*अन्नत्याग आंदोलन संदर्भात*…

0
195

अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचवू-आ. संभाजी पाटील निलंगेकर

आंदोलन राज्याला दिशादर्शक ठरण्यासाठी यशस्वी करण्याचा निर्धार

लातूर/प्रतिनिधी ः- अतिवृष्टी आणि नदीपात्रातून सोडलेले पाणी यामुळे अस्मानी व सुल्तानी या दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांचा आक्रोश अद्यापही सरकारपर्यंत पोहचलेला नाही. शेतकर्‍यांना मदत मिळावी याकरीता सरकारला जाब विचारण्याची जबाबदारी विरोधीपक्ष म्हणून आपली आहे. मात्र शेतकर्‍यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचत नसल्याने आता लातूरात दि. 11, 12 व 13 ऑक्टोंबर रोजी 72 शेतकर्‍यांना सोबत घेऊन भाजपाच्या वतीने 72 तासाचे अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह सर्व सामाजिक संघटनांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवत आपले योगदान द्यावे असे आवाहन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. आ. निलंगेकरांच्या या आवाहनास उत्स्फुर्त प्रतिसाद देत हे आंदोलन राज्याला दिशादर्शक ठरावे अशा पद्धतीने यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.

लातूर येथील कस्तुराई मंगल कार्यालयात माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड व आ. अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत लातूर शहर, लातूर ग्रामीण, शहर व जिल्हा युवा मोर्चा व लोकप्रतिनिधी यांच्यासह सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीत आ. निलंगेकर बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, जिल्हा संघटन सरचिटणीस तथा जि.प. सदस्य संजय दोरवे, शहर संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार, सरचिटणीस किरण उटगे, शिरीष कुलकर्णी, अ‍ॅड. दिग्वीजय काथवटे, प्रविण सावंत, मनपा गटनेते अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. दिपक मठपती, युवा मोर्चा ग्रामीणचे अध्यक्ष अ‍ॅड. ज्ञानेश्वर चेवले, युवा मोर्चा शहराध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, जि.प. गटनेते महेश पाटील, प्रदेश कार्यकारीण सदस्य सौ. जयश्री पाटील, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा स्वाती जाधव, बापुसाहेब राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अतिवृष्टी आणि पुरस्थितीने शेतकर्‍यांचे कधीच न भरून निघणारे नुकसान झाले आहे असे सांगत आ. निलंगेकरांनी सरकारच्या निष्क्रीय व दुर्लक्षीत धोरणामुळे शेतकर्‍यांची अवस्था ना जगता येत नाही ना मरता येत नाही अशी झालेली आहे. मात्र यापरिस्थितीत संपुर्ण जगाचा पोशिंदा असणार्‍या शेतकर्‍यांना विरोधीपक्ष म्हणून आपण वार्‍यावर सोडणार नाही. शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या हक्काची मदत मिळवून देण्याकरीता कुंभकर्णी झोपेत असणार्‍या सरकारला जागे करून शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्यासाठी आपण भाग पाडणार असून त्याकरीता बांधील असल्याची ग्वाही आ. निलंगेकरांनी दिली. त्यामुळेच ज्या पद्धतीने शेतकर्‍यांना 72 तासाचा अवधी देण्यात आलेला होता त्यानुसारच आम्ही सरकारला 72 तासाचा अल्टीमेंटम दिला होता तो आता संपणार आहे. अजूनतरी सरकारने मदतीची कोणतीच घोषणा किंवा त्या दृष्टीने हालचाल सुरु केलेली नाही. या कारणाने सोमवारपासून लातूर येथील शिवाजी चौकात 72 शेतकर्‍यांना सोबत घेऊन 72 तासाचे अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होऊन शेतकर्‍यांच्या प्रति आपली संवेदना दाखवत प्रत्येकांनी या आंदोलनात सर्व ताकदीनिशी सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन करून आ. निलंगेकरांनी या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचवू असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांनी आघाडी सरकारमधील मंत्र्यासह मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना व सर्वसामान्यांना वार्‍यावर सोडलेले आहे. मात्र ज्या जनतेच्या आशिर्वादाने आपण ज्या पदावर बसलो आहोत त्या पदाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना न्याय देण्याची आणि त्यांना मदत मिळवून देण्याची वेळ आलेली असून प्रत्येकांनी आपल्यासह आपल्या परिसरातील शेतकर्‍यांप्रति संवेदना असणार्‍या नागरीकांसह नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सोबत घेऊन या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन केले. दि. 11 ऑक्टोबर रोजी लातूर शहर व लातूर ग्रामीण, दि. 12 रोजी अहमदपूर व उदगीर तर दि. 13 रोजी औसा व निलंगा या मतदारसंघातील प्रत्येक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपले योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

आ. अभिमन्यू पवार यांनी राज्यात प्रथमच अशा प्रकारचे आंदोलन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात होत असून या आंदोलनाकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळेच हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी केवळ ग्रामीण भागातीलच नव्हे तर शहरातील नागरीकांनी आपआपली जबाबदारी ओळखत आंदोलन यशस्वी करण्यासाठी पाठिंबा देऊन यात सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. ग्रामीण भागावरच शहरातील बाजारपेठ अवलंबून असल्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सदृढ राहण्यासाठी शेतकरी सुखी असावा लागतो ही बाब लक्षात घेऊन शहर व जिल्ह्यातील प्रत्येक नागरीकांसह पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

या बैठकींना लातूर शहरासह जिल्ह्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासह सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी लातूरात होणारे अन्नत्याग आंदोेलन राज्याला दिशादर्शक ठरावे याकरीता यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

त्यापक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार नाही

महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या वतीने दि. 11 ऑक्टोंबर रोजी उत्तर प्रदेशमध्ये शेतकर्‍यांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र या तिन्ही पक्षांना बंद पुकारण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे सांगत आपल्या राज्यातील शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यास अपयशी ठरलेल्या सरकारने उत्तर प्रदेशमधील शेतकर्‍यांच्या अन्यायाबाबत बंद पुकारने ही चुकीची बाब असून हा बंद हाणून पाडावा असे आवाहन आ. निलंगेकरांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here