*कोरोना आणि….!*

0
341

कोरोना आणि…..!

आज मकरसंक्रांतीचा नववर्षाचा पहिला सण.या निमित्ताने मित्रवर्य डॉ.विश्वाधार देशमुख यांनी सातत्याने सुरू ठेवलेल्या ऑनलाइन युट्युब चॅनल वरील उपक्रमाविषयी लिहिले आहे. हे आपल्याला ही शेअर करतो आहे.

कोरोना- लॉकडाऊन-……. विद्यार्थी केंद्री उपक्रम
आणि
डॉ.विश्वाधार देशमुख
—————————-
डॉ.विश्वाधार देशमुख हे कवी, समीक्षक, वृत्तपत्रांत स्तंभलेखक, प्रभावी वक्ते, उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि अभ्यासू विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून सर्व परिचित आहेत. वाचन-लेखन नीट पध्दतीने झाले की त्यांच्या दिशा ही स्पष्ट असतात.म्हणून प्राध्यापक तो खरा प्राध्यापक- शिक्षक असतो,स्वतः बरोबर तो आपल्या विद्यार्थी समूहाला ही तितक्याच प्रतिभेच्या उंचीवर घेऊन जात विद्यार्थ्यांचे जीवन ही समृद्ध करत असतो.कोरोना काळात स्वस्त न बसता विद्यार्थ्यांना ज्ञान-विज्ञान, विचार, साहित्य, संस्कार, प्रबोधन आणि कलाभिरूचीच्या अनेक उपक्रमांतून विद्यार्थ्यांवर संस्कार केले.यासाठी वेळ, ओळख खर्ची घालून जीवनातील नव्या आयामांचा शोध घेतला. कसोटीचा काळात सचोटीने विद्यार्थ्यांसमोर प्रबोधनाचे अनेक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
डॉ विश्वाधार देशमुख यांनी कोरोना महामारी काळात विद्यार्थ्यांसाठी ज्ञानार्थी व कलाभिरूची विविध उपक्रम कल्पकतेने राबविले आहेत.अशा अवघड काळात ही, जर आपण ठरविले तर नवा प्रेरणादायी अध्याय समाजाला प्रदान करू शकतो.एक निश्चित दिशा देऊ शकतो, ही जाणीव करून दिली आहे.
कोरोना महामारीने संपूर्ण जग ठप्प झाले असताना,कोरोनाने मानवी जीवनासमोर नवी आव्हाने उभी केलेली असताना,कोरोना’च्या वाढत्या कहराने मागील पावने दोन वर्षांपासून समाजमनामध्ये एक प्रकारची बेचैनी आणि अस्वस्थता व्यापून राहिली असताना,कोरोना आता नवनवीन व्हेरियंट्समुळे उत्तरोत्तर या विषाणूच्या संसर्गाची गती वाढत चालली असताना आणि आपले जगणे भयग्रस्त झाले असून, जीवनाच्या चिंता वाढलेल्या असताना,अशावेळी ‘बस आता संपलं सगळं!’ असं वाटायला लावणा-या निराशेच्या काळात मोबाईल आणि तत्सम माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविले.हे खूप महत्त्वाचे आहे. निराशेच्या विषाणूंचा स्पर्श होऊ न देता अशाही परिस्थितीत जीवन थांबत नसते.तर ते नव्या मार्गाने प्रवाहित होत असते. ही जाणीव दिली.
खरेतर कोरोना महामारीने जगण्याची नवी परिमाने दिली आहेत.डिजीटल क्रांतीमुळे जग जवळ आले, आणि संपर्कांची माध्यमे वाढली.ती कशी कशी आहेत त्यांचा नेमका परिचय या काळात आपणास झाला आहे.
व्हाट्सअप, फेसबूक, युट्युब,व्हिडिओ, झूम मीटिंग व गुगल मिठ या माध्यमातून आपण या काळातही संपर्कात,संवादात आहोत.
ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.अशा माध्यमाचा वापर करून आपण सर्वांनी आपले अध्यापन कार्य केले.
