विवेकाचाप्रवक्ता
पुण्यसमरण10फेब्रुवारी
विचारवंत,तत्वज्ञ,लेखक ही त्या काळाची अपत्य असतात असं मानलं तरी त्यांच्या साहित्यकृती कडे वाचक वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या दृष्टिने बघत असतात. अनेकदा, एकाच साहित्यकृती कडे एक वाचक वयाच्या भिन्न टप्प्यांवर अनेकविध दृष्टींनी बघू शकतो.आणि एका विशिष्ट कालखंडानंतर पूर्ण समाजच त्याकडे बऱ्यापैकी एकसंध साच्यातून बघायला लागतो.त्या ग्रंथांचं समाजमनाच्या जडणघडणीत असलेलं योगदान आपल्या लक्षात यायला लागतं.
त्याअनुषंगाने काही लेखक,विचारवंत कधीही कालबाह्य होऊ शकत नाहीत.कारण त्यांनी समाजाला काय विचार करावा हे शिकवलेलं नसतंच; तर तो कसा करायला हवा हे शिकवलेलं असतं!या पार्श्वभूमीवर सॉक्रेटिसची गादी चालवणाऱ्या एका शिष्योत्तमाला वगळून पुढे जाणं केवळ अशक्य आहे. नरहर अंबादास कुरुंदकर. अवघं पन्नास वर्षाचं आयुष्य आणि त्यात पंचवीस तीस वर्षाचं वाङ्मयिन आयुष्य लाभलेल्या या प्रज्ञावंताने लिहिलेली पुस्तकं,लेख आणि अनेक प्रसिद्ध पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावना इतिहास,राजकारण, साहित्य,कला,धर्म,संगीत आणि तत्वज्ञान यांची माणसाच्या आयुष्याशी सांगड घालणारी ,नवी गृहीतके मांडणारी , बावनकशी सोनं म्हणता येईल अशी आहेत.त्यांना सॉक्रेटिसच्या शिष्योत्तम म्हणण्याचं कारणच त्यांची तर्कशुद्ध विचार करण्याची पद्धत,धारदार युक्तिवाद आणि सर्वमान्य गृहितकांवर केलेला पुनर्विचार.

कोणत्याही साक्षेपी विचारवंतांचा गडकोट उभा असतो तो चार बुरुजांवर.प्रतिभा, अभ्यास, विस्तृत व सांगोपांग विचार करण्याची क्षमता व बौद्धिक प्रामाणिकपणा.या मापदंडांवर कुरुंदकर नुसतेच खरे उतरत नाहीत तर, ते मापदंड किंबहुना त्यांच्यामुळे ओळखले जावेत इतकी या माणसाची बुद्धी मर्मग्राही होती व व्युत्पन्न अभ्यासूपण त्यांच्या ठायी होते.
गांधी नेहरूंनी देशाचं वाटोळं केलं , अस वाटणाऱ्या पिढीची मी प्रतिनिधी. माझ्या सुदैवाने गांधीजी,नेहरू,आंबेडकर,सावरकर शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, गोळवलकर गुरुजी, ओशो, इरावती कर्वे अशा अनेकांना समजून घेताना कुरुंदकरांनी माझं बोट सोडलं नाही. या व्यक्तींमधल्या उणिवा मान्य करूनही त्यांची वैचारिक महती नाकारण्याचा कृतघ्नपणा आपल्यात असू नये,हा प्रांजळपणा त्यांच्या शिवरात्र,आकलन ,जागर आणि अशा काही पुस्तकांनी दिला.
गांधीहत्या व मी या गोपाळ गोडसे लिखित व ओशो यांच्या संभोगातून समाधीकडे या दोन्ही वादग्रस्त पुस्तकांचा त्यांनी घेतलेला समाचार खासच! सामान्यतः ही पुस्तकं ‘तद्दन फालतू ‘म्हणून त्यांना टीका करण्याचा सार्थ अधिकार होता. पण त्यांनी दोन्ही लेखकांच्या भाषेचं, विषय प्रतिपदनाचं आणि वाचकांवर गारुड करण्याच्या क्षमतेचं कौतुकच केलं आहे. आणि नंतर ही माणसं कशी धूर्त व लबाड होती हेही सप्रमाण दाखवलं आहे.
अर्थात पूर्वसूरींची मतं प्रमाण मानणाऱ्या ,चिकित्सा नाकारणाऱ्या मोठ्या वर्गाला त्यांचं म्हणणं मान्य होणं शक्यच नव्हतं आणि आजही शक्य होणार नाही. त्यांच्यावर ‘अकादमिक गंध नसलेला टाळीबाज विद्वान ‘किंवा ब्राह्मण्यवादी विचारसरणीतून बहुजनांसाठी लिखाण करणारे’ म्हणून यथेच्छ टीकाही झाली.
त्यांचं धक्का तंत्र सहन होण्याची क्षमता प्रत्येकात नाही.परभणी मध्ये एका सभेत शिवाजी महाराजांवर अप्रतिम व्याख्यान देऊन त्यांनी शेवटी म्हटलं
“शिवाजी महाराज महान होते हे आता कोणत्याही इतिहासाकाराने नव्याने सांगण्याची गरज नाही.पण तुम्ही मराठ्यांनी(मराठी लोकांनी) ते फक्त आमचे म्हणण्याची गरज नाही कारण महाराज स्वतःला राजपूत(क्षत्रिय या अर्थी असावं) समजत होते” अर्थातच या समारोपाच्या वाक्याने सभेची धुंदी उतरली आणि त्यांच्या निषेधाचा ठराव तिथल्या तिथे मंजूर झाला हे सांगायला नकोच.

