आशा भोसले वाढदिवसाच्या निमित्ताने

0
928

*तरूण आहे, आशाताई अजुनी!*

द्वारकानाथ संझगिरी

आज आठ सप्टेंबर, आशाताईंचा वाढदिवस!आशाताई म्हटल्यावर मंगेशकर आडनाव लिहावं लागतं नाही. एकच चेहेरा डोळ्यासमोर येतो. प्रसन्न, हसरा, मिश्किल भाव असलेला.

मी त्यांच्याबाबतीत, वयाचा हिशोब लावत नाही. कारण चिरतरुण मनाला कुठलं वय? वार्धक्य हा शब्द त्यांच्याही शब्दकोशात नाही आणि त्यांच्या गाण्याच्याही. *त्यांचे बंधुराज हृदयनाथ मंगेशकर गंमतीत म्हणतात, मी कधी म्हाताराच होत नाही. याच कारण आशाताई कधी म्हाताऱ्या होत नाहीत आणि मी आशाताईंपेक्षा चार वर्षांनी लहान आहे. त्या म्हाताऱ्या होत नसतील तर मी कसा म्हातारा होणार.*?

“पिया तू अब तो आजा” ह्या गाण्यावर, हेलेन थिरकली होती. आता माझा तीन वर्षाचा नातूही नाचतो.

जगात काही गोष्टी कालातीत आहेत आशाताईच गाणं तसं आहे.

त्यांनी पिढ्या व्यापून टाकल्या.

सरदार मलिक – अन्नू मलिक,

बर्मन पितापुत्र,

सुधीर फडके आणि श्रीधर फडके सुध्धा. श्रीधरची मुलगी संगीत देत असती तर त्या तिच्याकडेही गायल्या असत्या. सुरवातीच्या काळात, त्यांच्यावर लतादीदींच्या प्रभाव होता. पण साठीच्या दशकात त्यांनी स्वतःच, सार्वभौम राज्य स्थापन केलं. त्या राज्यावर चाल करून जायची ना कुणाची हिम्मत होती ना कुवत. *आणि हे राज्य त्यांनी स्वत:च्या हिंमतीच्या, कष्टाच्या आणि आवाजाच्या जोरावर उभे केले.*

ओपीने तिला नायिकेचा आवाज बनवलं.

एसडी बर्मन ह्यांनी १९५७ ते १९६२, ह्या काळात त्यांच्याकडे लता गात नसताना,

ती जागा आशाताईंना दिली.

सुधीर फडके ह्यांनी,तिला मराठी राज्याचं

सम्राज्ञीपद दिलं.

आणि मग आरडी बर्मन ह्यांनी तिला कल्ट सिंगर केलं.

सुरवातीला त्यांनी दैन्य पहिलं.

*एकवेळ अशी होती की लतादीदींना कॉफी पाजण्यासाठी त्यांच्या पर्स मध्ये एक रुपयाही नसायचा. आणि आज लक्ष्मी त्यांच्या घरात पाणी भरत आहे. किमान दोन शहर मला माहितेय जिथे आशाताईंची त्याच्या नावाची हॉटेल्स आहेत. एक दुबईत आणि दुसरे बर्मिंगहम.!त्या हॉटेलात गेल्यावर मला पहिल्यांदा जाणवल असेल तर त्यांचे लहानपणीचे दारिद्र्य, त्यांना दिवसातून मिळणारा एखादा घास आणि त्यांच्या पाकिटात नसणारा एखादा रुपया. खूप

बरं वाटलं ह्याच, की माणूस कुठून कुठे आपल्या प्रतिभेच्या जोरावर पोहचू शकतो.!

सर्व वैयक्तिक दुःख, आणि आघात पचवून त्या चिरतरुण राहिल्या.

कुणालाही हेवा वाटावा असा चैतन्य पूर्ण, भावपूर्ण, खालच्या आणि वरच्या स्वरात, आणि दृतलयीत आरामात विहार करणारा त्यांचा आवाज आहे. त्यामुळे, उंच स्वरावर गाणं त्या लिलया सुरु करत.

उदा निगाहे मिलानेको किंवा, तेरे खयालोमे हम.

त्यांच्या गाण्यातलं अष्टपैलूत्व अजोड आहे. त्यांच्या गाण्यातून त्यांच्यांमधली अभिनेत्री डोकावते. त्या गाणं फक्त गात नाहीत तर गाणं इनॅक्ट पण करतात. किती वेगवेगळे प्रयोग त्यांनी केले. ‘ रात अकेली है” गाण्यात बर्मन दादांनी त्याला कानात कुजबुजण्यासारख्या शैलीत गायला सांगितले जेमतेम गुंजनपासून ते हुंकार युक्त उच्चार, अचानक ओरडणं ह्या गोष्टीना तिथे संगीत रूप लाभलं. ते भलतंच सेक्सी वाटलं कारण त्यांचा आवाजात त्या गाण्याला लागणारी मादकता होती.

‘नजर लागी राजा तोरे बंगलेपे’ मध्ये त्यांनी केलेल्या नजर, मटक, कुहुक शब्दाचं उच्चारण काय ग्रेट आहे.

” बलामा खुली हवा ” मधली ती सुरवातीची तान,? आपण त्यात गुंतून जातो.

आणि छोड दो आचल मधला तो सुरवातीचा आह, ! खरं तर तो वेगळाच उच्चार आहे. बऱ्याचदा मी तो पुन्हा पुन्हा ऐकतो. त्यात फक्त पदर सोडण्याचं आर्जव नाही. बरच काही आहे.

खरं तर आशाताईंच्या गायनातली सौंदर्यस्थळ शोधता शोधता आपलं आयुष्य संपून जाईल.

*पण ती सौंदर्यस्थळ मात्र संपणार नाहीत*

बालपणापासून त्यांच्याच गाण्यावर आपण वाढलो.

त्यांच्याच अंगाई गीतावर गाई केली. त्यांच्याच नाचरे मोरावर लहानपणी बागडलो.

प्रेयसीला “अभी ना जावो छोडकर” सांगितलं ते थेट आशाताईंच्या त्या सर्वोत्कृष्ट रोमँटिक गाण्यातून.

प्रेयसीला पाहिल्यावर

आमच्या मनात नेमकी भावना असायची ” कोई आया धडकन केहेती है ”

“अबके बरस भेज भैयाको बाबुल ” हे गाणं बहिणीला सासरी आणायला जाताना नेहमीच डोळ्यात पाणी आणायचं.

त्यांनीच आम्हाला प्रणयाच्या दुनियेतील

पहाटेच महत्व ” मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे” मधून अधोरेखित केलं. आमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आशा ताईच्या गाण्यांनी आम्हाला साथ दिली

.आम्ही म्हातारे होत गेलो. गाणी तरूण राहिली. ती आमच्या मुलांच्या पिढीला साथ देतायत

.त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया

पण आणखीन एक वर्ष तरूण झाल्याबद्दल.

तरूण आहे, आशाताई अजुनी!

(साभार : फेसबुक)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here