पण डॉ.विश्वाधार देशमुख यांनी अध्यापन कार्यावर समाधान न मानता या माध्यमाचा विस्तार करत विद्यार्थ्यांना वाचन- संभाषण- प्रगटीकरणाचे भान दिले. वर्तमानात महापुरुषांच्या विचारांचा परिचय करून दिला.विद्यार्थांना वाचन, लेखन व भाषण कौशल्यात गती मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.विद्यार्थी केवळ परीक्षांर्थी न होता ते अनेक कौशल्यात निपुण व्हावे.महामारी संकट काळात भयग्रस्त न होता संवादाच्या आभासी माध्यमातून स्वतःला प्रगत आणि प्रगट करावे.ते ज्ञानार्थी व्हावे.या जाणिवेतून निराशेच्या संसर्गापासून तरुणाईला वेगळे काढून त्यांच्यामध्ये भविष्याला आश्वासक आकार देण्याचा आशावाद निर्माण करता यावा यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये साहित्य, नाटक,सिनेमा अशा विविध कलांचा आस्वाद आणि त्यातून आपल्या कलागुणांची अभिव्यक्ती करण्यासाठी आत्मविश्वास वृद्धिंगत करता यावा हा हेतू मनात ठेवून वर्षभर अभिनव असे वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. डॉ.विश्वाधार देशमुख यांनी या काळावर जणू यशस्वी मात केली आहे.
” श्रध्देय डॉ.शंकरराव चव्हाण वाचन कट्टा ” २०१९ पासून त्यांनी सुरू केला होता. वर्तमानाचे भान ओळखत या शैक्षणिक उपक्रमाचा विस्तार केला.मार्च २०२० नंतर कोरोना महामारी मुळे विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहण्याचे बंद झाले. तेंव्हा युट्युब या माध्यमातून विद्यार्थी संवादाचे उपक्रम वेगवेगळ्या विषयांनी चालविले.
यात कल्पकता, आत्मविश्वास, ध्येय, नियोजन आणि सक्रीय सहभागातून अविश्रांत मेहनत करून आजी- माजी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ” कल्पक विद्यार्थी समूह ” निर्माण करून “विचारशलाका”, “वाचन कट्टा” व “अभिरुची” अशी ऑनलाइन व्यासपीठे निर्माणकेली.कोरोनाचा वाढता कहर, सततच्या लॉक डाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी, संवाद,विचारांची देवाणघेवाण कमी झाली.अशा वेळी डॉ.देशमुख सर स्वस्थ न बसता अनेक क्रियाशील उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या भविष्याला आश्वासक आकार देण्याचा अतिशय सुंदर प्रयत्न त्यांनी केला आहे. साहित्य कोणते वाचावे, कला कशा जोपासाव्यात, नाटक-सिनेमाचा आस्वाद कसा घ्यावा अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांवर संस्कार केले आहेत. नव्या वर्तमानाची त्यांना जोडून घेतले आहे. विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देत त्यांच्या भविष्याला आकार देण्याचा अतिशय सुंदर प्रयत्न या उपक्रमांमधून केला आहे. विद्यार्थ्यांना कला मूल्य, व कौशल्य यातून आत्मसात झाली आहेत. या काळात त्यांनी योजिलेल्या उपक्रमांची यादी जरी वाचली तरी त्यांच्या धडपडीचा आपणास अंदाज येतो. जवळपास तेहतीस उपक्रम आजपर्यंत त्यांनी यशस्वी केली आहेत.या उपक्रमांची माहिती अशी आहे.