किंवा “आंबेडकर या देशाचे भाग्यविधाते आणि दलितांचे उद्धारकर्ते होते यात वाद असूच शकत नाही पण मी त्यांना घटनेचा शिल्पकार मानत नाही “या विधानाला पुरावा देताना ते डॉ आंबेडकर यांचेच संदर्भ देऊन सांगतात की त्यांना घटनेत शेतीचे राष्ट्रीयिकरण झालेले हवे होते; ते न झाल्याने आपण अल्पमतात येऊन आपला संकोच झाल्याचे बाबासाहेब सांगतात.घटना जाळायची वेळ आलीच तर आपण ते करणारा पहिला इसम असू असेही बाबासाहेब म्हणतात. आणि यामुळेच जेव्हा बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली तेव्हा प्रत्येक प्रश्न संविधानाच्या चौकटीत सोडवायला हवा अशी धारणा बाळगूनही ,या कृतीचं समर्थन करणारे कुरुंदकरच होते!
ज्या काळात कुरुंदकर होऊन गेले त्या काळात लोक बऱ्यापैकी सुसंस्कृत होते, शुचिता मानणारे होते .त्यामुळे कुरुंदकरांनी विरोधी किंवा वेगळी मतं मांडली तरी त्याचं प्रत्युत्तर बंदुकीच्या गोळीने न देण्याचं भान त्या समाजाला होतं. आजच्या समाजाची प्रवृत्ती बघता ते आज आपल्यात नाहीत हे समाजाचं किती मोठं दुर्दैव आहे!
त्यांची काही वाक्य तर माझ्या मनावर कोरली गेली आहेत.
“इतिहासाला सत्य ही एकच देवता असते.त्यामुळे व्यक्तींच्या मोठेपणाची फारशी मातब्बरी इतिहासाला नसते.”
त्यांच्या प्रज्ञावादाला फक्त माणूसकीचे बंधन मान्य होते.
“बुद्धी आणि बुद्धिवाद, विज्ञान व विज्ञाननिष्ठा या साऱ्यांना माणुसकीच्या मर्यादा आहेत.माणुसकीची उंची व वैभव वाढवणं हे बुद्धीचं व विज्ञानाचं काम आहे.ती मर्यादा घालवणं किंवा कमी करणं बुद्धी वा विज्ञानाला जमणारे आहे. माणुसकीच्या नावावर माणसांना मारायला शिकवणारी तत्वज्ञाने कमी नाहीत;पण ती टिकणारी नाहीत”
त्यांचं स्वतःबद्दलचं आकलन देखील इतकं परिपूर्ण होतं की तर्कशुद्ध किंवा सॉक्रेटिसच्या पद्धतीने विचार करण्याला मर्यादा आहेत याची त्यांना जाणीव होती. विचार आणि व्यवहारातील वर्तन यातली फारकत मान्य करताना ते म्हणतात
“सॉक्रेटिस तर्कशुद्ध विचार करत होता व तसे वागायला सांगत होता हे खरं असलं तरी व्यक्तीगत जीवनात तो नेहमीच तसं वागायचा असं नव्हे; नाहीतर तो अथेन्सच्या देवतेला नवस बोललाच नसता!” गंमत म्हणजे स्वतः नास्तिक असलेले कुरुंदकर पुढे म्हणतात “तरीही मी त्याच्यासोबत नरकात राहणच पसंत करेन”.
आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती व विषय यांचा धांडोळा घेता, कुरुंदकर आपल्याला एखाद्या शिल्पकाराची दृष्टी,हात व बुद्धीची धार प्रदान करतात. त्यांनी दिलेली ही आयुधं वापरून आपण त्यातले नकोसे भाग बाजूला काढून,गृहितक तासून, निंद्य ते वगळून एक विचारशिल्प घडवायला शिकतो.
विवेकाच्या या प्रवक्त्याची उणीव आज चार दशकांनंतर देखील आणि तीही जास्तच भासते ती यामुळेच.
” उपेक्षा ,आक्रस्ताळेपणा आणि उपहास यांनी मी मरणार नाही.माझं मरण मला निरुत्तर करणाऱ्या खंडनात आहे. पुरावा व तर्क यांनी खोडून काढता येत नाही ,ते मी हट्ट न करता निमूटपणे स्वीकारतो. मला निरुत्तर करणारे खंडन कुणी केले की मी माझी मतं सोडून त्याची स्वीकारीन . ते माझं खरं मरण.मला त्याची भीतीही आहे आणि आकर्षणही.तेव्हा मी नामशेषही होईन आणि कृतार्थही!”
नरहर कुरुंदकर
तुमची मतं खोडून काढण्याचं बौद्धिक धारिष्ट्य आणि तशी प्रतिभा असणारं कुणी अजून तरी दिसलं नाही कुरुंदकर!
आणि तसं कुणी असलंच तर
उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही .
निःसंकोचपणे एक कुंपण ओलांडून जाताना , कुंपण नष्ट होत नाही फक्त त्याच्या कक्षा रुंदावत असतात हे भान सदैव जागतं ठेवीन!
गौरी साळवेकर




