सोयाबीन बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने भाव निश्चित करावे
लातूर/प्रतिनिधी ः-
लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात सोयाबीनचे पेरणीक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या पेरणी क्षेत्राच्या अनुषंगाने खरीप हंगामापुर्वी बियाणांची उपलब्धता शासनाने करून देणे क्रमप्राप्त आहे. मात्र गतवर्षी बियाणांच्या टंचाईमुळे सोयाबीन बियाणांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार झालेला होता. ही बाब लक्षात घेऊन यावर्षी सदर काळाबाजार रोखण्यासाठी सोयाबीन बियाणांचा दर शासनाने निश्चित करावा अशी मागणी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने
खरीप हंगामपुर्व आढावा बैठक पार पडली. या बैठकीप्रसंगी माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी ही मागणी केलेली आहे. लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात गेल्या कांही वर्षापासून सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला आहे. लातूर जिल्ह्यात तर जवळपास 80 टक्के खरीपाची पेरणी सोयाबीनची होती, हे गेल्या कांही वर्षापासून सातत्याने निदर्शनास आले आहे. सोयाबीनचा वाढता पेरा लक्षात घेऊन खरीप हंगामापुर्वी शासनाकडून सोयाबीन बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त आहे. मात्र गतवर्षी सोयाबीनच्या बियाणाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा झाला. परिणामी बाजारात उपलब्ध असणार्या बियाणांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होऊन शेतकर्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला होता.
गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता यावर्षी खरीप हंगामापुर्वी शासनाकडून सोयाबीन बियाणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे सांगत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी या बियाणाचा दर शासनाने निश्चित करावा अशी मागणी केली. ज्या पद्धतीने महाबीज बियाणांचा दर शासन निश्चित करतो त्याच अनुषंगाने इतर खाजगी कंपन्यांच्या बियाणाचा दर ही शासनानेच निश्चित केल्यास शेतकर्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही. त्याचबरोबर शासनाने दर निश्चित केल्यास बियाणांचा काळाबाजारही रोखला जाणार आहे. ही बाब लक्षात घेऊनच सोयाबीन बियाणांचा दर शासनाने निश्चित करावा अशी आग्रही मागणी माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी केली आहे.
गेल्या कांही महिन्यांपासून शेतकर्यांना विद्युत रोहीत्रे वेळेवर मिळत नसल्याच्या असंख्या तक्रारी आलेल्या असल्याचे सांगत सध्या अनेक शेतकर्यांच्या शेतात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असले तरी ते विजे अभावी पिकाला देणे अशक्य झाले आहे. शेतकर्यांना विद्युत रोहीत्रे वेळेवर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी यापुर्वीही सातत्याने केली असल्याचे सांगत माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी या बैठकीत विद्युत रोहीत्रे शेतकर्यांना उपलब्ध व्हावे याकरीता कालबद्य कार्यक्रम हाती घेऊन महावितरण कंपनीने दिलेल्या मुदतीतच रोहीत्र उपलब्ध व्हावेत याकरीता विशेष सुचना देण्यात याव्यात अशी मागणी माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी यावेळी केली.