१) कोरोना काळातील कविता वाचन-भाग ५० :

या उपक्रमात ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ विजेते ज्येष्ठ कवी जसे सहभागी झाले होते तसेच ‘युवा साहित्य अकादमी’ पुरस्कार विजेते तरुण कवीही सहभागी झाले होते.ग्रामीण भागांतील कवी जसे सहभागी झाले होते तसेच महानगरीय कवीही सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील कवी जसे सहभागी झाले होते तसेच बृहन्महाराष्ट्रातील (गोवा,बेळगाव) कवीही सहभागी झाले होते.यामध्ये
डॉ.केवश सखाराम देशमुख, गुरू ठाकूर,
अनुराधा पाटील,श्रीकांत देशमुख,नीरजा,गुरु ठाकूर,जगदीश कदम, देविदास फुलारी,इंद्रजित भालेराव,केशव सखाराम देशमुख,मनोज बोरगावकर,दासू वैद्य,प्रज्ञा दया पवार,अजय कांडर,श्रीधर नांदेडकर,वृषाली किन्हाळकर, अनुजा जोशी,अनिल धाकू कांबळी, पी.विठ्ठल, पृथ्वीराज तौर,बालाजी मदन इंगळे,सारिका उबाळे,पद्मरेखा धनकर,योगिनी सातारकर-पांडे, सुचिता खल्लाळ, कल्पना दुधाळ,रवी कोरडे, वीरा राठोड,महेश लोंढे,महेंद्र कदम,संदीप जगदाळे,बालाजी सुतार,वृषाली विनायक, व्यंकटेश चौधरी,प्रिया धारुरकर,गेणू शिंदे, गणेश घुले,नारायण पुरी, नितीन देशमुख,वैभव देशमुख,विनायक पवार, निलेश चव्हाण,रमेश रावळकर,तृप्ती अंधारे, शिवाजी आंबुलगेकर, विष्णू जोशी,विनायक येवले,महेश मोरे,बालाजी फड,अविनाश भारती, दिपाली राणे,भाग्यश्री केसकर, रामप्रसाद वाव्हळ,भालचंद्र मगदूम असे आजघडीला महत्त्वाचे असणारे कवी/कवयित्री या उपक्रमात सहभागी झाले होते.

२)प्रेरणेचा प्रवास- भाग २५ :

यापुढील जगाची विभागणी कोरोना पूर्वीचे जग आणि कोरोना नंतरचे जग अशा टप्प्यात होणार आहे.कोरोना नंतरच्या जगात जवळपास सगळ्याच क्षेत्रात उलथापालथ घडून येणार आहे; जुन्या सत्तांना हादरे बसून नवीन सत्तांच्या उदयासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे. या नव्या जगाच्या घडणीमध्ये तरुणाईचे योगदान सर्वाधिक महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी आपल्या तरुणाईने काय तयारी करायला हवी यासाठी तरुणाईसोबत संवाद करण्यासाठी ‘प्रेरणेचा प्रवास’ हा उपक्रम सुरू केला. हा उपक्रम २५ भागात आहे.
‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर, मंदार भारदे,योगेश शिरसाट, प्रसाद नामजोशी,अनुप शर्मा,अरविंद जगताप,संदीप पाठक,हेरंब कुलकर्णी, नवनाथ बन( ABP माझा),प्रविण मुंढे,संकेत कुलकर्णी,हेरंब कुलकर्णी( फिनलंड),डॉ.नंदकुमार मुलमुले, अपर्णा पाडगावकर, तेजस्विनी सावंत,अनिता दाते, माणिक मुंढे ( टीव्ही-9),कश्मिरा कुलकर्णी,विशाखा सुभेदार, आल्हाद काशीकर, दीक्षा दिंडे, संतोष सहाणे, ज्ञानदा कदम( ABP माझा),अमृत बंग,) या मान्यवरांनी तर दुसऱ्या पर्वात दत्ता बारगजे,प्रफुल्ल तावरे,प्रवीण बर्दापूरकर,अॅड.लालसू नागोटी,निशिकांत भालेराव,विनायक पाचलग अशा विविध क्षेत्रांवर आपल्या कर्तृत्वाची नाममुद्रा उमटवलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या सीरीजचा विद्यार्थी वर्गाला मोठा फायदा झाला.

