मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते एकमतचे संपादक मंगेश देशपांडे-डोंग्रजकर यांना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ मुंबईच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार देऊन आज सन्मानित करण्यात आले. गुरुवार, दि. २७ जानेवारी रोजी सकाळी राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात एकमतच्या नांदेड आवृत्तीचे निवासी संपादक चारुदत्त चौधरी यांनाही पत्रकार भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले.
यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी पत्रकार समाजातील उणिवा आणि दोष दाखवून देण्याचे काम तर करतातच. परंतु समाजातील चांगल्या कामांना ओळख मिळवून देण्याचे काम पत्रकारांनी करावे. जेणेकरून इतरांना या चांगल्या कामांची प्रेरणा मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ मुंबईचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्वप्रथम मंगेश देशपांडे-डोंग्रजकर यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर चारुदत्त चौधरी, सिरळी (ता. कळमनुरी) येथील महाराष्ट्र आदिवासी आश्रमशाळेचे संचालक भगवानराव देशमुख यांना जीवन गौरव, नांदेड येथील दै. नांदेडवार्ताचे संपादक प्रदीप नागापूरकर यांना यशवंत पाध्य स्मृती पुरस्कार, साप्ताहिक कळमनुरी समाचारचे संपादक ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर तोष्णिवाल यांना पत्रकार भूषण आणि नांदेड येथील कवी, लेखक, साहित्यिक व्यंकटेश काटकर यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा साहित्यरत्न पुरस्कार, वसमत येथील हभप शरद महाराज अंबेकर यांना समाजभूषण, जळगावचे सहायक पोलिस निरीक्षक (रेल्वे) भाऊसाहेब शशिकांत मगरे यांना आदर्श प्रशासक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पत्रकारितेसह विविध क्षेत्रात असामान्य योगदान देऊन समाजजीवन संपन्न करणा-या मान्यवरांना दरवर्षी महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ मुंबईच्या वतीने दरवर्षी सन्मानित करण्यात येते. यंदा कोरोनाच्या कारणामुळे निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यपालांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.