‘एल निनो’ मुळे उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेवून खरीप हंगामात नियोजन करावे -पालकमंत्री

*‘एल-निनो’मुळे उद्भवणारी संभाव्य परिस्थिती लक्षात घेवून खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवावी-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले*

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

बियाणे, खते वितरणात सुसूत्रता ठेवावी

लातूर, दि. १४ : भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार २०२६ च्या मान्सूनवर ‘एल-निनो’चा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामात उद्भवणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक सज्जता ठेवावी. तसेच शेतकऱ्यांना पेरणी, बियाणे व खत वापर याविषयी योग्य मार्गदर्शन करावे, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या.

खरीप हंगाम पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी पालकमंत्री श्री. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विधान परिषद आमदार तथा मुख्य प्रतोद विक्रम काळे, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांच्यासह पशुसंवर्धन विभाग, अग्रणी बँक, आत्मा, वन आदी विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते यांचा पुरवठा सुरळीत होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्वच कृषि निविष्ठा केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात बियाणे, रासायनिक खते उपलब्ध करून द्यावीत. कोणत्याही तालुक्यात तुटवडा निर्माण होवू नये, यासाठी निविष्ठा वितरणात सुसूत्रता ठेवावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. भोसले यांनी दिल्या.

तसेच महाबीज बियाणे वितरणाबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.‘एल-निनो’मुळे मॉन्सूनमध्ये अनिश्चितता राहणार असल्याने शेतकऱ्यांना पेरणी योग्य कालावधीबाबत सातत्याने मार्गदर्शन करावे, कोणत्या कालावधीत कोणत्या पिकाची पेरणी करणे योग्य राहील, याबाबत जनजागृती करावी. तसेच संभाव्य परिस्थितीत दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी पुरेसे बियाणे उपलब्ध होईल, यादृष्टीने सूक्ष्म नियोजन करावे. शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत मार्गदर्शन करावे. यासाठी कार्यशाळा, प्रशिक्षणाचे आयोजन करण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. भोसले यांनी यावेळी दिल्या.

लातूर जिल्ह्यातील वृक्षांचे प्रमाण अतिशय कमी असल्याने जिल्ह्यात वृक्ष लागवडीवर भर देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना आहेत. त्यानुसार आगामी काळात जास्तीत जास्त वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनासाठी प्रयत्न करावेत. यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. यासोबतच जलसंधारणाच्या कामांना गती देण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. कदम यांनी खरीप हंगाम पूर्वतयारीबाबत माहिती दिली. आगामी खरीप हंगामात ४ लाख ८५ हजार ५६४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन असून त्यासाठी ३ लाख ६४ हजार २४८ क्विंटल बियाणे लागणार आहे. यापैकी २ लाख ३६ हजार ७६१ क्विंटल बियाणे शेतकऱ्यांकडे उपलब्ध असून महाबीज, राष्ट्रीय बीज निगम आणि खासगी कंपन्यांचे एकूण १ लाख २७ हजार ४८७ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. रासायनिक खतांच्या सरासरी वापरानुसार यंदा १ लाख ४५ हजार मेट्रिक टन खताची आवश्यकता भासेल असा अंदाज आहे. त्यानुसार महिनानिहाय पुरेसे खतसाठा उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

बोगस बियाणे, खत विक्री रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. ‘एल-निनो’ मुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत पीक नियोजनाबाबत कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार पर्यायी पीक पद्धती, योग्य वाण निवड, राखीव बियाणे साठा यासंदर्भात व्यापक जनजागृती करण्यात येत असल्याचे श्री. कदम यांनी सांगितले.आमदार श्री. काळे, खासदार डॉ. काळगे, आमदार श्री. कराड यांनीही यावेळी अनुषंगिक सूचना दिल्या.

*****

शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अध्वर्यू डॉ.गोपाळराव पाटील यांचे निधन

विशेष बातमी:

लातूरच्या ‘शैक्षणिक क्रांतीचा महामेरू’ हरपला;

डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन

लातूर: ( माध्यम वृत्तसेवा )-लातूरच्या शैक्षणिक वैभवाचे शिल्पकार, शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे संस्थापक, प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि माजी खासदार आदरणीय डॉ. गोपाळराव पाटील यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने केवळ लातूर जिल्ह्यावरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

‘लातूर पॅटर्न’चे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा अंत झाल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.’लातूर पॅटर्न’चे खंबीर नेतृत्वडॉ. गोपाळराव पाटील यांनी केवळ वैद्यकीय व्यवसाय केला नाही, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या डोळ्यात शिक्षणाचे स्वप्न फुलवले. त्यांनी स्थापन केलेल्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाने गुणवत्तेची नवी शिखरे सर केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच लातूरची शैक्षणिक ओळख देशभर पोहोचली. आज प्रशासकीय सेवा असो वा वैद्यकीय क्षेत्र, शाहू महाविद्यालयाचा विद्यार्थी तिथे आपली मोहोर उमटवताना दिसतो, याचे संपूर्ण श्रेय डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाला जाते.

राजकीय आणि सामाजिक योगदानडॉ. पाटील यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून काम करताना संसदेतही आपल्या अभ्यासू वृत्तीचा परिचय दिला. वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार आणि रेल्वे यांसारख्या महत्त्वपूर्ण समित्यांवर त्यांनी प्रभावीपणे काम केले. राजकीय क्षेत्रात असूनही त्यांचा स्वभाव अत्यंत मृदूभाषी, संयमी आणि विकासाभिमुख राहिला.

