आरोग्यासाठी… देशासाठी ७४ सायकलस्वार ७४ किमी सायकलिंग करणार
लातूर;दि १२(प्रतिनिधी )देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘ आरोग्यासाठी… देशासाठी सायकलिंग ‘ हा संदेश देण्यासाठी येत्या १४ ऑगस्ट रोजी लातुरातील ७४ सायकलस्वार ७४ किलोमीटर सायकलिंग करण्याचा अनोखा उपक्रम करणार आहेत.

धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात आपले आरोग्य फिट राहावे यासाठी लातुरातील काही तरुणांनी काही वर्षांपूर्वी एकत्र येऊन लातूर सायकलिस्ट क्लबची स्थापना केली आहे. या क्लबच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात .दररोज सातत्याने सायकलिंगचा सराव केला जातो . स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या अभिवादन करण्यासाठी करण्यासाठी शनिवार दि.१४ ऑगस्ट २०२१ रोजी लातुरात ‘७४ सायकलस्वार ७४ किलोमीटर … ‘ हा अनोखा उपक्रम राबवणार आहेत अशी माहिती आयोजक ,उद्योजक योगेश कर्वा यांनी दिली .
येत्या १४ ऑगस्ट रोजी सकाळी ०५.४५ वाजता माऊंट लिटेरा झी स्कूल येथून हे ७४ सायकलिस्ट कूच करणार आहेत . रेणापूर नाका , रेणापूर , बर्दापूर आदी मार्गावर ७४ किलोमीटरचे अंतर कापून हे सायकलिस्ट परत माऊंट लिटेरा स्कूल जवळ येतील. जवळपास चार तास हे सायकलस्वार सायकलिंग करणार आहेत .

जिल्हाधिकारी बी पृथ्वीराज हे हिरवी झेंडी दाखवताच ७४ किलोमीटरकडे कूच करण्यासाठी ७४ सायकलस्वार सायकलिंग करतील .यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अभिनव गोयल , पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, महापालिकेचे आयुक्त अमन मित्तल , उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक , जीवन देसाई , सदाशिव पडधूने, तहसीलदार स्वप्निल पवार, लातूर सायकललिस्ट क्लबचे सतीश खोबर, गंगाधर बिरादार, श्रवण उगले ,रवींद्र भूमकर, श्रीरंग मद्रेवार, अभिजित देशपांडे , आयोजक योगेश कर्वा आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.