३) अभिरुची संवाद :

आपण एकंदरीत दृश्य साक्षरता नसलेल्या समाजात राहतो. परिणामी ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ बनलेल्या काळात वेगवेगळ्या माध्यमातून प्रसारित होणारा कोणता सिनेमा पहावा ? तो कसा पाहावा? याचे नीट असे भान आपणाला अद्यापही आलेले नाही.याशिवाय या माध्यमाची नीट ओळख करुन घेऊन यातील व्यवसायाच्या संधींचा फायदा करुन घ्यायला हवा याबद्दलची
सजगता आपल्याकडे नाही, म्हणून हे सजग भान यावे, जागतिक स्तरावर चर्चा झालेले काही निवडक मराठी,इराणी,इंग्रजी,हिंदी, चित्रपट विद्यार्थ्यांना त्यांनी दाखवले.याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘लघुपट महोत्सवातून’ २५ लघुपट विद्यार्थ्यांना दाखवले.
तसेच नाटक,सीरीयल्स चित्रपट कलेशी निगडित ‘चिंता,चिंतन आणि मंथन’ सगळ्यांच्या समोर यावे म्हणून ‘अभिरुची : संवाद’ ही संवादाची मालिका सुरु केली.
यामध्ये रवी पाठक,अमोल उदगीरकर,अनिल कांबळे,अनिकेत मस्के,सचिन केरुरकर,श्रीपाद जोशी,रेणू जोशी,विवेक कुलकर्णी,प्रशांत गिते,
विनय देशमुख,चंद्रशेखर जनवाडे अशा मान्यवर अभिनेते,दिग्दर्शक,चित्रपट समीक्षक,अभ्यासक
यांनी विद्यार्थ्यांना ‘करिअरच्या नव्या दिशा’ शोधायला प्रवृत्त करणारे मार्गदर्शन केले.

४)घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत :

यातून विद्यार्थ्यांना मानसिक आधार देत जीवनातील नवीन संधीचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन केले.

५) संवाद साधूया मागील पिढीशी :

कोरोना आपत्तीमुळे कधी नव्हे ते एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांचे प्रतिनिधी निवांत वेळेसह घरामध्ये एकत्रित आलेले आहेत. मग नव्या पिढीने जुन्या पिढ्यांना त्यांच्या अनुभवाबद्दल बोलतं करून आजोबांच्या समृद्ध अनुभवातून आलेली शहाणीव नातवाला वाटून दिली.
यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांच्या
सोबत संवाद साधून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

६) परिचय साहित्य
संकल्पनांचा :

पदवी अभ्यासक्रमाला शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात साहित्य संकल्पनांविषयी असलेल्या कुतुहलाला डोळ्यांसमोर ठेवून कथा,कविता,कादंबरी,नाटक,समीक्षा,चरित्र, लोकसाहित्य,वैचारिक साहित्य अशा साहित्य संकल्पना विद्यार्थ्यांना उलगडून दाखवल्या.
यामध्ये ऋषिकेश देशमुख (कविता),डॉ.कैलास अंभुरे (समीक्षा),डॉ.दत्ता घोलप (कादंबरी), डॉ.गणेश मोहिते (कथा),डॉ.दुर्गेश रवंदे (नाटक),
डॉ.सुर्यप्रकाश जाधव (लोकसाहित्य), डॉ.हंसराज जाधव (चरित्र),डॉ.हंसराज भोसले (वैचारिक साहित्य),डॉ.ज्ञानदेव राऊत (ग्रामीण साहित्य) या मान्यवर अभ्यासकांनी प्रस्तुत संकल्पनांचा परिचय करुन दिला.

७) महामानवांना वैचारिक अभिवादन :

आपल्या देशाची उभारणी करणाऱ्या महामानवांच्या विचार-कार्याचा विद्यार्थ्यांना विस्तृत परिचय व्हावा या हेतूने ‘महामानवांना वैचारिक अभिवादन’ हा उपक्रम सुरु करुन यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा गांधी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,राजर्षी शाहू महाराज,लोकमान्य टिळक,साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या विचार-कार्याचा परिचय करून देण्याचे काम विद्यार्थ्यांनी करायला लावले.