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वाहिली श्रद्धांजली

लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी डॉ. पाटील यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले की, “डॉ. गोपाळराव पाटील यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक महान शिक्षणतज्ज्ञ आणि मार्गदर्शक गमावला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे.”महत्त्वाचे मुद्दे:संस्थापक: शिवछत्रपती शिक्षण संस्था, लातूर.ओळख: लातूर पॅटर्नचे निर्माते आणि नामवंत बालरोगतज्ज्ञ.संसदीय कारकीर्द: माजी राज्यसभा खासदार (विविध संसदीय समित्यांचे सदस्य).स्वभाव: अभ्यासू वक्ता, मृदूभाषी आणि ध्येयवादी नेतृत्व.डॉ. गोपाळराव पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कधी होणार, याबाबतची माहिती लवकरच प्रशासनाकडून जाहीर करण्यात येईल. त्यांच्या निधनामुळे लातूरमधील शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांनी शोक व्यक्त केला आहे.

लातूर जिल्हा रुग्णालय इमारतीचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते भूमिपूजन

लातूर जिल्हा रुग्णालय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन_

*लातूर येथे ५०० खाटांचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारणार-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले*•

रुग्णालय इमारतीसाठी निधी कमी पडू देणार नाही

लातूर, दि. १८ ( माध्यम वृत्तसेवा): लातूरकरांचे गेल्या अनेक वर्षांचे स्वप्न मूर्त स्वरूपात येत असून काही तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित असलेला जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला आहे. आज १०० खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन होत असले तरी याठिकाणी ५०० खाटांचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारण्यात येईल. यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासह पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे दिली.

लातूर शहरातील नांदेड रोडवरील कृषि महाविद्यालय परिसरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन जिल्हा रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील होते. यावेळी विधानपरिषद सदस्य तथा मुख्य प्रतोद विक्रम काळे, लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई पाटील, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, महाराणा प्रतापनगरच्या सरपंच संगीता पतंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.

पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर लातूरला येण्यापूर्वीच जिल्हा रुग्णालयाचा विषय माझ्यापर्यंत आला होता. यासाठी येथील लोकप्रतिनिधी व माझं लातूर परिवाराने सातत्यपूर्ण आग्रही मागणी मांडली. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा मुद्दा मांडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक पावले उचलली. सर्वांच्या प्रयत्नातून रूग्णालयाच्या जागेचा विषय मार्गी लागला.

आता रुग्णालय इमारतीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत असून इमारतीचे काम दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होईल, याची खबरदारी संबंधितांनी घ्यावी. या कामामध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई होता कामा नये. इमारतीचे काम विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी सातत्याने आढावा घेण्यात येईल. या रुग्णालयाच्या माध्यमातून लातूरकरांना अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे पालकमंत्री श्री. भोसले यावेळी म्हणाले.जिल्हा रुग्णालयाचा विषय मार्गी लागल्यामुळे आपल्याला आनंद झाला असून या रुग्णालयाच्या रूपाने आपल्या कामाची आठवण कायमस्वरूपी राहील, असे पालकमंत्री श्री. भोसले म्हणाले.

तसेच लातूर ते कल्याण द्रुतगती महामार्गाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे लातूर ते कल्याण हे अंतर पाच तासात गाठता येईल, हा महामार्ग लातूर जिल्ह्यासाठी गेमचेंजर ठरेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. यासोबतच लातूर येथे जुन्या सर्किट हाऊसच्या जागेवर नवे सुसज्ज सर्किट हाऊसची उभारणी केली जाईल, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

*जिल्हा रुग्णालयामुळे चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील : सहकारमंत्री बाबसाहेब पाटील*

अनेक वर्षांपासूनची प्रलंबित असलेल्या जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन आज होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे रुग्णालयाच्या जागेसाठी निधी उपलब्ध झाला. महामार्गाच्या लगतची जागा जिल्हा रुग्णालयाला मिळाली असून याठिकाणी मिळणाऱ्या आरोग्य सुविधा दर्जेदार असाव्यात. ही इमारत आरोग्य मंदिर असून इमारतीचे बांधकाम दर्जेदार होईल, याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने कोविडच्या कठीण काळात समाजाची चांगली सेवा केली, त्याचप्रमाणे यापुढेही रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, असे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यावेळी म्हणाले.

बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असून त्यांना चांगल्या आरोग्य सेवा पुरविण्यासाठी जिल्हा रुग्णालयाची गरज होती. गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेला जिल्हा रुग्णालयाचा विषय मार्गी लागल्याने जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होईल, असे विधानपरिषदेचे आमदार तथा मुख्य प्रतोद विक्रम काळे म्हणाले.

लातूरच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहावा, असा आजचा दिवस आहे. लातूरकरांची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या जिल्हा रुग्णालयाची मागणी आता पूर्ण होत आहे. या रुग्णालयाचे काम दर्जेदार व्हावे. तसेच लातूरच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे आमदार संजय बनसोडे म्हणाले.

