सत्तेची आणि पैशाची मस्ती जिरवण्यासाठी
लोकशाही पॅनलला विजयी करा-आ. कराड
लातूर दि.१८- सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार हिरावून घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत लोकशाही बचाव पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे अवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी केले.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी येत्या २१ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीतील लोकशाही बचाव पॅनलमधील उमेदवारांच्या प्रचारार्थ अनेक मतदारांची भेट आ. रमेशअप्पा कराड यांनी घेतली असून जिल्हा बँकेत होत असलेल्या गैर कारभाराबाबत तसेच शेतकऱ्यांची होत असलेली फसवणुक याबाबत अनेक उदाहरणासह माहिती देवून बँकेबरोबरच शेतकऱ्यांच्या हितासाठी लोकशाही बचाव पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचे बोलून दाखविले. दरम्यान ठिकठिकाणी मतदारांनी आ. कराड यांनी मांडलेल्या भुमिकेला पाठिंबा देवून मतदानातून समर्थन देणार असल्याची ग्वाही दिली.
जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी उद्योगधंद्यांना आणि कारखान्यांना मोठया प्रमाणात पतपुरवठा करून सत्ताधाऱ्यांनी स्वःताचे आणि बगलबच्याचे हित साधले असल्याचे सांगून आ. कराड म्हणाले की, जिल्हा बँक राज्यात आदर्श असल्याचा गवगवा करणारे सहकार महर्षी निवडणुकीतून पळ काढत आहेत. बँकेने शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज दिले हे सत्ताधाऱ्याचे केवळ ढोंग असून शेतकऱ्यांची फसवणूक आहे. किती शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले याची यादीच जाहिर करावी असे सत्ताधाऱ्यांना आवाहन देवून पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज कसे देणार याचा खुलासा करावा असे बोलून दाखविले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद करून निवडणुकाच होवू द्यायच्या नाहीत असा निश्चय केलेल्या सत्ताधाऱ्यांनी मतदारांच्या मतदानाचा अधिकार हिरावून घेतला असला तरी सर्व संबंधीताकाडे अपिल करून विरोधकांचे नऊ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आल्याने बिनविरोध निवडणुकीची सत्ताधाऱ्यांची अपेक्षा फोल ठरली आहे. निवडणुक होत असलेल्या नऊही जागेवर लोकशाही बचाव पॅनलचे उमेदवार मोठया मतांनी विजयी होणार असल्याची खात्री यावेळी आ. रमेशअप्पा कराड यांनी दिली.











