*आ.निलंगेकर यांची ग्वाही*

0
262

दिव्यांग कल्याणाचा निधी खर्च व्हावा यासाठी आक्रमक भूमिका मांडणार
आ. संभाजी पाटील निलंगेकरांची दिव्यांग बांधवांना ग्वाही..

निलंगा,-( प्रशांत साळुंके )- दिव्यांग बांधव समाज प्रवाहात येऊन ते स्वावलंबी व्हावेत याकरीता राज्यातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिव्यांगांच्या कल्याणासाठी पाच टक्के निधी राखीव ठेवण्याचा शासन आदेश आहे. मात्र लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था हा निधी खर्च करीत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. दिव्यांग कल्याणाचा निधी दरवर्षी पूर्णपणे खर्च व्हावा याकरीता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आक्रमक भूमिका मांडणार असल्याची ग्वाही आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.
दिव्यांग हक्क स्वाभीमानी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी आ. संभाजी पाटील निलंगेकरांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करत आभार व्यक्त केले. यावेळी झालेल्या चर्चेत आ.निलंगेकरांनी दिव्यांगाच्या कल्याणाठी आपली भूमिका स्पष्ट करत उपस्थित बांधवांना ग्वाही दिली. याप्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अहेमद हरणमारे व उपाध्यक्ष हेमंत कुलकर्णी यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने दिव्यांगाच्या कल्याणासाठी विशेष उपक्रम राबवून दिव्यांगांना स्वलंबी होण्यासाठी विविध योजना अंमलात आणल्या असल्याचे सांगून आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केंद्र सरकारच्या निर्देशानुसारच राज्य सकारने सुद्धा दिव्यांगांच्या कल्याणासाठी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाच टक्के निधी आरक्षीत ठेवण्याचा शासन आदेश जारी केलेला आहे. या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी हा निधी दरवर्षी दिव्यांगांसाठीच खर्च करणे अपेक्षीत आहे. मात्र जिल्ह्यातील कांही स्थानिक स्वराज्य संस्था दरवर्षी हा निधी खर्च करत नसल्याने दिव्यांगाच्या हक्कावर गदा येऊ लागेली आहे. ही बाब खेदाची असून हा निधी खर्च व्हावा याकरीता दिव्यांग बांधवांना उपोषण करण्याची वेळ येते ही तर लातूर जिल्ह्यासाठी तितकीच लाजीरवाणी बाब असल्याचे आ. निलंगेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.


आगामी काळात दिव्यांगांना त्यांचा हक्क प्राप्त व्हावा व त्यांच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत राखीव असलेला पाच टक्के निधी दरवर्षी खर्च व्हावा याकरीता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आपण आक्रमक भुमिका मांडू अशी ग्वाही आ. निलंगेकर यांनी यावेळी दिली. लातूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सात वर्षात एकदाच साहित्याच्या स्वरुपात दिव्यांग कल्याण निधी खर्च करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो जाचक असल्याची बाब दिव्यांग बांधवांनी आ. निलंगेकर यांच्या निदर्शनास आणून दिली. सदर बाब दिव्यांगाच्या हक्कावर गदा आणणारी असून लातूर महानगरपालिकेनेही हा निधी दरवर्षी खर्च करावा याकरीता स्थायी समिती सभापती अ‍ॅड. दिपक मठपतींनी ठराव सर्वसाधारण सभेत मांडावा अशी सुचना यावेळी केली.
दिव्यांग हक्क स्वाभिमानी प्रतिष्ठानच्या वतीने दि.22 डिसेंबर रोजी दिव्यांगाच्या विविध मांगण्याकरीता उपोषण करण्यात आलेले होते. हे उपोषण मागे घेण्यात यावे आणि त्यांच्या मागण्यासाठी आपण पाठपुरावा करू असे आश्वासन आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिलेले होते. उपोषणाची दखल घेऊन सदर आश्वासन दिल्याबद्दल दिव्यांग हक्क स्वाभिमानी प्रतिष्ठानच्या वतीने आ. निलंगेकर यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अहेमद हरणमारे व उपाध्यक्ष हेमंत कुलकर्णी, योगिराज, निसार, बरकतभाई, स्वामी, शेख, शारदा बेद्रे, दिपमाला तुपकर यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य व दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here