लातूर जिल्हा रुग्णालयाला कृषी महाविद्यालयाची जागा देण्यामध्ये तत्कालीन कृषिमंत्री स्वर्गीय पांडुरंग फुंडकर यांचे महत्वाचे योगदान आहे. कृषि महाविद्यालयाची जागा रुग्णालयाला अपवादात्मक बाब म्हणून मंजुरी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यासोबतच जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न सोडविण्यामध्ये पत्रकार, माझं लातूर परिवाराचा मोठा वाटा आहे. मोठ्या प्रतिक्षेनंतर उभा राहत असलेले जिल्हा रुग्णालय ५०० खाटांचे करावे. यासाठी आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आमदार अभिमन्यू पवार म्हणाले. यासोबतच लातूर शहरातील वाहतूक कोंडी, जुन्या सर्किट हाऊसच्या जागी नवीन सर्किट हाउस उभारणीचा मुद्दाही त्यांनी मांडला.जिल्हा रुग्णालयाचे काम कालबद्ध स्वरुपात पूर्ण होण्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाईल. तसेच या रुग्णालयाची क्षमता १०० वरून ५०० खाटांची करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी सांगितले. प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी केले. त्यानंतर प्रस्तावित रुग्णालय इमारतीच्या आराखड्याची माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली. प्रारंभी पालकमंत्री श्री. भोसले, सहकारमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते कुदळ मारून आणि कोनशीला अनावरण करून जिल्हा रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.

****

संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सज्ज रहावे -पालकमंत्री

रेन वॉटर हार्वेस्टिंग, विहीर पुनर्भरण मोहीम हाती घ्यावी-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले*

लातूर, दि. १७ : आगामी मॉन्सून कालावधीत सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे संभाव्य पाणी टंचाई व मॉन्सूनचे उशिरा आगमन होण्याची शक्यता लक्षात घेवून पाणी पुरवठ्याबाबत सूक्ष्म नियोजन करावे. उपलब्ध जलसाठ्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक असून त्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा. तसेच मॉन्सून पूर्वी जिल्ह्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग, विहीर पुनर्भरण मोहीम हाती घेण्याच्या सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे दिल्या.

लातूर जिल्ह्यातील विविध विकास कामे व संभाव्य पाणी टंचाईबाबत पालकमंत्री श्री. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार यांची या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती होती. तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषाताई पाटील तळेगावकर, महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त मानसी मीना, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, लातूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता तथा प्रशासक रुपाली ठोंबरे, कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सद्यस्थितीत पाणी टंचाईची तीव्रता कमी असली तरी जिल्ह्यातील काही गावांमध्ये टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, तिथे तातडीने उपाययोजना मंजूर करून नागरिकांना पाणी पुरवठा करावा. यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सध्या अस्तित्वात असलेल्या पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, गळती रोखणे यासारख्या कामांना प्राधान्य देवून पाण्याचा अपव्यय टाळावा, अशा सूचना पालकमंत्री श्री. भोसले यांनी दिल्या. लातूर शहराला स्वच्छ पाणी पुरवठा होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. यासाठी आवश्यक प्रयोगशाळा उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिल्या जाईल, असे त्यांनी सांगितले.

सद्यस्थितीत महावितरणने पाणी पुरवठा योजनांची वीज खंडित करण्याची कार्यवाही करू नये. तांड्यावरील पाणी टंचाई निवारणासाठीही विशेष उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे. यासाठी तातडीने सर्वेक्षण करून पुढील कार्यवाही हाती घ्यावी. बंधारे, तलावातील गाळ उपसा करण्याची कार्यवाही मोहीम स्वरुपात राबवावी, असे पालकमंत्री श्री. भोसले यावेळी म्हणाले.

*अपूर्ण पाणी पुरवठा योजनांना गती द्यावी : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील*

चाकूर, चापोली, हाडोळती, किनगाव यासारख्या मोठ्या पाणी पुरवठा योजनांची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत, या योजनांच्या कामांना गती द्यावी. तसेच इतरही पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती हाती घेणे गरजेचे आहे. तसेच विद्युत देयके थकीत असल्याने एकही पाणी पुरवठा योजना बंद आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना सौरउर्जेवर कार्यान्वित कराव्यात, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले. तसेच जिल्ह्यातील पांदन रस्त्यांच्या कामांनाही गती द्यावी, असे ते म्हणाले.लातूर जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ होण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याची गरज आहे. यासोबतच जिल्ह्यात काही ठिकाणी ब्रीज कम बंधारे उभारून जलसंधारणाला हातभार लावण्याची आवश्यकता आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, विहीर पुनर्भरण आदी कामे मोहीम स्वरुपात हाती घेवून शेतकरी, नागरिकांना यासाठी प्रोत्साहित करावे, असे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले. तसेच लातूर शहराला स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात असे ते म्हणाले.औसा तालुक्यातील भंगेवाडी, महादेववाडीसह इतर ठिकाणी पाणी टंचाई जाणवू लागल्याने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. महादेववाडी येथील पाणी टंचाई निवारणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच किलारी पाणी पुरवठा योजनेला अनेक ठिकाणी गळती असल्याने पाणी वाया जात आहे. आगामी मॉन्सून कालावधीत पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असल्याने जलसंधारण, पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जनजागृती करावी, असे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.

