षक डिजिटल ग्रंथ स्वरूपात लोकांसाठी मोफत व खुले उपलब्ध असणार आहे. कोरोनाविषयक या मौलिक माहितीचा ठेवा आता लोकांना प्रतिष्ठानच्या www.skspratishthan.com या संकेतस्थळावर कधीही वाचता येईल. या अंकात लातूरच्या एम. आय. एम. एस. आर. वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बी.एस. नागोबा, जनआरोग्य वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. मुकुंद भिसे, शरीरक्रियाशास्त्र विभागाचे डॉ. महेश उगले, औषधनिर्माणशास्त्र विभागाचे डॉ. अभिजीत मुगळीकर, लातूर येथील कृष्णा विश्लेषक प्रयोगशाळेच्या डॉ. ऋजुता अयाचित, अतिदक्षतातज्ज्ञ डॉ. शिरीष पाटील, डॉ. सौ. सुनिता पाटील, डॉ. अरुण मोरे, मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशक डॉ. मिलिंद पोतदार, डॉ. सौ. अनघा राजपूत, डॉ. दिनेश पाटील व मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जनआरोग्य वैद्यकशास्त्राच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) या मान्यवर अनुभवी व संशोधक तज्ज्ञांचे व्याख्यानसाहित्य उपलब्ध असणार आहे.
या माहितीचा स्रोत दुर्मिळ व अमूल्य असून त्याचा सर्व जगातील कुठल्याही मराठी भाषिकांना लाभ घेता येईल, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यवाह डॉ. संतोष कुलकर्णी, पुरुषोत्तम भांगे व प्रा. मनोहर कबाडे यांनी दिली व प्रस्तुत ऑनलाईन प्रकाशन समारंभात सर्वांनी सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.











