इनरव्हिल क्लबच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कारांचे वितरण
चाकूर : पालकांनी आपल्या पाल्यांना वेळ द्यावा. महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींशी सलोख्याचे व मैत्रिणी सारखे वातावरण ठेवावे. त्यामुळे दोन पिढींमधील अंतर कमी होऊन भविष्यकाळात गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होणार नाहीत असे प्रतिपादन मुलींच्या शासकीय वस्तीगृहाच्या अधीक्षक मुक्ता किर्दत यांनी केले.

इनर व्हिल क्लब ऑफ चाकूर च्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘पाल्यांच्या जडणघडणीत पालक व शिक्षकांची भूमिका’ या विषयांवर मार्गदर्शन करताना अधीक्षक मुक्ता किर्दत बोलत होत्या. व्यासपीठावर सहाय्यक पोलिस निरीक्षक निलिनी गावाडे, क्लब च्या अध्यक्ष डॉ.अंजली स्वामी, सचिव शारदा मिरजकर नगरसेविका लक्ष्मी काटे यांची उपस्थिती होती. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक गावाडे महिलांशी संवाद साधताना म्हणाल्या, माझे आई वडील शिक्षक असून त्यांनी मला लहानपणापासूनच मुलासारखं वाढवलं. त्यामुळे मी कणखर, धाडशी व जोखीम पत्करणाऱ्या वृत्तीची बनले. पालकांनी मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत. शांत मनाने घेतलेले निर्णय चुकत नाहीत म्हणून प्रत्येक स्त्रीने मन शांत ठेवूनच निर्णय घ्यावेत.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्यापिका मीना हाके, शारदा मिरजकर, उषा महालिंगे, सुनीता फुलारी, प्रभा मोतीपवळे, जिजाबाई माने, वैशाली सुर्यवंशी, रोहिणी बेद्रे, सविता स्वामी, संगिता मुकाडे, संगिता सोनटक्के यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी सुनंदा हिप्पाळे, वंदना सावंत, माधुरी पाटील, सुनीता कुलकर्णी, संगिता आसोले, सुषमा सोनटक्के, राजश्री साळी, संतोषी मलशेट्टे, साधना कुलकर्णी, सोनाली सुवर्णकार यांच्यासह इनर व्हिल क्लब च्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.