*****

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर

*ऊर्जा संवर्धनात उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर*

लातूर, दि. १० : ऊर्जा संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना ऊर्जा मंत्रालयाचा ‘ऊर्जा संवर्धन पुरस्कार २०२४-२५’ जाहीर झाला आहे. जिल्ह्यात वीज बचतीबाबत जनजागृती करणे, शासकीय कार्यालयांमध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढवणे आणि नाविन्यपूर्ण उपाययोजना राबवण्यात पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेऊन ऊर्जा मंत्रालयाने हा पुरस्कार जाहीर केला आहे.

या सन्मानामुळे लातूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने ऊर्जा बचतीसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून, शाश्वत ऊर्जा वापर, सौर ऊर्जेचा अवलंब आणि कार्यक्षम व्यवस्थापन यावर भर दिला. या कामगिरीसाठी कार्यालयाला ऊर्जा संवर्धन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हे प्रशासकीय पातळीवर हरित ऊर्जेचे अनुकरणीय उदाहरण ठरले आहे.

एनर्जी ऑडिट २०२२-२३ मध्ये दिलेल्या सर्व सूचनांची जिल्हाधिकारी कार्यालयात अंमलबजावणी करण्यात आली. कार्यक्षम उपकरणांचा वापर, १०० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प, पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जा साधनांचा समन्वयित, यथोचित आणि काळजीपूर्वक वापर यामुळे दरवर्षी ५५ हजार युनिट्स वीज बचत होत आहे. याशिवाय जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऊर्जा बचतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘ऊर्जादूत’ संकल्पना राबवण्यात आली.राज्यात उद्योग, अभियांत्रिकी, रसायने, औषधे व अन्न प्रक्रिया, मेटल व स्टील, कागद निर्मिती, तेल व रसायने, वस्त्रोद्योग, थर्मल पॉवर, बांधकाम व्यवसाय, स्थापत्य, शासकीय इमारती आणि सर्वसाधारण क्षेत्रांमध्ये ऊर्जा संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था व व्यक्तींना गेल्या १८ वर्षांपासून महाऊर्जा (ऊर्जा मंत्रालय) द्वारे ऊर्जा संवर्धन पुरस्कार देण्यात येत आहेत. त्यानुसार ‘ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन उत्कृष्टता-१८’ अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले असून, यामध्ये लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना ‘ऊर्जा संवर्धन पुरस्कार २०२४-२५’ जाहीर झाला आहे.राज्य पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल महाऊर्जा पुणे येथील महाव्यवस्थापक समीर घोडके, लातूर विभागीय महाव्यवस्थापक आनंद कुलकर्णी, ऊर्जा ऑडिटर केदार खमितकर आदींनी अभिनंदन व्यक्त केले आहे.

*गेल्या तीन वर्षात जिल्ह्याला मिळालेले महत्वाचे पुरस्कार*

लातूर जिल्ह्याला गेल्या सुमारे तीन वर्षांत मिळालेला हा आठवा राष्ट्रीय तथा राज्य स्तरावरील पुरस्कार ठरला आहे. यामध्ये राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार, लोकसत्ता आणि गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक्सकडून सलग दोन वर्षे प्रथम क्रमांकाचा जिल्हा निर्देशांक पुरस्कार, सशस्त्र सेना ध्वज निधी संकलनामध्ये उत्कृष्ट कामिगीरीबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार, दिव्यांग मुलांसाठी राबविलेल्या उपक्रमाबाबत स्कॉच अवार्ड, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार, उद्योग क्षेत्रातील कामगिरीबद्दल ‘निर्यात पुरस्कार २०२५’, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत सलग दोन वर्षे पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे.

*सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मितीमध्येही लातूर जिल्हा अग्रेसर*

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत लातूर जिल्ह्यात ६५ प्रकल्प कार्यान्वित झाले असून, त्याद्वारे ३२३ मेगावॅट क्षमतेची वीज निर्मिती होत आहे. तसेच, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत घराच्या छतावर सौर पॅनेल लावून वीज निर्मिती करून वीजबिल शून्य करण्याच्या उद्देशाने लातूर जिल्ह्यातील ११ हजार १२३ लाभार्थ्यांनी घराच्या छतावर सौर पॅनेल बसवले असून, त्याद्वारे ४३.२३ मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. यामुळे जिल्ह्यात अपारंपरिक ऊर्जेच्या (नवीकरणीय ऊर्जेच्या) वापराला मोठी चालना मिळाली आहे. वीज निर्मितीमध्ये अग्रेसर असलेल्या लातूर जिल्ह्याला आता ऊर्जा संवर्धनासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे.

*****

लातूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा !

_*सर्वोत्कृष्ट पहिल्या पाच जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचा समावेश*•

राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत कामगिरी•

नागरिकांच्या जलद सेवेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांचा वापर•
तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरणेकार्यालयीन कामकाज गतिमान

लातूर, दि. २६ 🙁 माध्यम वृत्तसेवा ):—राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया) मार्फत करण्यात आले. या अंतर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट पाच जिल्हाधिकारी कार्यालयांची नावे राज्य शासनामार्फत प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाचाही समावेश असून यानिमित्ताने लातूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे.

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या नेतृत्वात लातूर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या उपक्रमांची यानिमित्ताने राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे.राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील प्रशासनिक कार्यालयांसाठी १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम जाहीर केला होता. यामध्ये प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान, तंत्रज्ञानाधिष्ठित व नागरिकाभिमुख करणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने १ जून २०२५ पासून या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु केली होती. प्रामुख्याने संकेतस्थळ सुधारणा, सेवा हमी कायदा (आरटीएस), ई-ऑफिस प्रणाली, डेटा डॅशबोर्ड, व्हाटसअप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि जीआयएस व रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर आदी बाबींचा समावेश होता.

