आ. अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे कासारसिरसी पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मंजुरी..…
निलंगा, -( प्रशांत साळुंके )- आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे १० कोटी २९ लाखांच्या कासारसिरसी (ता. निलंगा) येथील जलजीवन मिशन अंतर्गत बडूर लघु तलावातून पाणीपुरवठा योजनेस अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ३ डिसेंबर रोजी तांत्रिक मान्यता दिल्यानंतर दि. १५ डिसेंबर रोजी झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
१ मार्च, २०२१ रोजी आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व राज्यमंत्री संजय बनसोडे यांची भेट घेऊन कासार सिरसी (ता. निलंगा) या गावाला जलजीवन मिशन अंतर्गत बडूर लघु तलावातून पाणीपुरवठा करणारी योजना मंजूर करावी अशी मागणी केली होती. ६ ऑक्टोबर रोजी पुन्हा आ. पवार यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन कासार सिरसी पाणीपुरवठा योजनेसाठी पाठपुरावा केला होता, या बैठकीतच त्यांनी १५ ऑक्टोबरच्या आत डीपीआर सादर करण्याचे निर्देश जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता यांना दिले होते. त्यानंतरही या योजनेसाठी आ. अभिमन्यू पवार यांचा पाठपुरावा सुरूच होता.त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून जलजीवन मिशन अंतर्गत कासार सिरसी पाणीपुरवठा योजनेला ३ डिसेंबर रोजी तांत्रिक मान्यता दिल्यानंतर दि. १५ डिसेंबर रोजी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत सदरील योजनेला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. पुढील ८ दिवसांत या संबंधी अध्यादेश निघणं अपेक्षित आहे.१० कोटी २९ लाख रुपयांची हि पाणीपुरवठा योजना असून हि योजना पुर्ण झाल्यास कासारसिरसी येथील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.न

दिलेल्या वचनाची पूर्तता – आ. अभिमन्यू पवार
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबरावजी पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, राज्य सरकार, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व याकामी मार्गदर्शन करणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आ. अभिमन्यू पवार यांनी मनःपूर्वक आभार मानले असून कासार सिरसी मंडळातील जनतेला दिलेल्या एका वचनाची यानिमित्ताने पूर्तता झाली असून इतर विकासकामांसाठी प्रामाणिक पाठपुरावा सुरु राहील.असे आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले.











