भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांचे प्रतिपादन
लातूर दि.१६– – राज्य सरकारकडून तयार करण्यात येत असलेल्या ओबीसी समाजाच्या इम्पिरिकल डेटा मध्ये चुका आहेत हे उशीरा का होईना कबूल करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मंत्रीपदाचे वजन वापरून हा डेटा अचूक होण्यासाठी आता तरी प्रयत्न करावेत नाही तर तुमचे मंत्रीपद बिनकामाचे आहे हेच सिद्ध होईल असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
चुकीच्या पद्धतीने डेटा सादर झाला तर सर्वोच्च न्यायालय तो डेटा मान्य करणार नाही आणि तसे झाले तर विना आरक्षणाच्या निवडणुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे नमूद करून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणा बाबतीत गेल्या तीन वर्षांपासून हे सरकार निव्वळ टाईमपास करीत आहे.

राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी इम्पिरिकल डेटा चुकीच्या पद्धतीने तयार केला जातो आहे अशी कबुली नुकतीच दिली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे बरोबरच आहे, असेही भुजबळ, वडेट्टीवार म्हणत आहेत. असे असेल तर हे मंत्री सरकारमध्ये बसून करतात तरी काय असा प्रश्न आ. रमेशआप्पा कराड यांनी उपस्थित केला. भुजबळ, वडेट्टीवार यांच्यासारखे नेते सरकारमध्ये असूनही इम्पिरिकल डेटा मध्ये अशा चुका होत असतील तर या नेत्यांचा ओबीसी समाजाला काहीच उपयोग नाही असेही त्यांनी बोलून दाखविले.
मागासवर्गीय आयोग राज्य सरकारच्या अधिकारात काम करत आहे, मग एवढ्या मोठ्या चुका कशा होतात? याचा अर्थ सरकारच्या सांगण्यावरूनच या चुका होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ज्या दिवशी आदेश दिला, त्याच दिवशी इम्पिरिकल डेटा तयार करण्याचे काम सुरू व्हायला पाहिजे होते. ते तर झालेच नाही पण आता आडनावा वरून डेटा तयार केला जात आहे. ही पद्धत अत्यंत चुकीची आहे, असेही भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी पत्रकात नमूद केले आहे.




