*धावता दौरा अन् मनाला नवी उभारी देणारी जिव्हाळ्याची माणसं…*
नमस्कार,
खरंच, आजच्या जमान्यात ना..ना..नाच्या नकारात्मक पाढ्याला पुसून सकारात्मकतेचे टॉनिक कसे मिळवायचे? हा सर्वांनाच पडलेला प्रश्न असतो.त्याप्रश्नाचे अचूक उत्तर म्हणजे जिव्हाळ्याची माणसं! ती भेटली की सकारात्मकतेच्या ऊर्जेचे पेव फुटते.हत्तीचे बळ मिळते आणि मन नवी उभारी घेवून गतिमान. होते. अगदी त्याच पठडीतला अनुभव देणारा कालचा औरंगाबाद-अहमदनरचा धावता दौरा ठरला.

स्वर्गीय विलासरावजींच्या प्रेरणा-आशीर्वादाने माझे मित्र विजय राऊत यांनी सुरु केलेल्या औरंगाबाद येथील दगडोजीराव देशमुख शिक्षण संस्थेच्या वाटचालीने पाहता-पाहता वीस वर्षे पार केली.त्यासंस्थेची भव्य इमारत आणि प्रांगणात राऊत आणि टीमने जिव्हाळ्याने केलेला स्वागत- सत्कार जुन्या आठवणींना नवी झळाळी देवून गेला. पं.जवाहरलाल नेहरुंच्या “डिस्कवरी ऑफ इंडिया” या ऐतिहासिक ग्रंथाला जन्म देणाऱा नगर किल्ला आणि नगर शहराच्या ऐतिहासिक ऐवजाची आठवण देणाऱ्या अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुसज्ज आणि अलिशान नव्या इमारतीत आमचे मित्र डॉ.राजेंद्र भोसले यांनी चारच दिवसांपूर्वी प्रवेश कारभार सुरु केला.त्या कार्यालयातील कलात्मकता आणि अत्याधुनिक सोयी-सुविधा अभ्यासण्याची संधी मिळाली.सोबतीला कवी-पत्रकार किशोर मरकड परिवार, दिपक सोनी परिवार, पत्रकार नितीन देशमुख आणि अहमदनगरचे लोकाभिमुख जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील या सर्वांचा सहवास लाभला.

औरंगाबाद येथील धनंजय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या संचालिका, रोटरी क्लबच्या अध्यक्षा आणि बार्शीच्या मातृभूमी प्रतिष्ठानच्या कोअर कमिटी सदस्य आमच्या भगिनी रागिणीताई कंदाकुरे यांचा काल वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्यांच्यासह आमचे भाऊजी व धनंजय ग्रुपचे शिल्पकार तुकाराम कंदाकुरे व चिरंजीव धनंजय यांची भेट झाली. औरंगाबाद-नगरचा धावत्या दौऱ्याने मनाला नवी उभारी दिली. आणखी काय हवं?

*राजा माने*