*संकेतस्थळ झाले अद्ययावत; २३ भाषेत माहिती उपलब्ध*

या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा, अंतर्गत कामकाज यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात आला. याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या सोयीसाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर २३ भाषांमध्ये माहिती उपलब्ध करून देण्यात आली. तसेच विविध महत्वाची संकेतस्थळे, समाज माध्यमे या संकेतस्थळाला जोडण्यात आली. नागरिकांना तक्रार व अभिप्राय देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. हे संकेतस्थळ मोबाईलवर सहज वापरता यावे, यादृष्टीने रचना करण्यात आली. नागरिकांसाठी सोयीस्कर ठरणारी रचना व माहिती यामुळे आतापर्यंत ५ लाख ३१ हजारांहून अधिक नागरिकांनी संकेतस्थळाला भेट दिली आहे.*ई-ऑफिसमुळे कामकाज गतिमान; सेवा जलद*सेवा हमी कायदा अंतर्गत ४ लाख ९२ हजार अर्जांपैकी ९७.९३ टक्के अर्जांचा विहित कालावधीत निपटारा करण्यात आल्याने नागरिकांना जलद सेवा मिळाली. अहवाल कालावधीत ई-ऑफिस प्रणालीद्वारे ७२ हजार ६७१ ई-फाईल्स तयार करण्यात आल्या आहेत. तसेच एकूण ७६ हजार ८७८ ई-फाईल निकाली काढण्यात आल्या आहेत, त्यामुळे फाईल निपटाऱ्याचा कालावधी लक्षणीयरीत्या होवून कामकाज गतिमान झाले. यासोबत डॅशबोर्ड आधारित निर्णयप्रणालीमुळे कार्यालयीन कामकाजाचा ऑनलाईन आढावा घेणे शक्य झाले आहे.

*कार्यालयीन कामकाजासाठी ‘एआय’ची मदत; वेळत बचत*

जिल्हाधिकारी कार्यालय व अधिनस्त उपविभागीय, तहसील कार्यालयांच्या कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांचा वापर वाढविण्यावर या उपक्रम काळात भर देण्यात आला. यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर अधिकारी, कर्मचारी यांच्या कार्यशाळा घेण्यात आला. कार्यालयीन कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांचा सुरु झाल्याने निर्णय प्रक्रियेतील वेळेची बचत होत असून कार्यालयीन कामकाजासाठी तयार करण्यात येणारे विविध मसुदे अचूक होण्यास मदत झाली आहे. तसेच, व्हाटसअप चॅटबॉटद्वारे ५० सेवा नागरिकांना व्हाटसअपवर उपलब्ध झाल्या असून नागरिकांना शासकीय योजना, प्रमाणपत्रे आणि आवश्यक सेवांबाबत माहिती, तसेच विविध शासकीय सेवांबाबत तक्रार नोंदवणे, तक्रारीची स्थिती तपासणे आणि अद्ययावत माहिती मिळविणे सोईचे झाले आहे. या सर्व बाबींच्या आधारे करण्यात आलेल्या मूल्यमापनात लातूर जिल्ह्याने एकूण १७९.२५ गुण प्राप्त करून राज्यातील पाच उत्कृष्ट जिल्ह्यांमध्ये स्थान मिळविले आहे.

*जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांच्या समन्वयातून उत्कृष्ट कामगिरी*

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, उपजिल्हाधिकारी गणेश पवार, उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुक्मे, महाआयटीचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक रिजवान मुल्ला, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत सर्वच शाखांतील अधिकारी, कर्मचारी यांनी १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामिगिरी केली.

*‘टीम वर्क’मुळे चांगली कामगिरी शक्य झाली : जिल्हाधिकारी*

प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान, तंत्रज्ञानाधिष्ठित व नागरिकाभिमुख करण्यासाठी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या महत्त्वाकांक्षी ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यातील पहिल्या पाच उत्कृष्ट जिल्ह्यांमध्ये स्थान मिळविले आहे, ही समाधानाची बाब आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व अधिनस्त कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या ‘टीम वर्क’मुळे या उपक्रम कालावधीत नागरिकांसाठी चांगले काम करता आले. या कामाची दखल घेवून लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाची निवड झाली, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे म्हणाल्या. नागरिकांसाठी गतिमान व पारदर्शक सेवा देण्यासाठी यापुढेही विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

*गेल्या तीन वर्षात जिल्ह्याला मिळालेला सातवा पुरस्कार*

लातूर जिल्ह्याला गेल्या सुमारे तीन वर्षांत मिळालेला हा सातवा राष्ट्रीय तथा राज्य स्तरावरील पुरस्कार ठरला आहे. यामध्ये जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मिळालेला लोकसत्ता आणि गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक्सकडून सलग दोन वर्षे प्रथम क्रमांकाचा जिल्हा निर्देशांक पुरस्कार, सशस्त्र सेना ध्वज निधी संकलनामध्ये उत्कृष्ट कामिगीरीबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार, दिव्यांग मुलांसाठी राबविलेल्या उपक्रमाबाबत स्कॉच अवार्ड, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार, उद्योग क्षेत्रातील कामगिरीबद्दल ‘निर्यात पुरस्कार २०२५’, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत सलग दोन वर्षे पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे.