८) युवा प्रतिभावंतांशी संवाद:

या अभिनव उपक्रमाच्या अंतर्गत दखलपात्र, सन्मान प्राप्त करणाऱ्या (‘युवा साहित्य अकादमी’ तसेच अन्य महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त) तरुण पिढीच्या प्रतिनिधींनी आपल्या लेखनाच्या प्रेरणा आणि धारणा याबद्दल आजघडीला नव्याने लिहू पाहणाऱ्या तरुणाईसोबत मनमोकळे हितगुज केले.
यामध्ये रवी कोरडे,वीरा राठोड,राहुल कोसंबी, सुशीलकुमार शिंदे,नवनाथ गोरे,प्रसाद कुमठेकर, संदीप जगदाळे,योगिनी सातारकर-पांडे यांनी विद्यार्थ्यांसोबत आपल्या लेखनप्रक्रियेच्या अनुषंगाने संवाद साधला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड निर्माण झाली.अनेक विद्यार्थ्यांनी स्वतंत्र ब्लाॅग लेखन सुरु केले आहे.

९) श्रद्धेय शंकरराव चव्हाण वसा आणि वारसा- १० भाग :

माजी केंद्रीय गृहमंत्री,राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या जलसंस्कृतीचे जनक श्रद्धेय डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्वाचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व विद्यार्थ्यांना समजून घेता यावे या हेतूने आयोजित या उपक्रमात १० विद्यार्थ्यांनी या लोकनेत्याच्या निराळेपण उलगडून दाखवले.

१०) कै.शंकरराव चव्हाण लेक्चर सीरीज- ५ भाग:

कै.शंकरराव चव्हाण लेक्चर सीरीज मध्ये घेण्यात आलेली डॉ.बालाजी चिरडे,डॉ.महेश जोशी, डॉ.रोहिदास नितोंडे,डॉ.विजय भोसले या मान्यवरांची व्याख्याने उपलब्ध करुन दिली.
११) परिचय नरहर कुरुंदकरांच्या विचारधनाशी- १० भाग :

हिरकमहोत्सवी महाराष्ट्राचे विचारविश्व घडविणाऱ्या विचारवंतांच्या विचारवैभवाचा तरुण पिढीला परिचय करुन देण्यासाठी ही परिचय मालिका सुरु केली.
ज्याची सुरुवात नरहर कुरुंदकरांच्या विचारधनाच्या परिचयाने केली.डॉ.ओमप्रकाश समदाणी,डॉ.श्रीनिवास पांडे,श्री.प्रसन्न जोशी, डाॅ.अभय दातार,डॉ.बालाजी चिरडे,डॉ.दुर्गेश रवंदे,डॉ.अशोक भोसीकर,डॉ.नागनाथ बळते, डॉ.दत्ताहरी होणराव, किरण देशमुख अशा अभ्यासकांनी कुरुंदकरांच्या विचारधनाचे मर्म उलगडून दाखवले.

१२) स्मरण गांधीजींचे- ८ भाग:स्मरण पंडित जवाहरलाल नेहरूंचे :

महामानवांच्या विचारधनाचा तरुण पिढीला परिचय करुन देण्याचा प्रयत्न केला आहे.छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा गांधी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारधनाच्या परिचयानंतर आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या विचार-कार्याचा परिचय शशी थरुर,रामचंद्र गुहा यांची दोन स्वतंत्र पुस्तके आणि दोन संपादित ग्रंथ यांच्या आधारे आमच्या विद्यार्थ्यांनी करुन दिला.
१३) छ.शिवरायांना का आठवावे- ५ भाग,
१४) स्मरण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे- ६ भाग,
१५) राजर्षी शाहू महाराज वसा आणि वारसा या सीरीजमधून त्या त्या विचारवंतांचे महत्त्व विशद केले.
१६) पुस्तके झपाटलेपणा कडून जाणतेपणाकडे नेणारे- १२ भाग :
यामध्ये मानवविज्ञान विद्याशाखा,विज्ञान आणि वाणिज्य अशा तिन्ही विद्याशाखांशी निगडीत असणाऱ्या आणि तरुणाईला झपाटलेपणाकडून जाणतेपणाकडे नेणाऱ्या पुस्तकांचे आपल्या आयुष्यातील मोल विद्यार्थ्यांनी उलगडून दाखवले.

