28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeसाहित्य*अशोक केसरकर यांच्या 'माझा युरोप प्रवास 'पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपन्न*

*अशोक केसरकर यांच्या ‘माझा युरोप प्रवास ‘पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपन्न*

इचलकरंजी/प्रतिनिधी –अशोक केसरकर यांचे ‘माझा युरोप प्रवास’ हे पुस्तक युरोपातील पर्यटनाचा निर्भेळ आनंद देण्याबरोबरच लेखकाची प्रवासाची आवड , संवेदनशीलता, सुक्ष्म अवलोकन, माणसाची भूक आणि संवाद कौशल्य अधोरेखित करणारे आहे, असे उद्गार ज्येष्ठ लेखिका नीलम माणगांवे यांनी काढले.
येथील अशोक केसरकर यांनी लिहिलेल्या ‘माझा युरोप प्रवास’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात त्या बोलत होत्या. पुस्तकातील निवडक उतारे आणि काव्यपंक्तींचा धावता आढावा घेत त्यांनी लेखकाच्या शब्द प्रभुत्वाचा उल्लेख तर केलाच पण जागोजागी केलेल्या विनोदाच्या पेरणीने रुक्ष प्रवासवर्णनाऐवजी शाब्दिक कोट्यांची खुसखुशीत मेजवानी मिळाल्याचे आवर्जुन सांगितले .शेवटी लेखकावर पुलंच्या शैलीचा असलेला प्रभाव सांगून पुस्तकाचा भावनिक शेवट करण्याच्या कौशल्याचाही त्यांनी उल्लेख केला. प्रस्तुत पुस्तक परदेश प्रवास करणार्‍यास निश्‍चित मार्गदर्शक ठरेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. वाचनीयता हा पुस्तकाचा खरा हेतु जागोजागी दिसून येतो. पुस्तकाची भाषा रसाळ असून वाचकांना खिळवून ठेवणारे आहे, असेही त्या म्हणाल्या.
रोटरी मानवसेवा केंद्रात झालेल्या या समारंभाची सुरुवात शाहीर संजय जाधव व सुधाकर ठाणेकर यांच्या गीतांनी झाली. शोभा स्वामींची प्रार्थना, सुनिल स्वामी यांचे लेखकाचा परिचय करुन देणारे स्वागत आणि दादासो चौगुले यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाचा बहारदार प्रारंभ झाला. पुस्तक प्रकाशनानंतर काही ग्रंथालयांना पुस्तक भेट देण्यात आले.
कार्यक्रमाच्या पाहुण्या आपटे वाचन मंदिरच्या अध्यक्षा सुषमा दातार यांनी केसरकर यांचा लेखन प्रवास सांगून त्यांच्या बहुपेडी व्यक्तीमत्वाची प्रशंसा केली. अध्यक्षीय भाषणात डीकेटीईच्या मानद सचिव डॉ. सौ. सपना आवाडे यांनी केसरकर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा आणि विविध छंदासह लेखनातील शब्दलालित्याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन यापुढेही ग्रंथलेखनात सातत्य ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली.
सुरेश कोळी यांच्या आभार प्रदर्शनाने समारंभाची सांगता झाली. यावेळी आपटे वाचन मंदिर, मनोरंजन मंडळ, समाजवादी प्रबोधिनी, प्रोबस क्लब अशा विविध संस्थांमधील पुस्तकप्रेमी नागरिक आणि विविध शाळांतील शिक्षकवर्ग उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंग्लिश लव्हींग ग्रुपचे सचिन पाटोळे, मुरलीधर उरुणकर, गोपीनाथ कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]