*१५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमात जिल्ह्यातील चारही नगरपरिषदांची उत्कृष्ट कामगिरी*

पारदर्शक, गतिमान सुप्रशासनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांच्या शासकीय सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी १५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत नगरपालिका गटात निवड झालेल्या राज्यातील १७ पैकी ९ नगरपालिका या छत्रपती संभाजीनगर विभागातील आहेत. यामध्ये लातूर जिल्ह्यातील सर्व चारही नगरपालिकांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचे मार्गदर्शन व जिल्हा नगरपालिका प्रशासन सहआयुक्त अजितकुमार डोके यांच्या नियोजनातून उदगीरक, अहमदपूर, निलंगा व औसा या ४ नगरपालिका यांना ही सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

****

घटक पक्षांनी कार्यकर्त्यांवर केलेला अन्याय खपवून घेणार नाही-आ. निलंगेकर

महायुतीतील घटकपक्षांना सत्तेचा वाटा देऊ मात्र पक्ष संघटनेसाठी कोणतीही तडजोड नाही

माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचे प्रतिपादन

लातूर/प्रतिनिधी :जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनवत विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून देण्यात कार्यकर्त्यांचे मोठे योगदान असून यासाठी त्यांनी अपार मेहनतही घेतली आहे. कार्यकर्त्यांच्या संघटन शक्तीमुळेच भाजपा नंबर वन आहे. आता त्याच कार्यकर्त्यांच्या म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका होवू घातलेल्या आहेत. या निवडणूकांना महायुती म्हणून जरी सामोेरे जात असलो तरी महायुतीतील घटक पक्षांनी कार्यकर्त्यांवर केलेला अन्याय खपवून घेणार नाही, असे सांगत महायुतीतील घटक पक्षांना सत्तेचा वाटा देऊ मात्र, कार्यकर्त्यांनी उभा केलेल्या पक्ष संघटनमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही , असे सांगून आम्ही कार्यकर्त्यांच्या निवडणूकीत तन, मन, धनाने खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याची ग्वाही माजी मंत्री तथा जिल्हा निवडणूक प्रभारी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली .

पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत जिल्हा भाजपा कार्यालयात झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी मंत्री आ. निलंगेकर बोलत होते. या वेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष बस्वराज पाटील मुरुमकर, आ. रमेश कराड, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी आ. बब्रुवान खंदाडे, लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, शहर निवडणूक प्रमुख डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, गणेश हाके, माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यात महायुती म्हणून भाजपा-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे तिघेजण सत्तेत सहभागी असल्याचे सांगत माजी मंत्री तथा जिल्हा निवडणूक प्रभारी आ. संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की, महायुतीचा धर्म निभावताना तिन्ही घटक पक्षातील नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी योग्य समन्वयाची भूमिका बजावणे अत्यंत गरजेचे आहे मात्र, महायुतीतील घटक पक्ष आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय करत असतील तर तो सहन होणारा नाही. कार्यकर्त्यांमुळे भाजपा आज जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनलेला आहे. कार्यकर्त्यांचे समर्पण, त्याग आणि त्यांची अपार मेहनत यामुळेच केंद्रात व राज्यात भाजपा सत्तेत आलेली आहे. कार्यकर्त्याला भाजपात मोठे महत्व असून कार्यकर्त्यांमुळेच आम्हा सर्वांना लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली असल्याचे माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी सांगितले.

आता कार्यकर्त्यांच्या म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका होऊ घातलेल्या आहेत. ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन वाढवत पक्षाला सत्तेत बसवले त्या कार्यकर्त्यांना आता सत्तेत बसविण्याची वेळ आली असल्याचे माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी सांगितले. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांनी या निवडणूकांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांवर केलेला अन्याय खपवून घेणार नाही, असे सांगत महायुतीतील घटक पक्षांना सत्तेत सहभाग देवू मात्र संघटनेत नाही, असेही स्पष्ट केले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणूकीत लोकाभिमूख आणि जनतेची कामे करणाºया कार्यकर्त्यांनाच निवडणूक लढविण्याची संधी दिली आहे. या कार्यकर्त्यांना निवडून आणणे आमच्या सर्वांची जबाबदारी असून यासाठी त्यांच्या पाठिशी आम्ही तन, मन, धन लावून खंबीरपणे उभे राहत, अहोरात्र परिश्रम घेवू, अशी ग्वाही देवून जिल्ह्यातील चार नगरपालिका आणि एका नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकावू असा विश्वास दिला.

पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे मनपा प्रशासनाला निर्देश

लिंगायत स्मशानभूमी व स्टॅच्यू ऑफ नॉलेजचे काम तात्काळ मार्गी लावून लातूर शहरातील विकासकामांना गती द्या
पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे मनपा प्रशासनाला निर्देश

लातूर प्रतिनिधी – लातूर शहरातील कन्हेरी परिसरात असलेल्या लिंगायत स्मशानभूमीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला असून हा प्रश्न तात्काळ मार्गी लावून लातूर शहरात उभारण्यात येत असलेल्या स्टॅच्यू ऑफ नॉलेजच्या उभारणी कामास लवकरात लवकर सुरुवात करावी असे निर्देश देऊन शहरातील इतर विकासकामांसाठी आवश्यक असलेल्या सर्व कार्यवाही पुर्ण करून या कामांना गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत.