या उपक्रमात आजी-माजी विद्यार्थ्यांबरोबर अन्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही आवर्जून सहभाग नोंदवला.
१७) अभिजात साहित्याचे अभिवाचन-५ भाग:
कुसुमाग्रज,विंदा करंदीकर,पु.ल.देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर अशा महत्त्वाच्या लेखक-कवींच्या साहित्याचे अभिवाचन विद्यार्थ्यांनी केले.
१८) चला अभिरुची घडवू या,२१) थेट भेट अभ्यासक्रमातील लेखकांशी,
१९) नवीन कृषी कायदे: परिसंवाद,
२०) महाराष्ट्र साठी आणि दिठी- ६ भाग:
हिरक महोत्सवी महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांचा सांगोपांग आढावा वसुंधरा काशीकर (शेती), सुलक्षणा महाजन (शहरीकरण), डॉ.प्रकाश परब (भाषा),दत्ता थोरे (महामानवांचे मूल्यमापन), सुशील कुलकर्णी (पत्रकारिता) आणि डॉ.प्रदीप आवटे (सार्वजनिक आरोग्य) इत्यादी बाबींवर प्रकाश टाकला.
२१) विज्ञानाशी जोडू नाते-४ भाग,
२२) प्रासंगिक व्याख्याने-५ भाग,
२३) आणि ग्रंथोपजीविये,
२४) स्मरण विंदांचे आणि कविता कुसुमाग्रजांच्या,
२५) अभिरुची अभिवाचन,
२६) अभिरुची आस्वाद,
२७) महाराष्ट्र चिंतामणी: म्हणजे चिंतामणराव द्वारकानाथ ऊर्फ सी. डी. देशमुख!
हे वर्ष त्यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीचे!
देशाच्या अर्थकारणास ऐतिहासिक वळण देणाऱ्या, त्याचप्रमाणे भारताच्या शासकीय, प्रशासकीय, आर्थिक व सामाजिक व्यवस्थेस चेहरामोहरा प्रदान करणाऱ्या चिंतामणराव देशमुखांच्या सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्वाचा शोध आणि बोध घेण्याची इच्छा तरुण पिढीच्या मनात जागी व्हावी,या हेतूने तरुण अभ्यासकांनी त्यांच्या सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला.
२८) आर्थिक उदारीकरणाची तीन दशके: परिसंवाद:
उदारीकरण भारतात अवतरले त्याला २४ जुलै २०२१ रोजी तीन दशके पूर्ण झाली.

‘आर्थिक उदारीकरण’ हा स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. कारण याचे परिणामी बहुक्षेत्रीय आणि दूरगामी राहिलेले आहेत.या धोरणाने आर्थिक,राजकीय, सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक अशा सगळ्याच क्षेत्रांना कमालीचे प्रभावित केलेले आहे.

हे प्रभाव नेमके काय आणि कोणते आहेत? हे पडताळून पाहावे या उद्देशाने अर्थकारण, राजकारण,शिक्षण आणि सिनेमा अशा विविध क्षेत्रांतील बदलांचा वेध घेणारा उपक्रम आयोजित केला होता.

