वास्तवाचे भान असणारे साहित्य सर्वश्रेष्ठ – बच्चू कडू
संदीप काळे यांच्या ‘ऑल इज वेल’ या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन.
मुंबई (प्रतिनिधी) :
साहित्य माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी लिहिले जाते. वास्तवाचे भान ठेऊन समाजाचे प्रश्न शब्दात उतरवले जाते तेच खरे साहित्य असते. साहित्याच्या माध्यमातून सामाजिक भान ठेवून लेखकांनी पुढे यावे लागते असे मत राज्यमंत्री तथा जल संधारण व शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
‘सकाळ’ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या संदीप काळे यांच्या ‘ऑल इज वेल’ या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा बच्चू कडू यांच्या हस्ते उंबरखिंड रायगड येथे पार पडला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पद्मश्री पोपटराव पवार, तर हिंदवी परिवाराचे संस्थापक व शिव व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, सहसचिव, केंद्रीय आरोग्य विभाग दिल्ली ओमप्रकाश शेटे यांची यावेळी उपस्थिती होती.
बच्चू कडू म्हणाले, पुस्तकाच्या संस्कारामध्ये माणसे घडवण्याचे सामर्थ असलेल्या असलेल्या शब्दांची आज गरज आहे. पुस्तकाच्या प्रत्येक शब्दातून आमच्या अनेक सामाजिक चळवळी उभ्या राहिल्या आहेत. खरे तर साहित्य असेच पाहिजे. संदीप काळे यांचे. ‘ऑल इज वेल’ वाचताना वाटले, जणू ही माझीच कहाणी आहे. म्हणून ‘ऑल इज वेल’ हे पुस्तक सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे कसा चालतो, असे मनोमनी वाटते.
“वास्तविकतेच्या धाटणीतून आलेल्या साहित्याला सामर्थ्याची झालर असते.” तेच सामर्थ्य इतरांना पुढे जाण्यासाठी मार्ग दाखविते. असे बच्चू कडू म्हणाले.
शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे म्हणाले, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून संदीप काळेंच्या पुस्तकातला प्रत्येक शब्द बाहेर पडतो. संदीप काळे यांचे लिखाण समतेची वाट दाखवणारी दिशा आहे.
माहिती आणि दिशा या दोन्ही विषयाला समर्पकपणे न्याय देण्याचे काम पुस्तके करतात. क्रांती करायची असेल, तर क्रांतीची प्रक्रिया समजून घ्यावी लागेल, यासाठी पुस्तकेच आम्हाला दिशा दाखवू शकतात. पुस्तकात रमणारे मन उत्तम समाजनिर्मितीचा आधारवड होऊ शकतो. असे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी व डॉ. ओमप्रकाश शेटे यांचीही यावेळी भाषणे झाली. हिंदवी परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रकाशन सोहळ्यास राज्यातून आलेले शेकडो शिवभक्त सामील झाले होते.
चौकट : 1
अवघ्या दोन महिन्यात संदीप काळे यांच्या ‘ऑल इज वेल’ या पुस्तकाच्या दहा आवृत्त्या आल्या आहेत. पुस्तकात एका युवकाची सक्सेस स्टोरी आहे. धाडसी वृत्ती असेल, तर मोठ्या खाचखळग्यातून माणसाला इतिहास निर्माण करता येतो. प्रथा, परंपरा, शिक्षण, संस्कृती, मातृप्रेम अशा अनेक विषयांची सामाजिक उकल या ऑल इज वेल पुस्तकात केली आहे. राज्यातल्या सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे, त्याचबरोबर ऑनलाईन अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यावरही पुस्तक सवलतीच्या दराने उपलब्ध आहे.
चौकट : 2
आईचा महिमा अपरंपार असतो. आईने दिलेल्या शिकवणीतून माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. गरिबी, दारिद्र्य, वाईट रुढी, परंपरा त्या सगळ्यावर मात करण्यासाठी आईचे संस्कार हेच उत्तम रामबाण औषध होते. ती प्रत्येक संकटातून मार्ग काढायची. आज मी घेतलेल्या सगळया पदव्या त्या तिच्या संस्कारापुढे फिक्या वाटतात. पदव्यांमध्ये देखाव्यांची शिकवण असते. तर, आईच्या संस्कारामध्ये, संस्काराच चिरंतन टिकणार मांगल्य असते. अलीकडे हे मांगल्य नाहीसे होते की काय याची भीती वाटू लागली, अशी खंत संदीप काळे यांनी याप्रसंगी व्यक्त केली. पुस्तकाच्या दैदीप्यमान यशाबद्दल महाराष्ट्रातून सर्वत्र कौतुक होत आहे.

फोटो ओळ :
संदीप काळे यांच्या ‘ऑल इज वेल’ पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन करताना राज्यमंत्री बच्चू कडू,पद्मश्री पोपटराव पवार, हिंदवी परिवाराचे संस्थापक व शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे, अक्कलकोटचे आ. सचिन कल्याणशेट्टी, सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, सहसचिव केंद्रीय आरोग्य विभाग दिल्ली
डॉ. ओमप्रकाश शेटे.