शहर जिल्हा भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी लातूर शहरातील लिंगायत स्मशानभूमी, स्टॅच्यू ऑफ नॉलेज, अंतर्गत भुयारी गटार योजना स्व.विलासराव देशमुख मार्ग, शहरातील बंद पथदिवे व त्यांची दुरुस्ती, अमृत योजना टप्पा २, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, नाट्यगृह, शादिखाना यासह जिल्हा रुग्णालयांच्या कामांबाबत पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मनपा प्रशासनाची बैठक घेऊन आढावा घेण्यात यावा अशी मागणी केली होती. यानुसार पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, अर्चना पाटील चाकूरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, मनपा आयुक्त मानसी मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, मनपा उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे, माजी शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, गुरुनाथ मगे, शैलेश गोजमगुंडे, दिपक मठपती, रागिणी यादव आदींसह प्रशासकीय अधिकारी, माजी नगरसेवक, पक्ष पदाधिकारी यांची उपस्थिती होती.


लातूर शहरातील कन्हेरी परिसरात असलेल्या लिंगायत स्मशानभूमीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला असून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा अशी मागणी सातत्याने समाजबांधवांकडून होत आहे. समाजबांधवांची भावना व स्मशानभूमीची गरज ओळखून हा प्रश्न सोडवण्यासाठी मनपा प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला सोबत घेऊन हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना कराव्या असे निर्देश पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह मनपा आयुक्तांना दिले आहेत. शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात उभारण्यात येणाऱ्या स्टॅच्यू ऑफ नॉलेजच्या उभारणी कामास तात्काळ प्रशासकीय मान्यता द्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र अद्यापपर्यंत यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही असे भाजप शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी निदर्शनास आणून दिले. स्टॅच्यू ऑफ नॉलेजच्या उभारणी कामास प्रशासकीय मान्यता अद्यापपर्यंत का दिली नाही याचा जाब विचारून मनपा प्रशासनाने या कामात कोणतीही दिरंघाई न करता तत्परतेने काम करावे अशी सूचना पालकमंत्री भोसले यांनी दिली.


लातूर शहरात अमृत योजनेचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेला असून याबाबत आवश्यक असणारे सर्व प्रस्ताव आणि यासंदर्भात असणारी टिप्पणी तात्काळ नगरविकास विभागात दाखल करावे अशी सूचना देऊन यासाठी आवश्यक असणारा पाठपुरावा करण्यात येईल असे पालकमंत्री भोसले यांनी यावेळी सांगितले. शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुर्णाकृती पुतळ्यानजीक असलेल्या मोकळ्या जागेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह उभारण्यात यावे अशी मागणी होत असून याठिकाणी वाहनतळ होत असले तरी या वाहनतळाच्या वरच्या मजल्यावर सभागृह आणि वाचनालय उभारण्यासाठी आवश्यक असणारा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी तयार करून तो मंजुरीसाठी पाठवण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. त्याचबरोबर शहरातील बंद पथदिवे व दुरुस्तीसाठी आवश्यक असणाऱ्या निधीचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने त्वरित तयार करून तो मंजूरीसाठी मंत्रालय स्तरावर पाठवून द्यावा आणि हा मंजूर करण्यासाठी आवश्यक असणारा पाठपुरावाही करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री भोसले यांनी दिली. यासोबतच शहरातील स्व.विलासराव देशमुख मार्ग, नाट्यगृह, शादीखाना ही विकासकामे गतीने पुर्ण करण्यासाठी तातडीने पावले उचलून यासाठी कोणतीही अडचण असल्यास सदर अडचण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात येईल असा विश्वास देऊन लातूर जिल्हा रुग्णालयाचा भुमिपूजन सोहळा लवकरात लवकर आयोजित करण्यासाठी प्रशासकीय व शासकीय स्तरावर सूचना दिलेल्या असून हा सोहळा लवकरच पार पडेल अशी ग्वाही पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजप शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांना दिली.


या बैठकीच्या वेळी अजित पाटील कव्हेकर यांनी सदर विकासकामांबाबत आढावा बैठक आयोजित केल्याबद्दल पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आभार मानून प्रशासनाने शहरातील विकासकामे अधिक गतीने आणि दर्जेदाररित्या पुर्ण होण्यासाठी विशेष लक्ष देऊन पालकमंत्री यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी होईल असा विश्वास व्यक्त केला. लातूर शहर व परिसरात गत महिन्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकासह घरांचेही नुकसान झालेले असून या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पुर्ण होऊन नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी यासाठी प्रशासनाला सूचना देऊन नुकसान भरपाई पासून कोणीही वंचित राहू नये याकरिता प्रशासन सतर्क राहील, अशी अपेक्षा अजित पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केली. यावेळी माजी नगरसेवक व पक्ष पदाधिकारी यांनी मांडलेल्या समस्या आणि सुचनांबाबत जिल्हा प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.

पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

*मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

*लातूर, दि. 27 : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूर परिस्थितीत नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. काल रात्री पासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.