‘आर्थिक उदारीकरणाची तीन दशके : काय घडले,काय बिघडले?’ याची पडताळणी करत असतांना चार दिवस चार वेगवेगळ्या क्षेत्रांची चर्चा
२९) ७५ वर्ष पुस्तकांच्या पृष्ठांमधून आणि
या सगळ्या उपक्रमांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात सक्रिय असलेले तसेच यासोबत जोडलेले विद्यार्थी हे केवळ मानव्यविद्या शाखेतील नाहीत तर विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचे यामध्ये लक्षणीय योगदान राहिलेले आहे.अगदी टक्केवारीत याचे प्रमाण नोंदवायचे झाल्यास १५% माजी विद्यार्थी,३०% मानव्यविद्या शाखेचे विद्यार्थी,१०% वाणिज्य विद्याशाखेचे विद्यार्थी तर ४५% विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग राहिलेला आहे.

विद्यार्थ्यांसोबतच त्यांचे पालक तसेच समाजातील अन्य जाणकारांनी देखील ‘वाचनकट्ट्या’च्या या चळवळीची उत्स्फूर्त दखल घेतलेली आहे म्हणून तर दोन वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या ‘विचारशलाका’,’युवा मन्वंतर’ आणि ‘अभिरुची’ या युट्युब चॅनल्सचे सबस्क्रिप्शन काही हजारांत आहेत.
अशा विविध विषयाने ही व्याख्यानाची सीरीज त्यांनी मागच्या पावणे दोन वर्षात घेतली आहे.यापुढे ते घेत आहेत.माणूस आपल्या कार्याप्रती निष्ठा आणि आत्मविश्वास बाळगून असला म्हणजे अशी कार्य निर्धोक तेने होतात.या उपक्रमाच्या निवडी पासून ते वक्ता निवडणे युट्युब लिंक विद्यार्थ्यांना पाठविणे, त्यांना ती पाहण्यासाठी प्रवृत्त करणे, दररोजच्या व्याख्यानासाठी नवा वक्ता शोधणे हे काम खूप जिकिरीचे व प्रचंड वेळखाऊ असते.पण डॉ.देशमुखांनी हे स्वतःशीच बांधील रहात अखंडित पणे वेगवेगळ्या भागातून सुरू ठेवले आहे,ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे.त्याचे हे उपक्रम आजी- माजी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन यशस्वीपणे घेतले आहेत.साहित्य कलाकृती, सिनेमा- नाटक, महापुरुषांच्या ग्रंथावर, साहित्य संकल्पनावर व्याख्याने आयोजित केली होती.ती उत्तम झाली आहेत.यातून विद्यार्थ्यांनवर गंभीरपणे वाचनाचा आणि आत्मविश्वासाने संवाद साधण्याचा कौशल्याभिमुख विश्वास निर्माण केला आहे.महाविद्यालय शिक्षण ही एक मोठी जबाबदारी आहे.ती जशी विद्यार्थ्यांची असते तितकीच ती प्राध्यापक वर्गाचीही असते.अध्ययन आणि अध्यापन या प्रक्रियेत दोन्हीही घटक आधारभूत आहेत.प्राध्यापक हे अभ्यासक्रम तर शिकवतात, पण त्याबरोबरच जीवन शिक्षणाची,जीवन कौशल्याची जाणीव करून देणे हे ही मूलभूत कार्य आहेत.विद्यार्थाला जीवनाचे भान वाचनाशिवाय येत नाही.पण हे कोणते वाचन केले पाहिजे हे भान मात्र शिक्षकच देऊ शकतो.हे विसरून चालणार नाही.या दृष्टीने डॉ.विश्वाधार देशमुखांनी केलेले कार्य खूप मौलिक,मूल्यवान आहे.
विद्यार्थ्यांना डॉ.देशमुखासारखे शिक्षक मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे.वाचन- लेखन व संवादाची प्रक्रिया स्वत: पुरती मर्यादित न ठेवता ती विद्यार्थ्यी वर्गात रूजवली आहे.
या उपक्रमांचा आवाका पाहता डॉ.विश्वाधार देशमुख सरांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.पुढील वाटचालीस शुभेच्छा आहेत.

डॉ.जयद्रथ जाधव
मराठी विभागप्रमुख
शिवाजी महाविद्यालय रेणापूर जि.लातूर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here