नागरिकांनी कोणतेही धोकादायक प्रवास किंवा शेतीची कामे टाळावीत. आपल्या कुटुंबाची आणि गाव-शहराया सुरक्षेसाठी करण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. जिल्हा प्रशासन सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या माध्यमातून तातडीची मदत पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जळकोट तालुक्यातील बेलसांगवी येथे पाण्याचा वेढा पडलेल्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अहमदपूर येथील चिलखा बॅरेजवर अडकलेल्या मजुरांची स्थानिक बचाव पथक आणि पोलिसांनी यशस्वीपणे सुटका केली आहे, असे पालकमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी घाबरून न जावू नये. पाऊस कमी झाल्यानंतर शेती, जमीन, घर आणि जनावरांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने केले जातील. राज्य शासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिली जाईल, अशी पालकमंत्र्यांनी दिली. एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

*****

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

*नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले*

• जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

स्मशानभूमी शेड उभारणीसाठी प्रत्येकी दहा लाख देणार•
शाळांच्या दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार

लातूर, दि. १७ : जिल्ह्यात यंदा सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जस्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे गतीने सुरु आहेत. पंचनामे पूर्ण होताच याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येईल. नुकसानग्रस्त सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यसाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री श्री. भोसले यावेळी म्हणाले. लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. त्यानुसार सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांनुसार पर्यायी मार्गाच्या आवश्यक कामाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

महावितरणची जिल्ह्यात सुरु असलेली कामे अपेक्षित गतीने होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संथगतीने कामे करणाऱ्या ठेकादारांवर कार्यवाही करण्याचा प्रस्ताव महावितरणच्या मुख्य कार्यालयास सादर करावा. तसेच जिल्ह्यात रोहित्र दुरुस्ती अथवा विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. महावितरणचे अधिकारी, कर्मचारी यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेवून त्याचा तातडीने निपटारा करावा, अशा सूचना पालकमंत्री श्री. भोसले यांनी दिल्या. नव्याने मंजूर झालेल्या विद्युत उपकेंद्रांची कामे तातडीने सुरु करावीत. ज्या उपकेंद्रांना जागा उपलब्ध नाही, अशा उपकेंद्रांना जागा उपलब्ध करून देण्याबाबत महावितरणने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्ह्यात गाव तिथे स्मशानभूमी या संकल्पनेतून प्रत्येक गावात स्मशानभूमी उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध असलेल्या गावांमध्ये स्मशानभूमी शेड उभारणी, परिसरात बाकडे, पाणी आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. या सुविधा निर्मितीसाठी स्मशानभूमी उभारणीसाठी प्रत्येक गावाला सुमारे ८ ऐवजी १० लाख रुपये देण्यात येतील. तसेच ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी शासकीय जमीन उपलब्ध नाही, अशा गावांमध्ये भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपयांची तरतूद करण्याला पालकमंत्री श्री. भोसले यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंजुरी देण्यात आली.जिल्हा परिषदेच्या जुन्या शाळांच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेतून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल. यासोबतच राज्य शासनाकडूनही या कामासाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे पालकमंत्री श्री. भोसले म्हणाले. तसेच अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती, लघुपाटबंधाऱ्यांची डागडुजी, रोगराईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य संस्थांना पुरेसा औषधसाठा निर्माण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यावेळी जलजीवन मिशन योजनेंतर्गत कामांचे आराखडे प्रलंबित असल्याचे सांगून या कामांना गती देण्याची सूचना केली. तसेच जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करावे, असे सांगितले.राज्यातील सर्वात कमी वनक्षेत्र असलेल्या लातूर जिल्ह्यात वन विभागाने प्रभावी वृक्ष लागवड मोहीम राबवून वृक्ष संवर्धनासाठी विशेष खबरदारी घ्यावी. यासोबतच कृषी विभागाने जिल्ह्यात जलसंधारणाची कामे करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केल्या.

जिल्ह्यात मंजूर झालेल्या विद्युत उपकेंद्रांना जागा उपलब्ध करून दिली जावी. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जावी, असे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले.जिल्ह्यात नवीन विद्युत वाहिनीची कामे सुरु असून यासाठी विद्युत खांब उभारणीची कामे नित्कृष्ट दर्जाची होत आहेत. तसेच हे खांब रस्त्यापासून जवळच उभारण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले. तसेच अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीकडेही त्यांनी लक्ष वेधले.उदगीर, जळकोट तालुक्यात मंजूर झालेल्या विद्युत उपकेंद्रांचे काम अद्याप सुरु झालेले नाही. तसेच ज्या उपकेंद्रांची कामे सुरु झाली आहेत, ती अतिशय संथगतीने सुरु आहेत. या सर्व कामांना गती द्यावी, असे आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे नदी, नाल्याला पूर आल्यामुळे काठावरील जमिनी खरडून गेल्या आहेत. या शेतकऱ्यांच्या जमिनी पुन्हा पूर्ववत करून देणे आवश्यक असल्याचे आमदार अभिमन्यू पवार म्हणाले. तसेच जिल्ह्यातील नगरपरिषदांमधील स्वच्छता विषयक कामांना जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा, असे त्यांनी सांगितले.जिल्हा परिषदेच्या अनेक जुन्या शाळांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून भरीव निधी द्यावा. तसेच वन विभागाच्या माध्यमातून होणारी वृक्ष लागवड करताना योग्य नियोजन करावे. या माध्यमातून स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड केली जावी, असे आमदार रमेश कराड म्हणाले.जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ च्या खर्चाच्या अहवालाचे सादरीकरण केले.

******

You cannot copy content of this page